माझ्या ओळखीची एक व्यक्ती आहे. कृश बांध्याची. अतिशय सामान्य चेहर्याची ही व्यक्ती आपल्या मित्रमंडळातील अतिशय प्रसिद्ध आहे. त्यांचं बाह्य व्यक्तिमत्व अतिशय सामान्य असलं, तरी ते एक यशस्वी उद्योगपती म्हणून ओळखले जातात. समोरच्या व्यक्तीला प्रभावित करण्याची कला त्यांच्याकडे आहे. ती म्हणजे त्यांचं वागणं, बोलणं.
मला इथं एवढंच सांगायचं आहे की, निव्वळ बाह्यसौंदर्य किंवा सुंदर शरीरामुळं दुसर्यावर प्रभाव टाकता येत नाही. तो ‘प्लस पॉइंट’ जमेची बाजू निश्चितच आहे; पण सर्वांनाच काही सुंदर, आकर्षक व्यक्तिमत्वाची देणगी मिळालेली नसते. पण त्यानं फारसं काही बिघडत नाही. स्वत:चं व्यक्तिमत्व तयार करणं हे आपल्या हातात आहे आणि ते अशक्य आहे, अशातली गोष्ट नाही. थोड्याशा प्रयत्नानं आपणही दुसर्याला प्रभावित करू शकतो.
स्वत:चं व्यक्तिमत्व कसं फुलवाल, हा प्रश्न नेहमीच आपल्याला सतावत असतो. कधी शरीर मार खातं, तर कधी कुठं, कसं वागावं हेच समजत नाही. म्हणूनच स्वत:चं व्यक्तित्व फुलवण्यासाठी सर्वप्रथम आपण स्वत:चं आत्मपरीक्षण करायला पाहिजे. स्वत:कडे तटस्थ दृष्टीने बघून आपणच आपल्यात सुधारणा घडवून आणू शकतो.
आपण कसं बोलतो, यावर सुद्धा खूपसं अवलंबून असतं. ओघवत्या आणि प्रभावी; पण कमी शब्दात तुम्ही समोरच्याला कसं प्रभावित करू शकता, यावर आपल्या व्यक्तिमत्वाचा यशस्वीपणा अवलंबून असतो. असं म्हणतात की, एक छोटसं हसू खूप काही करू शकतं. आणि म्हणूनच हसरा चेहरा हा एक माणसाचा गुणधर्म व्हायला पाहिजे. उगाचच चेहरा गंभीर ठेवायचा याचा काही अर्थ नाही. हास्यात एक अशी जादू आहे की, जी अनोळखी व्यक्तीला आपलं बनवते. क्षणिक हास्याचा प्रभाव नेहमीकरता होऊ शकतो. इथं हास्य म्हणजे चेहरा प्रसन्नचित्त दिसायला हवा. चेहरा हसरा ठेवायचा म्हणजे उगाचच ‘खिदीखिदी’ करू नये.
स्वत:चं बोलणं प्रभावी करण्यासाठी अशीच भाषा वापरा जी ऐकणार्याला समजेल. आचार्य अत्रेंनी एकदा भाषेबद्दल लिहिलं होतं की, सुंदर शुद्ध भाषा म्हणजो बोजड आणि अलंकारीक भाषा नव्हे, तर सोपी जी एकाच प्रयत्नात समजेल ती भाषा. मग ती कशीही असो.
सुटसुटीत शब्दप्रयोग समोरची व्यक्ती समजू शकते. बोलताना समोरची व्यक्ती कंटाळणार नाही याची काळजी घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे समोरच्याला मुर्ख समजू नका. कमी बोला; पण संयुक्तिक बोला. जर असं बोललं तर समोरची व्यक्ती प्रभावित नक्कीच होईल.
खालील प्रश्नांची उत्तर सोडवून आपण स्वत:चं आत्मपरीक्षण करू शकतो.
1) आपण साध्या आणि सोप्या भाषेचा उपयोग करता?
2) आपली भाषा सहजपणे समजू शकते?
3) आपल्याला जे काही बोलायचे असते, त्याबद्दल आपण अगोदर मनात स्पष्ट केलेलं असतं?
4) आपली एखादी गोष्ट समोरच्याला जर कळली नाही, तर समोरची व्यक्ती आपल्याला नेहमी नेहमी स्पष्टीकरण मागते
5) आपण चांगलं संभाषण (चांगल्या गोष्टी) करता; पण काय चांगल्या गोष्टी आपल्याला आवडतात? (दुसर्यानं केलेलं चांगलं संभाषण आपल्याला आवडतं?)
6) आपल्या बोलण्याची तारीफ आपले मित्रगण करतात?
7) आपलं बोलणं दुसर्यावर प्रभाव टाकतं? समोरचे तुमच्याशी सहमत होतात?
8) समोरच्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर लवकर देता?
9) आपल्या स्पष्टवक्तेपणाने समोरच्याला नाराज करता?
10) आपल्या एखाद्या गोष्टीला समोरच्याने सहमती दिली नाही तर त्यांच्यावर संतापता?
11) दुसर्यांना समजून घेण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ देता?
12) आपली भाषा किंवा गोष्ट कोणाला समजली नाही, तर तुम्ही त्याला मंदबुद्धी समजता?
13) ऐकणारा जर आपल्याला एखादी गोष्ट पुन्हा विचारत असेल, तर आपण त्याला वेळेची बरबादी मानता?
14) काय ही खात्री बाळगता की, ऐकणारी व्यक्ती आपली गोष्ट समजू शकते?
वरीलपैकी 1, 10, 12 आणि 13 या प्रश्नांचं उत्तर ‘नाही’ असं असेल आणि बाकी ‘होय’ असं असेल, तर वरील प्रश्नांवर विचार करा. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी पाच गुण घ्या. जर आणि 40 ते 60 गुण मिळवले, तर आपलं बोलणं, बोलण्याची पद्धत चांगली आहे आणि आपण उत्कृष्ट संवादक आहात. जर 40 पेक्षा कमी गुण असतील, तर बोलणत सुधारणा घडवून आणावी.
ज्याप्रमाणे बोलण्यावर व्यक्तिमत्व अवलंबून असतं, त्याचप्रमाणं आपलं वागणं कसं आहे, हे महत्त्वाचं समजलं जातं. आपल्या वागण्यामुळं आपण आपलं महत्व वाढवू शकतो. सभ्यपणे वागलो, तर निश्चितच आपल्याबद्दल दुसर्याला आदर वाटेल. विनाकारण दुसर्यावर टीका करण्यातही काही अर्थ नाही. जर टीका आवश्यक असेलच, तर सर्वप्रथम त्याच्या चांगल्या कामाची प्रशंसा करा. तुमचा मोठेपणा त्यात दिसेल. जीवनात मानव संबंधाला विशेष महत्व असतं. जेवढं व्यक्तिमत्व चांगलं तेवढे तुमचे मानव संबंध चांगले राहतील. मानव संबंध या शब्दातच त्याचा अर्थ सामावलेला आहे. मा-मानव, न-नम्रता, व-वात्सल्य, सं-संस्कार, बं-बंधुता, ध-धैर्य. या गोष्टी आत्मसात केल्या की कोण तुम्हाला वाईट म्हणेल? मोठ्यांचा आदर करा, लहान्यांनाही आदरानं वागवा. कारण तुम्ही लहान व्यक्तींशी ज्या शब्दात बोलाल त्या शब्दात ती व्यक्ती उत्तर देईल.
वागणं आणि बोलणं या बरोबरीनंच प्रभावी निर्णयक्षमता हा व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे. यात प्रसंगावधान, हजरजबाबीपणा या गोष्टी येतात.
जेवढ्या प्रभावीपणे एखादा निर्णय आपण घेऊ, तेवढं आपल्या फायद्याचं असतं. आणि तो निर्णय पूर्ण विचारांती असावा. व्यक्तिमत्व बांधणीचे हे काही फॉर्म्युले. व्यक्तिमत्व बांधणी हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. व्यक्तिमत्व विकासात विद्या, वीरता, बुद्धी, साहस, शक्ती आणि साहस किंवा धैर्य हे गुण महत्त्वाचे ठरतात आणि ते माणसाचे खरे आणि नैसर्गिक मित्र आहेत. त्यांची संगत सोडूच नये. संकटकाळात त्यांच्या मदतीने आपण यशस्वी होऊ शकू. शेवटी स्वत:चं व्यक्तिमत्व हे समाजाचं व्यक्तिमत्व घडवत असतं आणि अर्थातच देशाचंही.
विनोद बिडवाईक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा