घरातले काम आटोपल्यावर आई तासन तास शिलाई मशीन वर बसून काम करत असे. आमचे छोटेसे गाव होतं. शिंप्याची अशी खूप कमी घरे होती गावात. चांगले कपडे शिवण्यात आई-बाबांचा हातखंडा होता. गावात त्यासाठी ते बऱ्यापैकी प्रसिद्ध होते. अर्थात त्याकाळी फारसे उत्पन्न नसे, त्यामुळे छोटी-मोठी शेतीची कामे पण आम्ही करत असू. आमच्याकडे अडीच एकर कोरडवाहू शेती होती. हि जमीन माझ्या मोठ्या भावाला सरकारकडून मिळाली होती, ते मिलिटरी मध्ये होते म्हणून. आम्ही तिला सिलिंग ची जमीन म्हणत असू. जीवनावश्यक वस्तू नक्की मिळत असत. परंतु सर्व आयुष्य कष्टाचे होते. पण सर्वजण समाधानी होते, सुखी होते. मुळातच आमचे गाव खूप लहान असल्यामुळे एकमेकांसोबत बरे संबंध होते, चांगले मी म्हणणार नाही, कारण गावातील प्रत्येकाचे वेगवेगळे आपापले व्यवहार असायचे. पण गरज पडली तर मदतीला धावून येणारे होते. आई आणि बाबांकडे गावातील बरेच लोक आपले, मुलांचे कपडे शिवून घ्यायला येत असत. लहान बाळाच्या टोप्या, झबले, चंची, ब्लाउज, चोळी इत्यादी ती सफाईने शिवत असे. माझे वडील पुरुषांसाठी असणारी सर्व प्रकारची कपडे शिवत असत.
हे करत असताना मला आई-बाबांकडून जीवनाचे मूल्य शिक्षण मात्र निश्चितच मिळाले.
त्यादिवशी आईंने घाईघाईने स्वयंपाक तयार केला आणि छान झबले शिवायला घेतले. थोड्यावेळाने गावातील एक बाई जी आईची नेहमीचे गिऱ्हाईक होते, ती आली. तिचे दोन झबली तयारच होती. आईने ती झबली तिला दिले. बाई पैसे देऊन निघून गेली. बऱ्याचदा काही गिऱ्हाईक उधारीवर आपले कपडे घेऊन जायचे पण काही चांगले गिऱ्हाईक तेव्हाच्या तेव्हा कामाचे पैसे द्यायचे.
आईने मला बोलावले आणि मला सांगितले की "जा हे पाच रुपये घे आणि गुजरी मध्ये जाऊन कोथिंबीरची जुडी, अर्धा किलो बटाटे आणि अर्धा किलो कांदे घेऊन ये. अर्थात पाच रुपयात हे सर्व त्यावेळी शक्य होतं. स्वस्ताई होती त्यावेळेस. गुजरी म्हणजे नदी पलीकडच्या गावातील बाजारपेठेचे ठिकाण. माझे गाव घोडगाव आणि पलीकडील गाव कविठा. दोन्हीही गावें बाहुरडा ह्या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या नदीने विभागले गेले होते. नदीला बारामाही पाणी असायचे. अंतर फारसे नसायचे. माझी शाळा सुद्धा नदीच्या पल्याड होती. सुट्टीचे दिवस होते त्यामुळे आईने दिलेले पैसे मी माझ्या खिशात टाकले आणि बाजारात जायला निघालो. घराच्या बाहेर पडल्यावर टंगळमंगळ करत माझे प्रस्थान बाजाराकडे निघाले. रस्त्यात माझे बरेच मित्र भेटले. अभ्यासाबद्दल, खेळाबद्दल इतरच्या गप्पा झाल्या. खूप वेळ निघून गेला तसे मला अचानक माझे काम आठवले काम आठवले. मी तसाच पळत बाजारात गेलो.
ओळखीच्या आणि नेहमीच्या दुकानदाराकडे गेलो. त्याचे नाव होते शिवा देशमुख. शिवा आमच्या घराच्या मागच्या बाजूने राहायचा. त्याची मोठी बागायती शेती होती. त्याची वडिलोपार्जित शेती नदीकिनारी होती आणि शेतीमध्ये विहीरपण होती. त्यामुळे त्याच्याकडे हिरव्यागार पालेभाज्या, फळं फळावळ, आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या उपलब्ध असायच्या.
मी घाई घाईत शिवाला भाज्यांची ऑर्डर दिली. शिवाने सर्व वस्तू माझ्या पिशवीत टाकल्या आणि त्याने पैशासाठी माझ्यासमोर हात पसरले. मी जेव्हा खिशात हात घातला, तेव्हा पाच रुपयाची नोट काही हातात येईना. दुसऱ्या खिशात हात घातला, नोट नव्हती, सर्व कपडे चाचपून बघितले ,पण पाच रुपयाची नोट मला सापडली नाही. माझी नोट हरवली होती हे मला जाणवले. आता पुढे काय वाढून ठेवले असावे ह्याचा मी विचार करू लागलो. मी शिवाला सांगितले की, "शिवा भाऊ हे पाच रुपये लिहून ठेव. मी नंतर पैसे आणून देतो". हात लेका, म्हणून शिवाने पैसे लिहायला वही हातात घेतली.
ज्या रस्त्याने मी आलो होतो त्या रस्त्यावर कुठे पैसे पडले असावेत म्हणून ते परत मिळतात का ते बघावे म्हणून मी खाली मान घालून निघालो. माझे काही मित्र अजूनही खेळत होते. त्यांना मी दिसलो पण आता माझे लक्ष संपूर्ण रस्त्यावर होते. माझी मान खाली होती आणि मी रस्ता माझ्या नजरेने स्कॅन करत निघालो होतो. एक दोघांनी मला हाक पण मारली पण आता माझे लक्ष त्यांच्याकडे मुळीच नव्हते. दोन-तीन वेळा मी त्या रस्त्यावरून चक्कर मारून पैसे शोधायचा प्रयत्न केला. पण मला पैसे काही मिळाले नाहीत.
आपले पैसे हरवले आहेत ते परत मिळणे कठीण आहे ह्या नित्कर्षाप्रत मी आता आलो होते. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट करायची होती; ती म्हणजे माझ्याकडून "तू दिलेले पाच रुपये हरवले" हे सत्य आईला सांगणे. यावर काय प्रतिक्रिया येईल याचा विचार मी करू लागलो.
"अरे वा आलास का? आणि एवढा उशीर का लावला? अरे मुर्खा मला भाजीला फोडणी द्यायची होती आणि म्हणून मी तुला कोथिंबीर लवकर आणायला सांगितले होते. बर जाऊ दे ती ती पिशवी आता. केवढ्याचा झाला हा सर्व माल?" तीने मला विचारलं.
मी चाचपडत म्हणालो, "आई, शिवा भाऊ ने पैसे लिहून ठेवले."
तिने विचारले, "का? तुला पाच रुपये दिले होते ना? त्याचे काय झाले? काय घेतले?"
मी कचरत बोललो, "ते पैसे कुठेतरी हरवले. बाजारात जात असताना."
"काय?" आईने जोरात ओरडून विचारले, "हरवले?"
माझ्या गालावर जोराची चपराक बसली. माझ्या डोळ्यात पाणी आले.
"एवढे कष्ट करून आम्ही पैसे कमावतो, आणि काळजी न घेता तुम्ही ते हरवता." आईने अजून दोनतीन थपडा गालावर दिल्या.
"एवढे काय त्यात? मी काय मुद्दामून हरवले काय? " मी भोकांड पसरले. मला वाटले भोकांड पसरल्यामुळे आईचा राग थोडा कमी होईल पण तो जरा जास्तच वाढला आणि तिनेअजून एक फटका पाठीवर मारला.
"जा, शोध आता, परत, कोठे पडले असतील तर सापडतील." तिने मला परत बाहेत पिटाळले.
आता मी शोधायचे काम दोन तीन वेळा आधीच केले आहे हे कसे सांगणार? मी परत बाहेर पडलो. मघाशी जे मित्र भेटले होतो त्यांना भेटलो, त्यांना विचारले कि त्यांना काही पैसे सापडले का म्हणून. परंतु ते पाच रुपये मला कोठेच मिळाले नाहीत. खिश्यातुन ते असे गायब झाले होते कि कोणीतरी जादू केली असावी. मला त्या पाच रुपयाचा खूप राग आला. बरे त्याने माझ्याच खिशातून का गायब व्हावेत? थोडी वाट बघितली असती आणि शिवा च्या गल्ल्यातून गेले असते तर शिवाला काहीही फरक पडला नसता. असो.
मग बाबा घरी आलेत, त्यांनी थोडे समजावून सांगितले. आईचा राग पण कमी झाला. "पैसे, कमी किंवा जास्त नसतात. त्याची किंमत करायला शिकावी." असे बाबा मला म्हणाले.
अर्थात त्यादिवशी पाच रुपयांची किंमत मला पूर्ण समजली. आता मध्ये मध्ये शर्ट आणि पॅन्ट चे खीसे चाचपडणे माझी सवय झाली आहे. खिश्यात असणाऱ्या सर्व वस्तू सुरक्षित आहेत ना, हे मी नेहमी बघत असतो. एक मात्र खरे की त्यानंतर माझ्याकडून अजून तरी काहीही हरवले नाहीये. पैसे तर दूरची गोष्ट आहे.
खूपच सुंदर, अप्रतिम मांडणी!
उत्तर द्याहटवाघटनाक्रम डोळ्यासमोर उभा राहतो.
अप्रतिम
उत्तर द्याहटवालहान पण पुर्णपणे उभ्रहिल.