शनिवार, ७ नोव्हेंबर, २०२०

सापडलेले पैसे आणि मूल्यशिक्षण

आमची शाळा सकाळी अकरा वाजता भरायची. सकाळी भल्या पहाटे उठायचे, आपापली कामे करायची, आईला विहिरीतून पाणी काढायला मदत करायची आणि बाहेर मित्रांच्या बागेत जाऊन देवासाठी फुले आणायची, राहिलेला होमवर्क करायचा, नंतर आंघोळ करून शाळेची तयारी करायची. न्याहारी म्हणून रात्रीची भाजी भाकरी खायची, फार स्वादिष्ट लागायची ती न्याहारी. सर्व आटोपले कि मग रमत-गमत शाळेत जायचं, असा हा रोजचा शिरस्ता असायचा. शाळेत जायला मला आवडायचे. शाळेत माझा नेहमी पहिला नंबर यायचा. हुशार होतो मी तसा. त्यामुळे दुसरा ऑपशन नसायचा. पण एखाद्या दिवशी, अतिशय कडक असणाऱ्या, काकड सरांचा क्लास असला की जायची इच्छा कमी व्हायची. काकड सर खुप स्ट्रीक तर होतेच पण अभ्यास केला नाही तर थोड्या थोड्या गोष्टीने मारायचे सुद्धा; पण माझा नाईलाज असायचा कारण शाळेत हुशार मुलगा असल्यामुळे शाळेत जाणे टाळता यायचे नाही. काय करणार हुशार विधार्थी म्हणून बऱ्याच गोष्टी मला करता येत नसत. शिक्षक गावातच राहत असल्यामुळे, शाळेव्यतिरिक्त बाहेर पण त्यांची नजर आणि घरी आई वडिलांची नजर. 

तर अश्या एका हिवाळ्यातील रम्य दिवशी, मी शाळेत जायची तयारी केली. चालत चालत मारुतीच्या मंदिरा समोरून जाताना देवाला बाहेरूनच नमस्कार करण्याची माझी सवय होती.चालता चालताच मी देवाला नमस्कार केला. थोडे पुढे अंतर गेल्यावर मला चक्क एक पाच रुपयाचे नाणे सापडले. मला अतिशय आनंद झाला कारण काही दिवसापूर्वी माझ्याकडून आईने दिलेले पाच रुपये हरवले होते आणि आज चक्क पाच रुपये आता मला  मिळाले होते. हे पाच रुपये बघून आईला आनंद होईल असे मला वाटले. मी ते नाणे माझ्या कंपासमध्ये ठेवले आणि नेहमीप्रमाणे शाळेत गेलो. माझ्या  मनात आता त्या ५ रुपयांच्या नाण्याचेच विचार होते. दुसरा तास काकड सरांचा होता, परंतु माझ्या डोक्यात पाच रुपयांनी घट्ट जागा करून ठेवली होती. मी मनात मांडे खायला सुरुवात केली. हे पाच रुपये आईला द्यावेत की पाच रुपयाच्या लिमलेटच्या आणि मिंटच्या गोळ्या घ्याव्यात अथवा हे पाच रुपयाचे ऐवजी एक रुपयाच्या गोळ्या घ्याव्यात आणि उरलेले पैसे काही दिवस पुरून ठेवावेत म्हणजे रोज आपल्याला मिंटच्या गोळ्या खाता येतील. मला मिंटच्या गोळ्या  खूप आवडायच्या. एक रुपयाला 5 मिळायच्या. 

पण मनात शंका आली हे करणं कितपत योग्य आहे. पाच रुपयाच्या मिंटच्या गोळ्या भरपूर येत असल्या तरी अशा पद्धतीने गोळ्या घेणे मला पटले नाही, त्यापेक्षा घरी जाऊन हे पैसे आईला द्यावेत असे मला वाटले आणि ते योग्यही होते. हे पैसे आईलाच द्यावेत या निष्कर्षाप्रत मी आलो. त्या दिवशी पाच रुपये हरवल्यानंतर, आईच्या चेहऱ्यावरच्या भावना बघून मला अतिशय दुःख झाले होते.  पैसे गमावल्याचे दुःख पैसे कमावण्याच्या कष्टा  पेक्षा जास्त होते, त्यामुळे ते पैसे आईला देणे मला योग्य वाटले. ते नाणे मी  चांगल्या पद्धतीने जपून ठेवले. दोन-तीन वेळा त्याला स्पर्श करून बघितला. हे सर्व करत असताना काकड सरांनी विचारलेल्या प्रश्नांना मला काही उत्तर देता आले नाहीत, म्हणजे तिकडे लक्ष नव्हते त्यामुळे त्यांच्या दोन-तीन छड्याही  खाव्या लागल्या.

शाळा सुटली; आज जरा लवकरच वेगाने घरी पोहोचलो. आई संध्याकाळचे काम करत होती. मी माझी बॅग माझ्या टेबलवर ठेवली आणि आई कडे गेलो, 

"आई, हे बघ काय आहे?" मी म्हणालो. माझ्या हातात असणारे पाच रुपयांचे  नाणे मी आईला दाखवले. 

तिने विचारले, "काय? कुठून आणले?" 

"मी सकाळी जात होतो ना शाळेत, तेव्हा मला सापडले रस्त्यावर?" मी बोललो.

"खरंच?"

“"हो, आपले पाच रुपये हरवले होते ना ते असे परत मिळाले" मी म्हणालो.

"तू विचारले आजूबाजूला, कोणाचे पैसे हरवले का असे?" तिने परत विचारले. 

"अवं हो," मी चिडून बोललो. 

"एक काम कर, आताच्या आता जा आणि हे पैसे मारुतीच्या मंदिरातील दानपेटीत टाक" आईने आदेश दिला. 

"पण का" मला तिचे लॉजिक कळेना, "मिळालेले पैसे, असे परत का उगाचच द्यायचे आणि मारुती थोडी ते पैसे वापरणार आहे?"

"सांगते ते कर." तिने आदेश दिला, आणि नंतर समजवणूकीच्या आवाजात बोलली, "बाबू, जे पैसे आपले नाहीत, त्यावर आपला अधिकार नाही. त्यादिवशी तूझ्याकडून पैसे हरवले त्याचा तुला आणि मला किती त्रास आणि दुःख  झाले माहित आहे ना? असाच त्रास आणि दुःख ज्या व्यक्तीचे पैसे हरवले असेल त्याला झाले असेल. प्रत्येक जण खूप कष्ट करून,रक्ताचे पाणी करून पैसे कमावत असतो आणि जेव्हा ते हरवतात तेव्हा खूप वाईट वाटते. असे मिळालेले पैसे आपल्याला क्षणिक आनंद देत असतील पण लाभत नाहीत."

आईचे ते शब्द ऐकून मी निमूटपणे बाहेर पडलो, मंदिरातील दानपेटीत ते पैसे टाकले. आता माझ्या मनात त्या पाच रुपयाबद्दल काहीही ओढ नव्हती. मी देवाला हात जोडले आणि प्रार्थना केली.

त्यानंतर अनेक घटना घडल्या. भुरळ पडण्याचे  प्रसंग आले. अडचणीचीही  परिस्थिती आली, पण तरीही दुसऱ्यांच्या पैश्याला हात लावण्याची  इच्छा  कधी झाली नाही. मुळात जे आपले नाही त्याला हात लावायचा नाही, उलट दुसऱ्यांना मदतच करायची. जेव्हा आपण काही दुसऱ्यांना देतो त्याच्या दुप्पट प्रमाणात ते आपल्याकडे परत येते याची प्रचिती मला खूपदा आली. 

एकेकाळी पाच रुपये हरवलेत, त्या हरवलेल्या पैश्यांची मोठा धडा दिला. पाच रुपये असेच मिळाले, पण दोन्ही घटनेमध्ये संपूर्ण आयुष्याची शिकवण मला मिळाली. पाच रुपयाची किंमत कळली, पण त्याहीपेक्षा पाच रुपयांनी शिकवलेले मूल्यशिक्षण पुढील आयुष्यात मला खूप पुढे घेऊन गेले.

आई-वडिलांनी यापेक्षा अजून काय द्यायला हवे? करोडच्या संपत्तीपेक्षा महत्वाचे असणारे मूल्यशिक्षण आणि स्वतःच्या जोरावर यशस्वी होण्यासाठीचे आवश्यक कौशल्य आपल्याकडे वारसाहक्काने येत असतात. 

त्यातून आपण काय घेतो हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे.   

विनोद बिडवाईक

(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत.  इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन वर उपलब्ध आहेत.) 

1 टिप्पणी:

  1. आयुष्यातील सर्वात उच्च शिक्षण म्हणजे मुल्य शिक्षण याची प्रचिती देणारा लेख. सर्व पिढ्यांसाठी अतिशय उपयुक्त असा अप्रतिम लेख.

    उत्तर द्याहटवा