गुरुवार, ३ जानेवारी, २०१९

संकल्प सोडण्याची कहाणी

नवीन वर्षाची चाहुल लागली की खूपदा संकल्प सोडायला सुरुवात होते. तुम्हीही यंदा काहीतरी ‘संकल्प’ सोडलाच असणार! नवीन म्हणजे तसे जुनेच संकल्प तडीस नेण्याचा संकल्प आपल्याकडून नेहमीच ‘सोडण्यात’ येतो. ‘संकल्प सोडणे’ हा माझ्या मते एक ‘गंभीर विनोद’ (?) आहे. नवीन वर्षात काहीतरी ‘ठरवणे’ म्हणजे ‘संकल्प’ असं सरळसोट स्पष्टीकरण देता आलं असलं, तरी माझ्या मते संकल्प हे दुसर्‍या अर्थानेच ‘सोडून दिले’ जातात. नवीन वर्ष सुरू होऊन एक-दोन दिवस उलटल्यानंतर आपण ‘सोडलेला’ संकल्प आपल्या अंतर्मनाने केव्हाच ‘सोडून’ दिल्याची आपल्याला जाणीव होते.

Related image

माझंही नेमकं तसंच की, मी दर वर्षी काही ना काही ‘संकल्प सोडतो’. तसा माझा हेतू प्रामाणिक असतो. या संकल्पांची यादीही मोठी देता येईल. उदा. सकाळी दररोज लवकर उठणे, व्यायाम करणे, दररोज काहीतरी लिहित रहावे, रोज रात्री दैनंदिनी (डायरी) लिहिणे वगैरे.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सकाळीच उठण्याची पाळी येते तेव्हा ‘आज आणि उद्या’ म्हणून वेळ मारून न्यावी लागते. हा ‘उद्या’ नंतर कधीच येत नाही. अर्थात हे सांगणे न लागे. असो, माझं डायरी प्रकरणही अगदी असंच आहे. डायरी म्हटल्यावर नको त्या माणसांची नावे समोर येत असली, तरी या दिग्गजांच्या (?) कर्माशी माझ्या डायरीचा संबंध नाही. पण तरीही हे डायरी प्रकरण माझ्या जिव्हाळ्याचं आहे. म्हणूनच नववर्षात नियमित डायरी लिहावी, हा संकल्प मी दर वर्षी नेमाने सोडत आलो आहे आणि अजूनतरी मी नियमित डायरी लिहू शकेन याची मलाही खात्री नाही.

एक जानेवारीला नवीन वर्षाच्या स्वागताच्या धुंदीत (नाही, मी 31 डिसेंबर साजरा करत नाही. माझी धुंदी वेगळी...) मी डायरी लिहिण्याचं चक्क विसरून जातो. डायर्‍या या विकत घेण्यासाठी नसतात. त्या एकतर भेट मिळतात किंवा मिळवाव्या लागतात. पण तरीही मी डिसेंबर महिन्यात एखादी सुंदर, सुबक डायरी विकत घेतो. त्यात नेमकं काय लिहायचं ते सूचतच नाही. शेवटी काय, डायरी नियमित लिहिण्याचा संकल्प अधुराच राहतो. पण त्या डायरीच्या पानांचा उपयोग, दर महिन्याच्या किराणा सामानाची यादी आणि जमा-खर्च लिहायला घरच्यांना मात्र नक्की होतो.

सर्व संकल्पांचं असंच होतं. तसं बघितल्यास 31 डिसेंबरला वर्ष संपतं, असं मानणं चुकीचंच म्हणावं लागेल. कारण आर्थिक वर्ष 31 मार्चला संपतं. मराठी वर्ष गुढीपाडव्याला सुरू होतं. आपला स्वत:चा वाढदिवस असतो, त्या दिवशी आपण नव्या वर्षात प्रवेश केलेला असतो. म्हणून एक जानेवारीपासून नवीन वर्ष सुरू होतं, असं मानणं तात्विकदृष्ट्या बरोबर नाही. तरीही पाश्‍चात्यांच्या पद्धती आपण स्वीकारल्या. हे नववर्षाचंही तसंच. हा प्रकार खूपदा हास्यास्पद वाटतो. मी हे करणार किंवा ते करणार नाही, असं ठरवणं आणि तडीस नेणं हे मनाच्या तयारीवर आहे.

मानसिकदृष्ट्या आपण कितीही हे संकल्प सोडण्यासाठी तयार असलो, तरी हे शक्य असतं का? आणि जर काहीतरी करायचं हे मनाने पक्क ठरवलं असेलच, तर मग एखाद्या मुहुर्ताची तरी काय गरज? 

31 डिसेंबर साजरा करण्यामागे थोडी वेगळी मानसिकता असावी. मनुष्य आपला आनंद आणि दु:खही साजरा करतो तो विशिष्ट प्रकारे. काही महाभाग मनसोक्त दारू पिऊन 31 डिसेंबर आनंद साजरा करतात आणि दु:ख विसरण्याचा प्रयत्न करतात. वर्षभरात मिळालेला आनंद आणि दु:ख हे असं दारूच्या ग्लासासोबत ‘शेअर’ केलं जात असेल, तर मग नववर्षाच्या पूर्वसंध्येला नवीन वर्षात काय करायचं? जेणेकरून आनंद मिळेल आणि काय करू नये, ज्यामुळे दु:ख वाट्याला येणार नाही. या कारणांसाठी संकल्प सोडले जात असावेत; पण माझ्या मते हे संकल्प अशा प्रकारे सोडणे एक औपचारिकताच आहे. तरीही सवयीने आपण एकमेकाला शुभेच्छा देतो आणि आपण स्वत:साठीही काहीतरी देवाकडे मागत असतो. म्हणूनच एखादं ध्येय पूर्ण करण्यासाठी संकल्प सोडला असेल, तर आपल्या मनाशी ठाम निश्‍चय करून तो संकल्प तडीस नेणे आवश्यकच. तर मग करा मनाची तयारी आणि तडीस न्या आपला संकल्प...


विनोद बिडवाईक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा