शनिवार, २८ नोव्हेंबर, २०२०

फसलेली क्रांती

भारताच्या इतिहासात कित्येक क्रांत्या घडून गेल्या असतील; कित्येक बंड झाले असतील. त्यातील कित्येक बंड फसली असतील. परंतु एक असे बंड, एक क्रांती अशीही आहे जी इतिहासाच्या कोणत्याही रुपेरी पानावर लिहिल्या गेली नाही. त्याबद्दल फारसे बोलल्या गेले नाही. इतिहासाच्या पुस्तकांवरून नजर टाकली तर आपल्या लक्षात एक गोष्ट येईल ती म्हणजे भारतामध्ये झालेली सर्व क्रांत्या अथवा बंड इंग्रजांच्या अथवा देशाबाहेरील शत्रुंच्या विरोधात होते. परंतु हे बंड आपल्याच लोकांविरुद्ध करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली होती.

स्वकियांविरुद्ध लढण्याची हौस कोणालाच नसते. महाभारतात घडल्याप्रमाणे स्वकीयांविरुद्ध, आपल्या परिजनाविरुद्ध, गुरूजनांविरुद्ध लढण्याची वेळ त्या लहान विद्यार्थ्यांवर आली होती. हि अभूतपूर्व परिस्थिती बहुरडा नदीच्या दोन्ही काठावर वसलेल्या कविठा आणि घोडगाव या गावी निर्माण झाली होती. त्यासाठी जबाबदार होते शाळेतील गुरुजन.

आम्हा सर्व विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश घालावा लागत असे. खाकी हाप पॅन्ट, पांढरा शर्ट, त्यावर लाल टाय असा हा गणवेश सक्तीचा असे. शर्ट इन् करून टापटीप राहावे लागत असे. बुट आणि सॉक्स हे मात्र सक्तीचे नव्हते. आम्ही स्लीपर अथवा चप्पल घालूनच शाळेत जात असू. काही सधन मुले शुज घालून येत असत. दररोज हा गणवेश घालणे सक्तीचा असे, अर्थात शुक्रवारी आम्हाला आमच्या आवडीचे कपडे घालावयाचे स्वातंत्र्य होते. अर्थात या गणवेश याबद्दल तक्रार करण्याचे कोणतेही कारण नव्हते. दहावीपर्यंत हा गणवेश चालत असे. एकदा कपडे शिवले कि दोनतीन वर्ष हमखास चालत असत. प्रश्न मुळात गणवेशाचा नव्हताच. प्रश्न होता प्रतिष्ठेचा.

त्याचे झाले असे कि सातवीनंतर आठवीत गेल्यानंतर मुले थोडी थोराड दिसत असत, त्यामुळॆ आठवी ते दहावीच्या विध्यार्थ्यांना हाप पॅन्ट ऐवजी फुल पॅन्ट ची परवानगी द्यावी अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी पीटीच्या सोनार सरांकडे केली. हिवाळा सुरु होणार होता आणि थंडीही खूप पडत असे. हेही एक कारण ह्या मागणीमागे होते. 

हि मागणी उर्मटपणे धुडकावून देण्यात आली. सोनार सर हे आमचे पीटी चे सर होते. कधीकधी ते चित्रकलेचा क्लास घेत असत. जेव्हा ते शाळेत नसत तेव्हा ते दारूच्या गुत्त्यावर असत. शाळेत येणे आणि पीटीचा तास घेणे हि त्यांची हौस असावी.  पण बऱ्याचदा ते दारू पिऊन झिंगत पडलेले असत. त्यादिवशी कदाचित ते नशेतच असावेत त्यामुळे अतिशय अपमानास्पद पणे त्यांनी विद्यार्थ्यांची मागणी धुडकावून दिली.

हा अपमान जयेश तडस, श्रीकृष्ण तनपुरे, दिनेश गायकवाड, रावसाहेब कावरे आणि विजय अकोलकर ह्यांच्या जिव्हारी लागला. बरे हि मागणी तशी जुनीच होती. संस्थेच्या दुसऱ्या गावातील शाळेत सर्व मुलांना फुल पॅन्ट वापरण्याची मुभा मागच्या वर्षीच देण्यात आली होती. मग हीच मुभा आम्हाला का नाही हा प्रश्न तसा वाजवी होता.

सोनार सरांनी काहीही कारण न देता, काहीही समजावून न सांगता, चर्चेची भूमिका न घेता मागणी धुडकावून लावल्यामुले प्रत्येकाचा इगो दुखावल्या गेला. पुढचे दोन दिवस अतिशय तणावाचे होते. जयेश, दिनेश, श्रीकृष्ण, रावसाहेब आणि विजय हे माझे मित्र होते. त्यांनी हि मागणी अनौपचारिकपणे केली होती. आता ह्या लढ्याला   औपचारिक स्वरूप देणे गरजेचे आहे असे मी सुचवले. त्यामुळे हि मागणी मुख्याध्यापकांकडे  लेखी स्वरूपात करण्याचे ठरले. 

मागणीपत्रात इतरही विषय टाकावेत का, जसे, शाळा छडीविरहित करणे, गृहपाठ फक्त एकच दिवसाचा असावा, गणिताचा एक्सट्रा क्लास थांबवण्यात यावा, पीटी चा तास न घेता तो खेळण्याचा तास जाहीर करावा वगैरे वगैरे, ह्यावर बरीच चर्चा झाली. परंतु इतर मागण्यापुढे फुल पँटची मागणी मागे पडू शकते आणि वरील मागण्या कधीच मान्य होणार नाहीत, पालकांना हे समजले तर हे सर्व उलट अंगावर येऊ शकते अश्या नित्कर्ष्याप्रत सर्वजण आहेत. त्यामुळे सध्यातरी फक्त पँटची मागणी पुढे ठेवावी हे ठरले.   

लिखित स्वरूपात अर्ज लिहिण्यात आला, ही मागणी करण्याचे कारण लिहिण्यात आले. आठवी पासून ते दहावी पर्यंत सर्व वर्गातील मुलांच्या सह्या घेण्यात आल्या. सर्वानी वरील मुलांना प्रतिनिधी आणि शिष्टमंडळ म्हणून मान्यता दिली.

ठरलेल्या दिवशी, मधल्या सुट्टीत वरील शिष्टमंडळ मुख्याध्यापकाकडे भेटायला जायला तयार झाले.  ग्राऊंड वर जवळपास १५० विध्यार्थ्यांच्या गर्दीसमोर जयेश तडस ह्याने जोशपूर्ण भाषण केले. सर्व मुलांनी “ले लेंगे, ले लेंगे, फुल पॅन्ट लेकर रहेंगे” अश्या घोषणा देऊन शिष्टमंडळाला आपला पाठिंबा दर्शवला. ह्या घोषणा ऐकून मडघे, काकड आणि वर्हेकर सर, च. ह. रसे ह्या आमच्या मुख्याध्यापकासोबत बाहेर आले. त्यांच्यामागे रोटे आणि काकड मॅडम पण बाहेर आल्या. सोनार सर अर्थात दोन दिवसापासून गायब होते. काकड सरांनी येताना एक झुडुपाचा फोक तोडून सोबत आणला.

गुरुजन स्वतःच आपल्या बाहेर भेटायला येतात हे बघून मुलांमध्ये चलबिचल सुरु झाली. दहावीचे मुले हळूच मागे सटकली. सर्व जमाव पूर्ण ग्राउंड वर पांगला. शिष्टमंडळ एकटेच पडले. त्यात विजय अकोलकरने हळूच माघार घेतली. जयेश तडस च्या हातात मागणीचा कागद होता. काकड सरांचा रागीट चेहरा बघून रावसाहेब चाचपडला. आता फक्त जयेश, दिनेश आणि श्रीकृष्ण मागे उरले.

"काय गोंधळ आहे रे?" रसे सरांनी विचारले. 

"सर, आमची एक मागणी आहे?" जयेश घाबरत उत्तरला.

"क्या है रे मागणी तेरी?' वर्हेकर सर, हे सर आम्हाला हिंदी शिकवायचे. 

"आणि मागणी कोणाची आहे? तू आमची म्हणालास, आमची म्हणजे कोणाची? तुम्हा तिघांची? सर्व विद्यार्थ्यांची? की फक्त तुझी रे?" काकडे सर आपल्या नेहमीच्या खर्जातल्या आवाजात बोलले. "आणि घोषणा काय देताय. ले लेंगे, ले लेंगे म्हणून? काय ले लेंगे रे?" असे म्हणून काहीही ऐकून न घेता काकड सरांनी आणलेल्या फोकाने तिघांच्या पायावर फटके मारले. हे सुरु असताना इतर मुले डोळ्याच्या कोपऱ्यातून हा सर्व प्रकार बघत होती. 

"सर, ऐकून तर घ्या,"  

"ह सांग" रसे सर.

"सर हे आमचे लेखी निवेदन. ह्यावर सर्व मुलांच्या सह्या आहेत." जयेश ने रसे सरांकडे कागद सुपूर्द केला.  

रसे सरांनी निवेदन घेतले. आणि त्यांनी वाचायला सुरुवात केली. वाचल्यावर तो कागद, निवेदन रोटे मॅडमनी घेतला. वाचून त्या हसायला लागल्या.

"घ्या, ह्यांना आता फुलपॅण्ट वापरण्याचाही परवानगी हवीय." ते हसत बोलले. 

"काय रे चड्डी घालायची लाज वाटते का?" काकड सर. ह्यावर सर्व गुरुजन जोरजोरात हसले. 

"चला पळा. कश्याला बापांना खर्चात पाडता. काही परवानगी मिळणार नाही." रसे सर म्हणाले. रसे सर तसे चांगले होते, शांत होते, पण ते का रागावले काही कळले नाही. 

"आणि गोंधळ घातला तर सटकावून काढेल आता." सर्वाना ऐकू जाईल अश्या आवाजात काकड सर बोलले.   

हा सर्व प्रकार क्लास मधील मुली बघत होत्या आणि खिदळत होत्या. त्यामुळे सर्वाना अपमान जरा जास्तचं लागला.  

संध्याकाळी घरी जाताना सर्वांनी नदीकिनारी भेटायचे ठरले. नदीकिनारी मोठी सभा भरली. ७० मुले तरी होती. दहावीत असणाऱ्या मुलांनी ह्या सर्व प्रकाराला विरोध दर्शवला. 

"तुमचे आता फक्त ५-६ महिने राहिले. पण आम्हाला अजून पुढचे ३-४ वर्ष काढायचे आहेत." दिनेश बोलला. 

"काय एक वर्गात किती वर्ष राहायचे ठरवलेत." मागून कोणीतरी ओरडले. 

"ये गप, विषय काय आहे? आम्ही काय हे स्वतःसाठी करतोय का?" जयेश ने झापले. 

"हो, हे असे चालणार नाही. आताच ठरवा आपली एकजूट आहे की नाही." रावसाहेब म्हणाला. 

"हो, तूच आधी सटकला मघाशी." परत कोणीतरी पुटपुटले. 

"ज्यांना फुल पॅन्ट साठी लढाई सुरु ठेवायची त्यांनी हात वर करा." दिनेश 

ह्यावर दहावीचे विद्यार्थी सोडून सर्वांनी हात वर केला. दहावीत शिकणारे दिनेशचे मित्र पण सभा सोडून निघून गेले. 

"ठीक आहे, जे गेले ते कावळे आणि जे राहिले ते मावळे." रावसाहेब ओरडला. त्यावर सर्व मुलांनी टाळ्या वाजवल्या.

ले लेंगे, ले लेंगे, फुल पॅन्ट लेकर रहेंगे, ह्या घोषणेने नदीकाठ दणाणून निघाला. 

"आता पुढे काय करायचे?" एकाने विचारले.

"सर्वांत आधी सर्वांनी एकजुटीची शपथ घ्यावी. हो आणि पहिल्या बेंच बसणाऱ्या मुलांनी ती आधी घ्यावी. जयेश माझ्याकडे बघत बोलला. आठवी आणि नववी मधील आम्ही चारपाच हुशार आणि पहिल्या बेंचवर बसणारी मुले होतो. आम्ही उभे राहिलो आणि एकजुटीची शपथ घेतली. 

"आणि हो, त्यांनी काकड मॅडमला येथे काय ठरले हे काहीही झाले तरी काहीही सांगणार नाही अशीही शपथ घ्यावी." मागून श्रीकृष्ण तनपुरे बोलला. 

अश्याप्रकारे प्रत्येकाला एकजुटीची शपथ देण्यात आली. 

"हे सर्व, ठीक आहे, पण पुढे काय?" मी विचारले.

"सविनय कायदेभंग." कोणीतरी बोलले. 

"हो, सविनय कायदेभंग," सर्वजण जोरजोरात ओरडले. पण नेमके काय करायचे कोणालाच कळले नाही.

"उद्यापासून शर्ट इन करायची नाही." 

दुसऱ्या दिवशी खूप मुलांनी शर्ट इन केला नाही, काही मुलांनी तो क्लास मध्ये गेल्यावर केला आणि बाहेर येताना काढून टाकला. सोनार सर त्यादिवशी नेमके आले होते, प्रार्थनेच्या वेळी त्यांच्या शिट्टीच्या दोरीने 

विद्यार्थीच्या पायावर अमानुषपणे हल्ला केला. क्रांतीची ज्योत आता पूर्ण पेटली होती. काही जण डबल गेम करत होते. पण बहुतांश विध्यार्थ्यांना फुल पँटची परवानगी हवी होती. 

सविनय कायदेभंग चा दुसरा भाग पुढील आठवड्यात सुरु झाला. 

आता शर्ट इन सोबत टाय पण न घालायचे ठरले. आता मुले गबाळ दिसू लागली. शर्ट इन नाही, टाय नाही. हे पाहून पाचवी ते सातवीची मुलेही तसे वागू लागली. हे बंड पूर्ण शाळेत पसरते आहे ह्याची जाण आता गुरुजनांना येऊ लागली. सोनार सर आपल्याच विश्वात होते. ते जेव्हा येत. तेव्हा अमानुषपणे सपासप पायावर फोकाचें अथवा शिट्टीच्या दोरीचे वर करत. त्यात काकड सर पण आता आपली मारण्याची हौस भागवून घेऊ लागले. 

एक दिवशी प्रार्थनेच्या वेळी, रसे सरांनी प्रार्थना झाल्यावर भाषण केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी शिस्त पाळावी असे भावनिक आवाहन केले. आपले आई वडील आपल्याला शिकवण्यासाठी किती कष्ट करतात हे सांगून एक जुनी इमोशनल गोष्ट सांगितली. काही मुली ती गोष्ट ऐकून मुसमुसू लागल्या. काही मुलांना उगाचच गिल्टी वाटायला लागले.

काकड मॅडम ने मला बोलावून घेतले आणि ह्या मुलांच्या मागे लागू नको अशी तंबी दिली, अर्थात अतिशय प्रेमळपणे.  शाळेतील बातमी माझ्या घरी केव्हाच पोहोचली होती. सर्व क्लास मधील हुशार मुलांना बोलावून समज देण्यात आली, काहींना समजावून सांगण्यात आले. दहावीची मुले आता उघडपणे, चळवळीविरुध्द आवाज उठवू लागली. "आम्ही एवढी वर्ष काढली, काय बिघडले आमचे. आयुष्यभर फुल पँटच घालायची आहे वगैरे". असे बोलून खिल्ली उडवू लागली. मुली मुलांना बघून उगाचच फिदीफिदी हसू लागल्या. त्याचे हसणे जरा जास्तच वाढले. 

संध्याकाळी घरी गेल्यावर आई बाबानी माझी हजेरी घेतली. श्रीकृष्णाला त्याच्या वडिलांचे फटके खावे लागले. 

हे बंड संपवण्याचे सर्व प्रयत्न गुरूजनांकडून होऊ लागले. पालकांना निरोप गेले. शिष्टमंडळातील प्रतिनिधी आणि त्यांचे मित्र ह्यांच्यावर विशेष नजर होती. आता गुरुंजन आणि पालक एकत्र आले होते. 

पाचवी तो सातवी चे मुले आता टीपटाप गणवेश करून येऊ लागली. आम्हीही आता शर्ट इन आणि टाय घालून शाळेत येऊ लागलो होतो. काही दिवसानंतर शिष्टमंडळातील महत्वाचे प्रतिनिधी, जयेश आणि श्रीकृष्ण अगदी टिपटॉप, गणवेश करून आले. 

दुसऱ्या दिवशी शाळेत संपूर्णपणे शिस्त प्रस्थापित करण्यात रसे सर आणि इतर गुरुजनांना यश मिळाले. 

आणि विद्यार्थ्यांचे बंड दोन आठवड्यात थंड पडले. 

अजून पुढील दोन वर्ष तरी हाफ पॅन्ट मधेच काढावी लागणार होती.

विनोद बिडवाईक

(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत.  इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन वर उपलब्ध आहेत.)  

शनिवार, २१ नोव्हेंबर, २०२०

गौरी

एक दिवस अचानक आईच्या मनात आले की आपल्या घरी एखादी गाय हवी.  जेणेकरून मुलांना घरचे दूध पीता येईल, तसेच घरी तूप ताक करता येईल. घर सारण्यासाठी लागणाऱ्या शेणाची सुद्धा गरज भागवता येईल. खरतर मला प्राण्यांबद्दल  प्रेम नाही म्हणजे मला प्राणी आवडतात पण अगदी इतर लोक ज्या प्रमाणे त्यांना जवळ घेतात, त्यांचे लाड करतात असं मला मुळीच आवडत नाही, त्यामुळे आपल्या घरी गाय असावी असे मला मुळीच वाटत नव्हते आणि गाय आल्यावर तिची देखभाल कोण करणार हाही प्रश्न होता. ह्याचे दुसरे कारण हेही होते की घरातील सर्वात लहान सदस्य म्हणून अशासारखी बरीच कामे माझ्या लहान खांद्यावर येऊन पडत असत.   

“कशाला हवी गाय? आपण देशमुखा कडून आणतोच की दूध. आणि गाई, म्हशी असणारे खूप लोक आहेत गावात. त्यांच्याकडून आणू दूध, ताक, तूप वगैरे." मी आईला विचारले.

"तुला काय कळतं" ह्या एका वाक्यात माझे म्हणणे उडवून देण्यात आले.

आणि एके दिवशी एका मुहूर्तावर आमच्या घरी एका तरुण गायीचे आगमन झाले. आईने तिची पूजा केली, तिला फुले वाहिली. गाईचे नाव काय ठेवावे यावर विचारविनिमय झाला आणि शेवटी तिचे नामकरण करण्यात आले, गौरी, या नावाने. ह्या गौरीने माझ्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहे, याची किंचितही कल्पना त्या दिवशी आली नाही. पण गौरी डोळ्याच्या कोपऱ्यातून माझ्याकडे बघत, तुला बघते अशी पुटपुटल्याचा उगाचच भास मला झाला. ठीक आहे, रोज सकाळी गायीचे भरपेट दूध पीता येईल ह्या एका जमेच्या बाजूवर मी गौरीला स्वीकारले आणि तिच्या अंगावरून भीत भीत हात फिरवला.

आमचे गावात नदीकिनारी दुसरे घर होते. तेथे गौरीचे घर बनवण्यात आले. एकदा गाय घेतल्यानंतर तिची सर्व व्यवस्था करणे गरजेचे होते. दावण बांधणे, तिला खरारा करणे, तिला कधीतरी पाणी मारून धुणे वगैरे वगैरे. रोज सकाळी आमच्या गावातील गुराख्याकडे सोडणे आणि संध्याकाळी घरी परत आणणे.

खरेतर आम्ही जसे स्वतःच शाळेत जायचो आणि परत यायचो तसे आमच्या गावातील गुरेढोरे स्वतःच सकाळी गुराख्याकडे नदीच्या किनारी जायची आणि संध्याकाळी रानातून परस्पर परत यायची. 

गौरीपण तसे करेल ना असे मी आईला विचारले. त्यावर तिला सवय होईपर्यंत सोडून द्यावे लागेल आणि मग ती स्वतःच जाईल आणि येईल, असे उत्तर आईने दिले. 

"पण हि गाय तर आपल्या गावातूनच विकत घेतली ना? मग सवयीचा काय प्रश्न?" मी विचारले. 

"तसे नाही, आपल्या घरी ती नवीन आहे ना? तिला आपल्या घराची सवय व्हायला नको?" तिने सांगितले. 

दुसऱ्या दिवशी तिला नदीच्या काठी, जेथे गुराखी गुरांचा रोल कॉल घेत असे, तेथे मी गाईला सोडून आलो. संध्याकाळी गुराखी तिला परत तेथेच आणून सोडेल ह्या आशेवर. संध्याकाळ झाली, गावातील सर्व प्राणी आपापल्या घरी परत आले, पण गौरी काही घरी आली नाही. मी गुराख्याच्या घरी गेलो, आणि विचारले, "अहो काका आमची गाय सकाळी सोडली होती ना, ती नाही दिसली." ह्यावर त्याने मोठा पॉज घेतला, कदाचित तो गाय कोठे सोडली हे आठवत असेल. "हो का?" तो एवढेच म्हणाला.

"मग आता? ती नदीच्या काठी नको का संध्याकाळी? आणि तुम्ही सर्व गुरे मोजली असेलच ना?" मी विचारले. माझ्या ह्या प्रश्नावर मला काही सेन्सिबल उत्तरे मिळतील असे मला वाटले, पण हा माणूस प्रत्येकवेळी एवढा पॉज घायचा की मला कंटाळा यायला लागला. शेवटी बऱ्याच प्रयत्नानंतर मला काही माहिती मिळाली ती अशी की गुराखी सकाळी गुरांचा रोल कॉल मुळीच घेत नाही. रोज आपल्याकडे किती गुरेढोरे येतात, किती परत येतात, याचा हिशेब तो मुळीच ठेवत नाही. तो फक्त त्यांना रोज वेगवेगळ्या ठिकाणी चरायला घेऊन जातो आणि संध्याकाळी सर्वाना हाकलत वेशीपर्यंत घेऊन येतो. पुढे सर्व गुरे आपापल्या घरी अगदी प्रामाणिकपणे परत जातात. मला असेही कळले की आतापर्यंत कोणाचेही गुरं हरवले नाहीत असेही त्याने सांगितले. 

"असेल ती कोठेतरी, नदीच्या आजूबाजूला अथवा कोठे जवळ रानात." 

एकंदर चर्चेनंतर, हा गुराखी काही भरवश्याचा नाही ह्या नित्कर्षाप्रत मी आलो. 

गाय कदाचित तिच्या मूळ मालकाकडे गेली असावी असे मला वाटले, म्हणून मी त्यांच्याकडे पण गेलो. पण तिकडे पण ती आली नव्हती. 

सोबत आणलेला दावण मी गळ्यात घातला आणि गावाच्या वेशीवर गेलो. 

"अरे विनू , कोठे फिरतोय," अचानक मागून गणूने मला हाक मारली. गणू माझा मित्र होता. 

"गाय शोधतोय." 

त्याला सर्व पुराण  परत एकदा सांगितले. त्यानेही तो कोठे गेला वगैरे सांगितले. काही गायी उगाचच नदीच्या काठी हिंडत असतात. हि नवीन माहिती मला मिळाली. ह्या माहितीव्यतिरिक्त फारशी उपयुक्त अशी माहिती काही मिळाली नाही. 

"अरे मी विसरलोच, आईने मला तेल आणायला सांगितले, ते घेतो विकत आणि जातो" असे म्हणून गणू निघून  गेला. गणूचे वडील गावातील डॉक्टर होते. ते असेच विसरभोळे होते. एखाद्या पेशंट ला बघायला निघायचे आणि मध्ये कोणी भेटले की गप्पा मारत बसायचे आणि कोणाकडे जायचे ते विसरून दुसरीकडेच जायचे.


शेवटचा उपाय म्हणून मी गावातील कोंडवाड्याकडे केलो. तेथेही ती नव्हती. वैतागून मी घरी निघालो, नदीतून जाताना, दुसऱ्या काठावर बसलेली गौरी मला दिसली. मी जवळ गेलो तशी ती उठली आणि चालायला लागली. मी पळत पळत तिला पकडले आणि तिच्या गळ्यात दावण बांधली. तिला ओढत घेऊन घरी गेलो. बापरे, एकंदरीत हे प्रकरण काही सोपे नाही हे मला जाणवले. 

दुसऱ्या दिवशी पण तेच. हि नवीनच ड्युटी माझ्या मागे लागली होती. ह्या सर्व प्रकरणात मला खेळायला वेळच मिळायचा नाही. गौरी स्वतःहून गुराख्या कडे जाईल, संध्याकाळी घरी येईल आणि तिला घराची सवय केव्हा होईल ह्या एकाच प्रश्नाने माझी सकाळ सुरु होत असे. त्यात मला तिच्यासाठी चारा आणण्याचे कामही करावे लागे.

एक महिना झाला तरी गौरीला ह्या सर्व प्रकाराची सवय होईल असे वाटत नव्हते. तिला उंडारायला आवडत होते. नदीकिनारी फिरायला आवडत होते. लोकांच्या शेतात जाऊन खायला आवडत होते. कोंडवाड्यात जाऊन पैसे भरून तिला मला सोडावे लागे. 

काही दिवसांनी तिने गोंडस पाडसाला जन्म दिला. ती दूधही भरपूर देत असे. पण ती घरी काही येत नसे. कदाचित तिला घरी एकटे वाटत असेल, म्हणून ती इतर गुरांसोबत वेळ घालवत असेल असे मला वाटे. काही गुरेढोरे अशीच फिरत असत. पण गौरी हि नेहमी एकटीच असायची.   

आता गौरीचा गायब होण्याचा कालावधी बराच वाढला. कधीकधी तर ३-४ दिवस ती गायब असायची. तिचा अतिक्रमण करण्याचा परीघ पण वाढला. आता ती गावापासून बरीच लांब जाऊन इतर गावातील लोकांच्या शेतात जात असे.  कधीतरी गौरी मला नजरेस पडत असे, मी येतो हे बघितल्यावर ती शांतपणे माझी वाट पाहत असे आणि मी जवळ गेलो रे गेलो कि, पुढे पळत असे. मला चकवा देण्यात तिचा कमालीचा पायखंडा होता. 

तिचे वासरू पण मोठे व्हायला लागले. ते पण आता तिच्यासोबत बाहेर जायला लागले. कधीकधी वासरू एकटेच परत येत असे, आणि गौरी नेहमीप्रमाणे उंडारत असे. 

गौरी कशीही असली तरी माझे तिच्यासोबत भावबंध जोडले गेले होते. हळूहळू ती मला समजून घेऊ लागली होती असे मला वाटायला लागले होते. तिचे स्वतः घरी येणे आता वाढले होते आणि मला तिला शोधायला खूप कमी वेळेला जावे लागत असे. तिची आबाळ होऊ नये म्हणून मी तिच्यासाठी हिरवे गवत शोधत असे पण वर्षभर सहा महिने तरी ते शक्य नसायचे.

असे करता करता दोन वर्ष निघून गेले. माझे दहावीचे वर्ष सुरु झाले. गौरीची जबाबदारी बाबांनी घेतली. पण माझ्याएवढा सोशिकपणा बाबांकडे नसावा, त्यामुळे गौरीला जरा जास्तच फटके पडत असत. 

दहावीनंतर मी शिक्षणासाठी गाव सोडले. मी नाशिकला माझ्या वडील बंधूंकडे आलो. मिलिटरीत असणारे माझे  मोठे वडील बंधू कमिशन संपवून गावी परत आले. आई बाबांना गौरीची काळजी घेणे शक्य नव्हते. त्यामुळे गौरीला गावातीलच देशमुख नावाच्या कुटुंबियांच्या विनामोबदला सुपूर्द करण्यात आले. 

मला आजही गौरी आठवते, तिला सांभाळताना होणारी माझी भंबेरी आठवते. कधीतरी एखादी गाय रस्ताने जाताना दिसली कि मी तिच्या डोळ्याकडे बघतो आणि ती चक्क कोपऱ्यातून बघत काहीतरी पुटपुटल्याचा भास मला अजूनही होतो.


विनोद बिडवाईक

(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत.  इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन वर उपलब्ध आहेत.) 

शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०२०

हिंदीची उत्तरपत्रिका आणि एक दिवसाचा तपासनीस

एक दिवस अचानक रोटे मॅडमनी मला स्टाफ रूम मधे बोलावले. त्या आमच्या वर्गशिक्षिका होत्या आणि हिंदी हा विषय आम्हाला शिकवायच्या. स्वभावाने अतिशय छान, त्यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय ग्रेसफुल होते. वर्गात मी पहिला येत असल्यामुळे त्यांची बरीचशी शैक्षणिक कामे मी करत असे, उदाहरणार्थ, त्यांची पुस्तके आणून देणे, वर्गात मॉनिटर चा रोल प्रभावीपणे साकार करणे, दंगामस्ती करणाऱ्या मुलांची नावे त्यांना सांगणे वगैरे वगैरे वगैरे. अर्थात त्यांची शिकवण्याची स्टाईल पण छान होती. कविता मस्तपैकी सांगायच्या, अगदी गावुन दाखवायच्या. तशा त्या प्रसिद्ध होत्या.

माझ्या आई-बाबांसोबत सुद्धा त्यांची चांगली ओळख होती. त्यामुळे कधीतरी आई- बाबा भेटले की माझ्याबद्दल त्यांना सांगायच्या. त्या स्वभावाने अतिशय छान होत्या. गावातील काही मुलांना त्या आऊट ऑफ द वे जाऊन शिकवायच्या. त्यावेळेस ट्युशन वगैरे असा काही प्रकार नव्हता. काही एक्स्ट्रा शिकवायचं असेल तर शाळेमध्ये बोलावून शिकवावे लागायचे. आमच्या गावांमध्ये त्या एका भाड्याच्या घरात राहत असत. 

त्या दिवशी त्यांचा क्लास झाला आणि त्यांनी मला स्टाफ रूम मधे बोलावले. काय काम असावे या विचारातच मी स्टाफरूममध्ये गेलो. बाकीचे शिक्षक क्लास वर गेले होते. त्या त्यांच्या खुर्चीवर बसल्या होत्या. मला बघतास त्यांनी विचारले.  "आलास?  ये अरे विनु,  तुला  पेपर तपासायचे करायचे आहेत? करशील का? 

मी विचारले, "पेपर तपासायचे? कोणते? आणि का?"

मॅडम, "अरे आपली हिंदी ची सहामाही परीक्षा झाली आहे ना, त्याचे पेपर चेक करायला तू मला मदत करशील का? माझ्याकडे त्या सहावीच्या पण वेगळा भर आहे, त्यामुळे तू मला हिंदीचे पेपर तपासायला मदत कर."

"पण मॅडम, मला कसे कळणार चूक काय आणि बरोबर काय?" मी 

"कळेल हो, तुला सर्व माहीत आहे, मी तुला एक उत्तरपत्रिका देते, त्याप्रमाणे उत्तर असतील तर गुण द्यायचे." 

"मग ठीक आहे, करेन मी तुम्हाला मदत."  

"हो, पण मित्रांचे पेपर जास्त काळजीने तपासायचे, नाहीतर, देशील जास्त गुण त्यांना." त्या हसत म्हणाल्या.

खरंतर पेपर चेक करणे अतिशय जिकरीचे काम होते आणि मॅडमनी ते काम माझ्यावर सोपवले हे बघून मला अतिशय आनंद झाला. अर्थात तो परीक्षेचा मोसम होता, दिवाळीच्या आधी सहामाहीचा निकाल लावायचा होता. 

"आणि हो, हे मात्र बाकी कोणाला सांगू नको की तू पेपर तपासणार आहेस म्हणून. फक्त आई बाबांना सांग. अभिमान वाटेल तुझा त्यांना."  एवढे म्हणून त्या जागेवरून उठल्या दुसरा तास घेण्यासाठी. पेपर तपासायची एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर आली हे ऐकून मला दोन बोटे स्वर्ग राहिली. पेपर तपासणे हे काम शिक्षकांचे असते आणि तेच काम करतोय म्हणजे मी अर्धा शिक्षक झालो की काय असे मला वाटायला लागले आणि त्याच आनंदात मी क्लास मध्ये आलो.

खरं तर एवढी मोठी जबाबदारी मॅडमनी माझ्यावर टाकली आणि ही जबाबदारी कोणालाच माहीत होऊ नये हे कसं काय. इतर मुलांनी, वर्गमित्रांनी आपल्याला भाव द्यावा. त्यांनी आपल्याशी चांगलं वागावं, भाव द्यावा, म्हणून तरी मी मॅडमने पेपर तपासायची मोठी जबादारी माझ्यावर टाकली हे त्यांना माहीत होणे गरजेचे होतं. पण जर मी ही गोष्ट आत्ताच सांगितली आणि त्याचा बोभाटा झाला व मॅडम विद्यार्थ्यांकडून पेपर तपासून घेतात हे जर लोकांना कळले तर मॅडमचे महत्व कमी होईल असे मला वाटले. कदाचित मॅडम माझ्या हातातून हे काम काढून घेतील आणि कदाचित दुसऱ्या वर्गातील मुलाला ते सांगतील त्यापेक्षा काही दिवस बघावे आणि मग नंतर सांगावे असे मी ठरवले.

पण आमच्या गावातली मुलं आणि त्यातही माझे वर्गमित्र अशा गोष्टीवर विश्वास ठेवतील असे मला वाटले नाही. त्यांना ही गोष्ट कळल्यावर मुळात ती ते उडवून लावतील. तुला कशाला सांगतील पेपर तपासायला मॅडम काहीपण सांगतोस वगैरे वगैरे ते म्हणतील. आणि त्यांनी विश्वास जरी ठेवला ठेवला आणि जर त्यांनी हे त्यांच्या आई-वडिलांना सांगितले आणि त्यांना त्या परीक्षेमध्ये कमी मार्क पडले तर उगाचच मॅडमला त्रास व्हायचा त्यापेक्षा हे कोणाला न सांगितलेच बरे असे मला वाटले. खरंतर आई-बाबांना हे सांगावे असं मॅडम म्हणाल्या होत्या पण आपला मुलगा परीक्षेचे पेपर तपासतो याचा अभिमान त्यांनाही वाटला असता आणि मग ही गोष्ट त्यांनी कदाचित लपवली नसती कारण त्या अभिमानाच्या भरात त्यांनी हे दुसऱ्या कोणाला सांगितले तर हे पेपर तपासायचे गुपित उघडगुपित होईल आणि मॅडम चे महत्व कमी होईल, त्यांच्याबद्दलचा आदर गावांमध्ये कमी होईल असे मला वाटले. त्यापेक्षा पेपर मी तपासतोय हे गुपितच ठेवावे या निष्कर्षाप्रत मी आलो.

दुसऱ्या दिवशी शाळेला सुट्टी होती. पेपर तपासायला मी मॅडमच्या घरी गेलो. त्यांनी मस्तपैकी पोहे बनवले होते. एक प्लेट हातात देत म्हणाल्या, "पोहे खा आणि मग आपण आपले मिशन सुरु करू."

आम्ही पोहे संपवले आणि पेपर तपासायला बसलो. एक मॉडेल उत्तरपत्रिका त्यांनी माझ्याकडे दिली.

"तसे तुला सर्व उत्तरे माहित आहेत, पण ह्या मॉडेल वरून क्रॉस चेक कर आणि मार्क्स दे."

मी जवळपास सर्व डिव्हिजन चे शंभर पेपर तरी तपासले असतील. मॅडमनी पण त्यांच्या हातात असणारे इतर विषयाचे पेपर तपासून हातावेगळे केले. कंटाळवाणा असला तरी तो अनुभव खूप छान होता. यात दोन-तीन तास कसे गेले हे कळलेच नाही.

घराबाहेर पडून खूप उशीर झाला होता. मी कुठे जाणार हे मी घरी सांगितले नव्हते. घराच्या बाहेर मी खूप वेळ असलो तर माझ्या घरच्यांना खूप चिंता असायची. बाबाआणि माझी मोठी बहीण हे मला बाहेर शोधायला पडत असत आणि नेमकं याचीच मला भीती होती. आता जवळपास तीन तास झाले होते आणि मी जर घरी पोहोचलो नाही, तर माझी बहीण किंवा बाबा मला शोधायला बाहेर पडतील; मी कुठे आहे त्यांना कळणार नाही आणि एवढे तीन तास मी बाहेर काय करत होतो हे कसे सांगावे या चिंतेत मी होतो.

"विनू, आता जेवायची वेळ झाली आहेच,  जेवूनच जा"  मला मॅडम म्हणाल्या. पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून, "नाही. मी आता घरी जातो." असे म्हणून घरी जाण्यासाठी धूम ठोकली. 

घरी पोहोचलो, तेव्हा बाबा दुकानातून घरी आले होते, सर्वांच्या नजरा माझ्याकडे होत्या, "काय रे. एवढा वेळ का लावला? सकाळपासून तू बाहेर आहेस, काही अभ्यास वगैरे नाही का? आणि सांगून का नाहीस गेलास? किती शोधायचे तुला? ताईने प्रश्नांचा भडीमार केला, मी अशीच काहीतरी उडवाउडवीची उत्तरे दिली. 

"जर अभ्यास केला नाही तर गावातील गाई आणि बकऱ्या राखायचे काम करावे लागेल" आई बोलली. 

"मी नाही करणार, त्यापेक्षा मी कपडे शिवीन." मी बोललो. 

"तुझी तुझ्या शिक्षिकेकडे तक्रार करायला हवी, अन त्यांनाच विचारायला हवे काय शिकवतात त्या? आईने सुनावले.  

शेवटी माझी तक्रार रोटे बाईंना करायची असे आई आणि ताईने ठरवले. ताईने स्वयंपाक बनवलेला होता. ती ताटे वाढायची तयारी करायला गेली आणि मी मनातल्या मनात हसत जेवायला पाटावर बसलो.     

विनोद बिडवाईक

(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत.  इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन वर उपलब्ध आहेत.) 

शनिवार, ७ नोव्हेंबर, २०२०

सापडलेले पैसे आणि मूल्यशिक्षण

आमची शाळा सकाळी अकरा वाजता भरायची. सकाळी भल्या पहाटे उठायचे, आपापली कामे करायची, आईला विहिरीतून पाणी काढायला मदत करायची आणि बाहेर मित्रांच्या बागेत जाऊन देवासाठी फुले आणायची, राहिलेला होमवर्क करायचा, नंतर आंघोळ करून शाळेची तयारी करायची. न्याहारी म्हणून रात्रीची भाजी भाकरी खायची, फार स्वादिष्ट लागायची ती न्याहारी. सर्व आटोपले कि मग रमत-गमत शाळेत जायचं, असा हा रोजचा शिरस्ता असायचा. शाळेत जायला मला आवडायचे. शाळेत माझा नेहमी पहिला नंबर यायचा. हुशार होतो मी तसा. त्यामुळे दुसरा ऑपशन नसायचा. पण एखाद्या दिवशी, अतिशय कडक असणाऱ्या, काकड सरांचा क्लास असला की जायची इच्छा कमी व्हायची. काकड सर खुप स्ट्रीक तर होतेच पण अभ्यास केला नाही तर थोड्या थोड्या गोष्टीने मारायचे सुद्धा; पण माझा नाईलाज असायचा कारण शाळेत हुशार मुलगा असल्यामुळे शाळेत जाणे टाळता यायचे नाही. काय करणार हुशार विधार्थी म्हणून बऱ्याच गोष्टी मला करता येत नसत. शिक्षक गावातच राहत असल्यामुळे, शाळेव्यतिरिक्त बाहेर पण त्यांची नजर आणि घरी आई वडिलांची नजर. 

तर अश्या एका हिवाळ्यातील रम्य दिवशी, मी शाळेत जायची तयारी केली. चालत चालत मारुतीच्या मंदिरा समोरून जाताना देवाला बाहेरूनच नमस्कार करण्याची माझी सवय होती.चालता चालताच मी देवाला नमस्कार केला. थोडे पुढे अंतर गेल्यावर मला चक्क एक पाच रुपयाचे नाणे सापडले. मला अतिशय आनंद झाला कारण काही दिवसापूर्वी माझ्याकडून आईने दिलेले पाच रुपये हरवले होते आणि आज चक्क पाच रुपये आता मला  मिळाले होते. हे पाच रुपये बघून आईला आनंद होईल असे मला वाटले. मी ते नाणे माझ्या कंपासमध्ये ठेवले आणि नेहमीप्रमाणे शाळेत गेलो. माझ्या  मनात आता त्या ५ रुपयांच्या नाण्याचेच विचार होते. दुसरा तास काकड सरांचा होता, परंतु माझ्या डोक्यात पाच रुपयांनी घट्ट जागा करून ठेवली होती. मी मनात मांडे खायला सुरुवात केली. हे पाच रुपये आईला द्यावेत की पाच रुपयाच्या लिमलेटच्या आणि मिंटच्या गोळ्या घ्याव्यात अथवा हे पाच रुपयाचे ऐवजी एक रुपयाच्या गोळ्या घ्याव्यात आणि उरलेले पैसे काही दिवस पुरून ठेवावेत म्हणजे रोज आपल्याला मिंटच्या गोळ्या खाता येतील. मला मिंटच्या गोळ्या  खूप आवडायच्या. एक रुपयाला 5 मिळायच्या. 

पण मनात शंका आली हे करणं कितपत योग्य आहे. पाच रुपयाच्या मिंटच्या गोळ्या भरपूर येत असल्या तरी अशा पद्धतीने गोळ्या घेणे मला पटले नाही, त्यापेक्षा घरी जाऊन हे पैसे आईला द्यावेत असे मला वाटले आणि ते योग्यही होते. हे पैसे आईलाच द्यावेत या निष्कर्षाप्रत मी आलो. त्या दिवशी पाच रुपये हरवल्यानंतर, आईच्या चेहऱ्यावरच्या भावना बघून मला अतिशय दुःख झाले होते.  पैसे गमावल्याचे दुःख पैसे कमावण्याच्या कष्टा  पेक्षा जास्त होते, त्यामुळे ते पैसे आईला देणे मला योग्य वाटले. ते नाणे मी  चांगल्या पद्धतीने जपून ठेवले. दोन-तीन वेळा त्याला स्पर्श करून बघितला. हे सर्व करत असताना काकड सरांनी विचारलेल्या प्रश्नांना मला काही उत्तर देता आले नाहीत, म्हणजे तिकडे लक्ष नव्हते त्यामुळे त्यांच्या दोन-तीन छड्याही  खाव्या लागल्या.

शाळा सुटली; आज जरा लवकरच वेगाने घरी पोहोचलो. आई संध्याकाळचे काम करत होती. मी माझी बॅग माझ्या टेबलवर ठेवली आणि आई कडे गेलो, 

"आई, हे बघ काय आहे?" मी म्हणालो. माझ्या हातात असणारे पाच रुपयांचे  नाणे मी आईला दाखवले. 

तिने विचारले, "काय? कुठून आणले?" 

"मी सकाळी जात होतो ना शाळेत, तेव्हा मला सापडले रस्त्यावर?" मी बोललो.

"खरंच?"

“"हो, आपले पाच रुपये हरवले होते ना ते असे परत मिळाले" मी म्हणालो.

"तू विचारले आजूबाजूला, कोणाचे पैसे हरवले का असे?" तिने परत विचारले. 

"अवं हो," मी चिडून बोललो. 

"एक काम कर, आताच्या आता जा आणि हे पैसे मारुतीच्या मंदिरातील दानपेटीत टाक" आईने आदेश दिला. 

"पण का" मला तिचे लॉजिक कळेना, "मिळालेले पैसे, असे परत का उगाचच द्यायचे आणि मारुती थोडी ते पैसे वापरणार आहे?"

"सांगते ते कर." तिने आदेश दिला, आणि नंतर समजवणूकीच्या आवाजात बोलली, "बाबू, जे पैसे आपले नाहीत, त्यावर आपला अधिकार नाही. त्यादिवशी तूझ्याकडून पैसे हरवले त्याचा तुला आणि मला किती त्रास आणि दुःख  झाले माहित आहे ना? असाच त्रास आणि दुःख ज्या व्यक्तीचे पैसे हरवले असेल त्याला झाले असेल. प्रत्येक जण खूप कष्ट करून,रक्ताचे पाणी करून पैसे कमावत असतो आणि जेव्हा ते हरवतात तेव्हा खूप वाईट वाटते. असे मिळालेले पैसे आपल्याला क्षणिक आनंद देत असतील पण लाभत नाहीत."

आईचे ते शब्द ऐकून मी निमूटपणे बाहेर पडलो, मंदिरातील दानपेटीत ते पैसे टाकले. आता माझ्या मनात त्या पाच रुपयाबद्दल काहीही ओढ नव्हती. मी देवाला हात जोडले आणि प्रार्थना केली.

त्यानंतर अनेक घटना घडल्या. भुरळ पडण्याचे  प्रसंग आले. अडचणीचीही  परिस्थिती आली, पण तरीही दुसऱ्यांच्या पैश्याला हात लावण्याची  इच्छा  कधी झाली नाही. मुळात जे आपले नाही त्याला हात लावायचा नाही, उलट दुसऱ्यांना मदतच करायची. जेव्हा आपण काही दुसऱ्यांना देतो त्याच्या दुप्पट प्रमाणात ते आपल्याकडे परत येते याची प्रचिती मला खूपदा आली. 

एकेकाळी पाच रुपये हरवलेत, त्या हरवलेल्या पैश्यांची मोठा धडा दिला. पाच रुपये असेच मिळाले, पण दोन्ही घटनेमध्ये संपूर्ण आयुष्याची शिकवण मला मिळाली. पाच रुपयाची किंमत कळली, पण त्याहीपेक्षा पाच रुपयांनी शिकवलेले मूल्यशिक्षण पुढील आयुष्यात मला खूप पुढे घेऊन गेले.

आई-वडिलांनी यापेक्षा अजून काय द्यायला हवे? करोडच्या संपत्तीपेक्षा महत्वाचे असणारे मूल्यशिक्षण आणि स्वतःच्या जोरावर यशस्वी होण्यासाठीचे आवश्यक कौशल्य आपल्याकडे वारसाहक्काने येत असतात. 

त्यातून आपण काय घेतो हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे.   

विनोद बिडवाईक

(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत.  इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन वर उपलब्ध आहेत.) 

रविवार, १ नोव्हेंबर, २०२०

पांच रुपयांची किंमत

घरातले काम आटोपल्यावर आई तासन तास शिलाई  मशीन वर बसून काम करत असे. आमचे छोटेसे गाव होतं. शिंप्याची अशी खूप कमी घरे होती गावात.  चांगले कपडे शिवण्यात आई-बाबांचा हातखंडा होता.  गावात त्यासाठी ते बऱ्यापैकी प्रसिद्ध होते. अर्थात त्याकाळी फारसे उत्पन्न नसे, त्यामुळे छोटी-मोठी शेतीची कामे पण आम्ही करत असू. आमच्याकडे अडीच एकर कोरडवाहू शेती होती. हि जमीन माझ्या मोठ्या भावाला सरकारकडून मिळाली होती, ते मिलिटरी मध्ये होते म्हणून. आम्ही तिला सिलिंग ची जमीन म्हणत असू. जीवनावश्यक  वस्तू नक्की मिळत असत. परंतु सर्व आयुष्य कष्टाचे होते. पण सर्वजण समाधानी होते, सुखी होते. मुळातच आमचे गाव खूप लहान असल्यामुळे एकमेकांसोबत बरे संबंध होते, चांगले मी म्हणणार नाही, कारण गावातील प्रत्येकाचे वेगवेगळे आपापले व्यवहार असायचे. पण गरज पडली तर मदतीला धावून येणारे होते.  आई आणि बाबांकडे गावातील बरेच लोक आपले, मुलांचे कपडे शिवून घ्यायला येत असत. लहान बाळाच्या टोप्या, झबले, चंची, ब्लाउज, चोळी इत्यादी ती सफाईने शिवत असे. माझे वडील पुरुषांसाठी असणारी सर्व प्रकारची कपडे शिवत असत. 

हे करत असताना मला आई-बाबांकडून जीवनाचे मूल्य शिक्षण मात्र निश्चितच मिळाले.

त्यादिवशी आईंने घाईघाईने स्वयंपाक तयार केला आणि छान झबले शिवायला घेतले. थोड्यावेळाने गावातील एक बाई जी आईची  नेहमीचे गिऱ्हाईक होते, ती  आली. तिचे दोन झबली तयारच होती. आईने ती झबली तिला दिले. बाई  पैसे देऊन निघून गेली.  बऱ्याचदा काही गिऱ्हाईक उधारीवर आपले कपडे घेऊन जायचे पण काही चांगले गिऱ्हाईक तेव्हाच्या तेव्हा कामाचे पैसे द्यायचे.

आईने मला बोलावले आणि मला सांगितले की "जा हे पाच रुपये घे आणि गुजरी मध्ये जाऊन कोथिंबीरची जुडी, अर्धा किलो बटाटे आणि अर्धा किलो कांदे घेऊन ये. अर्थात पाच रुपयात हे सर्व त्यावेळी शक्य होतं. स्वस्ताई होती त्यावेळेस. गुजरी म्हणजे नदी पलीकडच्या गावातील बाजारपेठेचे ठिकाण. माझे गाव घोडगाव आणि पलीकडील   गाव कविठा. दोन्हीही  गावें  बाहुरडा ह्या नावाने प्रसिद्ध  असणाऱ्या नदीने विभागले गेले होते. नदीला बारामाही पाणी असायचे. अंतर फारसे नसायचे. माझी शाळा सुद्धा नदीच्या पल्याड होती. सुट्टीचे दिवस होते त्यामुळे आईने दिलेले पैसे मी माझ्या खिशात टाकले आणि बाजारात जायला निघालो. घराच्या बाहेर पडल्यावर टंगळमंगळ करत माझे प्रस्थान बाजाराकडे निघाले. रस्त्यात माझे बरेच मित्र भेटले. अभ्यासाबद्दल, खेळाबद्दल इतरच्या गप्पा झाल्या. खूप वेळ निघून गेला तसे मला अचानक माझे काम आठवले काम आठवले. मी तसाच पळत बाजारात गेलो.  

ओळखीच्या आणि नेहमीच्या दुकानदाराकडे गेलो. त्याचे नाव होते शिवा देशमुख. शिवा आमच्या घराच्या मागच्या बाजूने राहायचा. त्याची मोठी बागायती शेती होती. त्याची वडिलोपार्जित शेती नदीकिनारी होती आणि शेतीमध्ये विहीरपण होती. त्यामुळे त्याच्याकडे हिरव्यागार पालेभाज्या, फळं फळावळ, आणि वेगवेगळ्या  प्रकारच्या भाज्या उपलब्ध असायच्या. 

मी घाई घाईत शिवाला भाज्यांची ऑर्डर दिली. शिवाने सर्व वस्तू माझ्या पिशवीत टाकल्या आणि त्याने पैशासाठी माझ्यासमोर हात पसरले. मी जेव्हा खिशात हात घातला, तेव्हा पाच रुपयाची नोट काही हातात येईना. दुसऱ्या खिशात हात घातला, नोट नव्हती, सर्व कपडे चाचपून बघितले ,पण पाच रुपयाची नोट मला सापडली नाही. माझी नोट  हरवली होती हे मला जाणवले. आता पुढे काय वाढून ठेवले असावे ह्याचा मी विचार करू लागलो. मी शिवाला सांगितले की, "शिवा भाऊ हे पाच रुपये लिहून ठेव. मी नंतर पैसे आणून देतो". हात लेका, म्हणून शिवाने पैसे लिहायला वही हातात घेतली.

ज्या रस्त्याने मी आलो होतो त्या रस्त्यावर कुठे पैसे पडले असावेत म्हणून  ते परत मिळतात का ते बघावे म्हणून मी खाली मान घालून निघालो. माझे काही मित्र अजूनही खेळत होते. त्यांना मी दिसलो पण आता माझे लक्ष संपूर्ण रस्त्यावर होते. माझी मान खाली होती आणि मी रस्ता माझ्या नजरेने स्कॅन करत निघालो होतो. एक दोघांनी मला हाक पण मारली पण आता माझे लक्ष त्यांच्याकडे मुळीच नव्हते. दोन-तीन वेळा मी त्या रस्त्यावरून चक्कर  मारून पैसे शोधायचा प्रयत्न केला. पण मला पैसे काही मिळाले नाहीत.

आपले पैसे हरवले आहेत ते परत मिळणे कठीण आहे ह्या नित्कर्षाप्रत मी आता आलो होते. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट करायची होती; ती म्हणजे माझ्याकडून "तू दिलेले पाच रुपये हरवले" हे सत्य आईला सांगणे. यावर काय प्रतिक्रिया येईल याचा विचार मी करू लागलो. 

"अरे वा आलास का? आणि एवढा उशीर का लावला? अरे मुर्खा मला भाजीला फोडणी द्यायची होती आणि म्हणून मी तुला कोथिंबीर लवकर आणायला सांगितले होते. बर जाऊ दे ती ती पिशवी आता. केवढ्याचा झाला हा सर्व माल?"  तीने मला विचारलं.

मी चाचपडत म्हणालो, "आई, शिवा भाऊ ने पैसे लिहून ठेवले."  

तिने विचारले, "का? तुला पाच रुपये दिले होते ना? त्याचे काय झाले? काय घेतले?"  

मी कचरत बोललो, "ते पैसे कुठेतरी हरवले. बाजारात जात असताना."  

"काय?" आईने जोरात ओरडून विचारले, "हरवले?" 

माझ्या गालावर जोराची चपराक बसली. माझ्या डोळ्यात पाणी आले. 

"एवढे कष्ट करून आम्ही पैसे कमावतो, आणि काळजी न घेता तुम्ही ते हरवता." आईने अजून दोनतीन थपडा गालावर दिल्या. 

"एवढे काय त्यात? मी काय मुद्दामून हरवले काय? " मी भोकांड पसरले. मला वाटले भोकांड पसरल्यामुळे आईचा राग थोडा कमी होईल पण तो जरा जास्तच वाढला आणि तिनेअजून एक फटका पाठीवर मारला. 

"जा, शोध आता, परत, कोठे पडले असतील तर सापडतील." तिने मला परत बाहेत पिटाळले. 

आता मी शोधायचे काम दोन तीन वेळा आधीच केले आहे हे कसे सांगणार? मी परत बाहेर पडलो. मघाशी जे मित्र भेटले होतो त्यांना भेटलो, त्यांना विचारले कि त्यांना काही पैसे सापडले का म्हणून. परंतु ते पाच रुपये मला कोठेच मिळाले नाहीत. खिश्यातुन ते असे गायब झाले होते कि कोणीतरी जादू केली असावी. मला त्या पाच रुपयाचा खूप राग आला. बरे त्याने माझ्याच खिशातून का गायब व्हावेत? थोडी वाट बघितली असती आणि शिवा च्या गल्ल्यातून गेले असते तर शिवाला काहीही फरक पडला नसता. असो. 

मग बाबा घरी आलेत, त्यांनी थोडे समजावून सांगितले. आईचा राग पण कमी झाला. "पैसे, कमी किंवा जास्त नसतात. त्याची किंमत करायला शिकावी." असे बाबा मला म्हणाले. 

अर्थात त्यादिवशी पाच रुपयांची किंमत मला पूर्ण समजली. आता मध्ये मध्ये शर्ट आणि पॅन्ट चे खीसे चाचपडणे माझी सवय झाली आहे. खिश्यात असणाऱ्या सर्व वस्तू सुरक्षित आहेत ना, हे मी नेहमी बघत असतो. एक मात्र खरे की त्यानंतर माझ्याकडून अजून तरी काहीही हरवले नाहीये. पैसे तर दूरची गोष्ट आहे.    

विनोद बिडवाईक