शनिवार, २१ नोव्हेंबर, २०२०

गौरी

एक दिवस अचानक आईच्या मनात आले की आपल्या घरी एखादी गाय हवी.  जेणेकरून मुलांना घरचे दूध पीता येईल, तसेच घरी तूप ताक करता येईल. घर सारण्यासाठी लागणाऱ्या शेणाची सुद्धा गरज भागवता येईल. खरतर मला प्राण्यांबद्दल  प्रेम नाही म्हणजे मला प्राणी आवडतात पण अगदी इतर लोक ज्या प्रमाणे त्यांना जवळ घेतात, त्यांचे लाड करतात असं मला मुळीच आवडत नाही, त्यामुळे आपल्या घरी गाय असावी असे मला मुळीच वाटत नव्हते आणि गाय आल्यावर तिची देखभाल कोण करणार हाही प्रश्न होता. ह्याचे दुसरे कारण हेही होते की घरातील सर्वात लहान सदस्य म्हणून अशासारखी बरीच कामे माझ्या लहान खांद्यावर येऊन पडत असत.   

“कशाला हवी गाय? आपण देशमुखा कडून आणतोच की दूध. आणि गाई, म्हशी असणारे खूप लोक आहेत गावात. त्यांच्याकडून आणू दूध, ताक, तूप वगैरे." मी आईला विचारले.

"तुला काय कळतं" ह्या एका वाक्यात माझे म्हणणे उडवून देण्यात आले.

आणि एके दिवशी एका मुहूर्तावर आमच्या घरी एका तरुण गायीचे आगमन झाले. आईने तिची पूजा केली, तिला फुले वाहिली. गाईचे नाव काय ठेवावे यावर विचारविनिमय झाला आणि शेवटी तिचे नामकरण करण्यात आले, गौरी, या नावाने. ह्या गौरीने माझ्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहे, याची किंचितही कल्पना त्या दिवशी आली नाही. पण गौरी डोळ्याच्या कोपऱ्यातून माझ्याकडे बघत, तुला बघते अशी पुटपुटल्याचा उगाचच भास मला झाला. ठीक आहे, रोज सकाळी गायीचे भरपेट दूध पीता येईल ह्या एका जमेच्या बाजूवर मी गौरीला स्वीकारले आणि तिच्या अंगावरून भीत भीत हात फिरवला.

आमचे गावात नदीकिनारी दुसरे घर होते. तेथे गौरीचे घर बनवण्यात आले. एकदा गाय घेतल्यानंतर तिची सर्व व्यवस्था करणे गरजेचे होते. दावण बांधणे, तिला खरारा करणे, तिला कधीतरी पाणी मारून धुणे वगैरे वगैरे. रोज सकाळी आमच्या गावातील गुराख्याकडे सोडणे आणि संध्याकाळी घरी परत आणणे.

खरेतर आम्ही जसे स्वतःच शाळेत जायचो आणि परत यायचो तसे आमच्या गावातील गुरेढोरे स्वतःच सकाळी गुराख्याकडे नदीच्या किनारी जायची आणि संध्याकाळी रानातून परस्पर परत यायची. 

गौरीपण तसे करेल ना असे मी आईला विचारले. त्यावर तिला सवय होईपर्यंत सोडून द्यावे लागेल आणि मग ती स्वतःच जाईल आणि येईल, असे उत्तर आईने दिले. 

"पण हि गाय तर आपल्या गावातूनच विकत घेतली ना? मग सवयीचा काय प्रश्न?" मी विचारले. 

"तसे नाही, आपल्या घरी ती नवीन आहे ना? तिला आपल्या घराची सवय व्हायला नको?" तिने सांगितले. 

दुसऱ्या दिवशी तिला नदीच्या काठी, जेथे गुराखी गुरांचा रोल कॉल घेत असे, तेथे मी गाईला सोडून आलो. संध्याकाळी गुराखी तिला परत तेथेच आणून सोडेल ह्या आशेवर. संध्याकाळ झाली, गावातील सर्व प्राणी आपापल्या घरी परत आले, पण गौरी काही घरी आली नाही. मी गुराख्याच्या घरी गेलो, आणि विचारले, "अहो काका आमची गाय सकाळी सोडली होती ना, ती नाही दिसली." ह्यावर त्याने मोठा पॉज घेतला, कदाचित तो गाय कोठे सोडली हे आठवत असेल. "हो का?" तो एवढेच म्हणाला.

"मग आता? ती नदीच्या काठी नको का संध्याकाळी? आणि तुम्ही सर्व गुरे मोजली असेलच ना?" मी विचारले. माझ्या ह्या प्रश्नावर मला काही सेन्सिबल उत्तरे मिळतील असे मला वाटले, पण हा माणूस प्रत्येकवेळी एवढा पॉज घायचा की मला कंटाळा यायला लागला. शेवटी बऱ्याच प्रयत्नानंतर मला काही माहिती मिळाली ती अशी की गुराखी सकाळी गुरांचा रोल कॉल मुळीच घेत नाही. रोज आपल्याकडे किती गुरेढोरे येतात, किती परत येतात, याचा हिशेब तो मुळीच ठेवत नाही. तो फक्त त्यांना रोज वेगवेगळ्या ठिकाणी चरायला घेऊन जातो आणि संध्याकाळी सर्वाना हाकलत वेशीपर्यंत घेऊन येतो. पुढे सर्व गुरे आपापल्या घरी अगदी प्रामाणिकपणे परत जातात. मला असेही कळले की आतापर्यंत कोणाचेही गुरं हरवले नाहीत असेही त्याने सांगितले. 

"असेल ती कोठेतरी, नदीच्या आजूबाजूला अथवा कोठे जवळ रानात." 

एकंदर चर्चेनंतर, हा गुराखी काही भरवश्याचा नाही ह्या नित्कर्षाप्रत मी आलो. 

गाय कदाचित तिच्या मूळ मालकाकडे गेली असावी असे मला वाटले, म्हणून मी त्यांच्याकडे पण गेलो. पण तिकडे पण ती आली नव्हती. 

सोबत आणलेला दावण मी गळ्यात घातला आणि गावाच्या वेशीवर गेलो. 

"अरे विनू , कोठे फिरतोय," अचानक मागून गणूने मला हाक मारली. गणू माझा मित्र होता. 

"गाय शोधतोय." 

त्याला सर्व पुराण  परत एकदा सांगितले. त्यानेही तो कोठे गेला वगैरे सांगितले. काही गायी उगाचच नदीच्या काठी हिंडत असतात. हि नवीन माहिती मला मिळाली. ह्या माहितीव्यतिरिक्त फारशी उपयुक्त अशी माहिती काही मिळाली नाही. 

"अरे मी विसरलोच, आईने मला तेल आणायला सांगितले, ते घेतो विकत आणि जातो" असे म्हणून गणू निघून  गेला. गणूचे वडील गावातील डॉक्टर होते. ते असेच विसरभोळे होते. एखाद्या पेशंट ला बघायला निघायचे आणि मध्ये कोणी भेटले की गप्पा मारत बसायचे आणि कोणाकडे जायचे ते विसरून दुसरीकडेच जायचे.


शेवटचा उपाय म्हणून मी गावातील कोंडवाड्याकडे केलो. तेथेही ती नव्हती. वैतागून मी घरी निघालो, नदीतून जाताना, दुसऱ्या काठावर बसलेली गौरी मला दिसली. मी जवळ गेलो तशी ती उठली आणि चालायला लागली. मी पळत पळत तिला पकडले आणि तिच्या गळ्यात दावण बांधली. तिला ओढत घेऊन घरी गेलो. बापरे, एकंदरीत हे प्रकरण काही सोपे नाही हे मला जाणवले. 

दुसऱ्या दिवशी पण तेच. हि नवीनच ड्युटी माझ्या मागे लागली होती. ह्या सर्व प्रकरणात मला खेळायला वेळच मिळायचा नाही. गौरी स्वतःहून गुराख्या कडे जाईल, संध्याकाळी घरी येईल आणि तिला घराची सवय केव्हा होईल ह्या एकाच प्रश्नाने माझी सकाळ सुरु होत असे. त्यात मला तिच्यासाठी चारा आणण्याचे कामही करावे लागे.

एक महिना झाला तरी गौरीला ह्या सर्व प्रकाराची सवय होईल असे वाटत नव्हते. तिला उंडारायला आवडत होते. नदीकिनारी फिरायला आवडत होते. लोकांच्या शेतात जाऊन खायला आवडत होते. कोंडवाड्यात जाऊन पैसे भरून तिला मला सोडावे लागे. 

काही दिवसांनी तिने गोंडस पाडसाला जन्म दिला. ती दूधही भरपूर देत असे. पण ती घरी काही येत नसे. कदाचित तिला घरी एकटे वाटत असेल, म्हणून ती इतर गुरांसोबत वेळ घालवत असेल असे मला वाटे. काही गुरेढोरे अशीच फिरत असत. पण गौरी हि नेहमी एकटीच असायची.   

आता गौरीचा गायब होण्याचा कालावधी बराच वाढला. कधीकधी तर ३-४ दिवस ती गायब असायची. तिचा अतिक्रमण करण्याचा परीघ पण वाढला. आता ती गावापासून बरीच लांब जाऊन इतर गावातील लोकांच्या शेतात जात असे.  कधीतरी गौरी मला नजरेस पडत असे, मी येतो हे बघितल्यावर ती शांतपणे माझी वाट पाहत असे आणि मी जवळ गेलो रे गेलो कि, पुढे पळत असे. मला चकवा देण्यात तिचा कमालीचा पायखंडा होता. 

तिचे वासरू पण मोठे व्हायला लागले. ते पण आता तिच्यासोबत बाहेर जायला लागले. कधीकधी वासरू एकटेच परत येत असे, आणि गौरी नेहमीप्रमाणे उंडारत असे. 

गौरी कशीही असली तरी माझे तिच्यासोबत भावबंध जोडले गेले होते. हळूहळू ती मला समजून घेऊ लागली होती असे मला वाटायला लागले होते. तिचे स्वतः घरी येणे आता वाढले होते आणि मला तिला शोधायला खूप कमी वेळेला जावे लागत असे. तिची आबाळ होऊ नये म्हणून मी तिच्यासाठी हिरवे गवत शोधत असे पण वर्षभर सहा महिने तरी ते शक्य नसायचे.

असे करता करता दोन वर्ष निघून गेले. माझे दहावीचे वर्ष सुरु झाले. गौरीची जबाबदारी बाबांनी घेतली. पण माझ्याएवढा सोशिकपणा बाबांकडे नसावा, त्यामुळे गौरीला जरा जास्तच फटके पडत असत. 

दहावीनंतर मी शिक्षणासाठी गाव सोडले. मी नाशिकला माझ्या वडील बंधूंकडे आलो. मिलिटरीत असणारे माझे  मोठे वडील बंधू कमिशन संपवून गावी परत आले. आई बाबांना गौरीची काळजी घेणे शक्य नव्हते. त्यामुळे गौरीला गावातीलच देशमुख नावाच्या कुटुंबियांच्या विनामोबदला सुपूर्द करण्यात आले. 

मला आजही गौरी आठवते, तिला सांभाळताना होणारी माझी भंबेरी आठवते. कधीतरी एखादी गाय रस्ताने जाताना दिसली कि मी तिच्या डोळ्याकडे बघतो आणि ती चक्क कोपऱ्यातून बघत काहीतरी पुटपुटल्याचा भास मला अजूनही होतो.


विनोद बिडवाईक

(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत.  इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन वर उपलब्ध आहेत.) 

३ टिप्पण्या: