रविवार, २५ एप्रिल, २०२१

रँडम ग्रेड

शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांची मोठी सभा भरली होती. काही जण डबल बार वर बसले होते, काही जण खाली, काही जण जवळच्या पारावर. हे सर्व विद्यार्थी आठवी आणि नववीचे होते. विषय गंभीर होता. प्रत्येक जण तावातावाने बोलत होता, आपल्यावर अन्याय झाला असे त्यांना वाटत होते. ह्या विद्यार्थ्यांत काही विद्यार्थी असेही होते की ते मनापासून ह्या सभेत सहभागी झाले नव्हते. परंतु काही विद्यार्थ्यांनी भावनिक आवाहनाद्वारे, अर्थात भीती दाखवून सर्वाना एकत्र आणले होते. उद्या तुमचे काही प्रश्न निर्माण झाले, कोणी तुम्हाला मारले, तर आमच्याकडे येऊ नका, आम्ही तुम्हाला मदत करणार नाही असे ते भावनिक आवाहन होते.

विषय पिटी कम स्पोर्टच्या सोनार सरांनी दिलेल्या ग्रेड चा होता. सोनार सर, असे काही बाही करत असत. ते बऱ्याचदा शाळेत येत नसत. मद्यप्राशन हे त्यांचे आवडीचे पेय होते आणि शिट्टीच्या दोरीने पायावर फटके मारणे हा त्यांचा छंद. शिट्टीच्या दोरीचा कंटाळा आला तर ते कधी कधी कंपाउंडच्याजवळ असणाऱ्या झाडाचे हिरवे फोक वापरत असत. तेव्हा ते पायांपेक्षा, पाठीवरच जास्त पडत असत. अर्थात त्याच्याजवळ हुशार, मठ्ठ, गरीब, श्रीमंत, जातपात असा काही भेदभाव नसे. त्यांच्यासमोर जो असेल आणि हातात जो येईल, त्यांच्यावर ते आपली कृपा करत असत. 

तर ह्या सोनार सरांनी आठवी आणि नववीच्या सर्व मुलांना सहामाही मध्ये ज्या ग्रेड दिल्या होत्या त्या खेळातील, इतर मैदानी उपक्रमातील आणि एक्सट्रा कॅरिक्युलर कार्यानुभवाच्या कामगिरीचा, विध्यार्थ्यानी घेतलेल्या प्रयत्नांचा विचार न करता, कामगिरीचा कोणताही निकश न लावता, रॅन्डमली, ग्रेडस दिल्या होत्या. 

अर्थात आतापर्यंत आम्ही ह्या ग्रेड कडे कधीच लक्ष दिले नव्हते. विद्यार्थी याबाबत सरांवर विश्वास ठेवत असत. स्पोर्ट्स आणि कार्यानुभव मध्ये कोणतीही ग्रेड मिळाली की त्याचे सुख दुःख नसायचे. त्यामुळे आताच हा विषय का तापला? 

त्याचे झाले असे की सोनार सर ज्या घरात भाडयाने राहायचे, ते घर राजेश तनपुरे ह्याच्या काकाचे होते. एका संध्याकाळी, सोनार सर नुकतेच गावाच्या बाहेर असणाऱ्या बाबू तावडेच्या खुल्या आवारातील गावठी मदिरालयात जाऊन आले होते. घराच्या बाहेरील ओट्यावर ते बसले होते. अर्थात त्यांची मस्त तंद्री लागली होती. घेतलेल्या स्पिरिट ने त्यांना स्पिरिच्युअल उंचीवर नेवून ठेवले होते. राजेश तेथेच होता. 

 "काय सर, मजेत ना." राजेश ने विचारले,

"हे तू मला काय विचारतोस? मी तर मजेतच असतो, तू काय करतोस? सहामाहीच निकाल कसा आला तुझा?" त्यांनी हसत विचारले.

"काय सर, माझा निकाल असा काय सांगण्यासारखा असतो का? पण एक प्रश्न आहे," राजेश,

"हं, विचार,"

"स्पोर्ट्स आणि कार्यानुभव ह्या रकान्यात "D" असे लिहिले आहे. असे का? मी तर शाळेचा कब्बडीच्या टीम चा कॅप्टन आहे." राजेश ने विचारले. 

"ते तसेच असते, मी कोणाला काहीही ग्रेड देतो. रॅन्डमली," ते हसत उत्तरले,

" रॅन्डमली? पण का?" राजेश ने थोडे रागावून विचारले. 

"To teach you students that life is unfair." ते एक तत्ववेत्त्याच्या आवेशात बोलले.  "आयुष्य हे कठीण आहे बाळा. तुला जे योग्य वाटते ते दुसऱ्याला अयोग्य वाटू शकते आणि तुला जे अयोग्य वाटते ते योग्य." 

"पण का?" राजेश वैतागत बोलला.  

"तू योग्य असला तरी कोणीतरी तुला अयोग्य दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि अयोग्य व्यक्तीला योग्य. नियती नेहमीच न्याय्य असते असे नाही." सरांची वाणी आता अमृतरस पाझरू लागली होती. 

"ती नियती गेली खड्ड्यात, ग्रेड काय असे रॅन्डमली देतात का कधी? ते जावू द्या, तुम्ही हे बदलून देणार का नाही?" राजेश आता रागावला होता. 

"नियती कधीही बदलत नसते." आतून बायकोने जेवायला या, असा आवाज दिला म्हणून सर घराच्या आत गेले. 

राजेश चडफडत घरी गेला. त्याने ठरवले की, रॅन्डमली ग्रेड देणे अन्याकारक आहे आणि आपण आवाज उठवलाच पाहिजे. सरांच्या ह्या रँडम फॉर्मुल्यामुळे मात्र काही विद्यार्थीचा फायदाही झाला. स्पोर्ट्स मध्ये यथातथा असणाऱ्या विद्यार्थीना चांगली ग्रेड मिळाली होती.   

सरांचा रँडम फॉर्मुला सगळीकडे पसरला. ही बातमी ऐकून मग प्रत्येकाने आपले गुणपत्रक तपासून बघितले. सरांच्या विरुद्ध आता जनमत तयार होऊ लागले. एके दिवशी शाळा सुटल्यावर सभेचे आयोजन निर्णय आले. 

राजेश ने आवेशपूर्ण भाषण दिले, सर्व माहिती विद्यार्थीना दिली. शेवटी त्याने सरांच्या निषेधाची घोषणा दिली. 

"सोनार सरांचा...' ह्या घोषणेवर काहीजणांनी "निषेध असो, तर काहीजणांनी विजय असो" असा प्रतिसाद दिला. कदाचित ज्यांना A, B ग्रेड मिळाल्या त्यांनीच विजयाच्या घोषणा मुद्दामून दिल्या असाव्यात.

दुसऱ्यादिवशी काही विद्यार्थी सोनार सरांकडे गेले. त्यांना ग्रेड परत तपासून देण्याची विनंती केली. त्यांनी ती नेहमीप्रमाणे धुडकावून दिली. शेवटी सर्वजण मुख्याध्यापकांना साकडे घालायला गेले. त्यांनी सर्वाना ऐकून घेतले आणि ह्यावर योग्य तोडगा काढण्याची ग्वाही दिली.

कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द झाली ही बातमी प्रसिद्ध झाली; विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करून निर्णय घेण्यात येईल असेही सांगण्यात आले. ह्या प्रक्रियेत ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभर मन लावून अभ्यास, तयारी केली असेल, त्याच्या मनात काय द्वंद असेल हे आपल्याला खरंच माहित नाही.

सरांनी आम्हाला "Life is unfair" चा धडा नक्की दिला. परंतु ह्या विध्यार्थ्यांना सोनार सरांसारखे रँडम ग्रेड देणारे शिक्षक न भेटो हीच शुभेच्छा!

रविवार, १८ एप्रिल, २०२१

बेयंत सिंगला शिक्षा

अभ्यासाव्यतिरिक्त इतर अवांतर अश्या गोष्टी शाळेत फारश्या नसत. शाळा सुरु झाली की प्रार्थना, राष्ट्रगीत, प्रतिज्ञा झाली की मग शाळेचे तास सुरु होत आणि सायंकाळी पाचपर्यंत चालत असत. शनिवारी पीटी चा तास असे. आमचे पीटीचे सर मनात आले तर कवायती घेत असत. खूपदा ते मद्य पिऊन बाहेर कोठेतरी पडलेले असत. वर्षातून कधीतरी क्रीडा स्पर्धा होत असत, कबड्डी, व्हॉलीबॉल, रिंग, खो खो असे ते खेळ असत. मग त्याची प्रॅक्टिस शाळा संपल्यावर होत असे. व्हॉलीबॉल हा माझा आवडता खेळ. मुख्यतः मी सर्व्हीस करत असे. 

प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्रदिन साजरे होत असत तेव्हा काही कार्यक्रम होत असत. मी शाळेच्या बँडपथकात होतो. मला तो मोठा ढोल वाजवायला आवडत असे, पण सरांनी बासरीवादनाचे काम आम्हा मुलाकडे दिले होते. ती स्टीलची बासरी मला कधीच वाजवता आली नाही, टीमवर्कचा एक फायदा असतो. इतरांच्या सुरात सूर मिळवून मी ती बासरी वाजवत असे. प्रजासत्ताक दिनानिमित्त एक हस्तलिखित विशेषांक निघत असे. माझे अक्षर त्यावेळेस खूप छान होते, ह्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही, पण माझ्या शुद्धलेखनाच्या वहीला पारितोषिक मिळालेले आहे. माझे अक्षर चांगले असल्यामुळे, विशेषांकाचे हस्तलिखित लिहिण्याचे काम माझ्याकडे आणि इतर चांगले अक्षर असणाऱ्या विद्यार्थ्याकडे येत असे. 

हे सर्व सोडले की मात्र आम्हाला अभ्यास एके अभ्यास असे. गावातील इतर मुलांना फारसे अभ्यासाबद्दल काही वाटत नसे. पण शाळेतील हुशार मुलाकडून फार अपेक्षा असायच्या. 

कधीतरी जेव्हा आम्ही दुसऱ्या मोठया गावात किंवा शहरातील शाळेत शिष्यवृत्ती, जिल्हास्तरीय गणित, ड्रॉईंग वगैरे परीक्षेसाठी आम्ही जात असू, तेव्हा त्या मुलांचा चुणचुणीत पणा बघून आम्हाला न्यूनगंड वाटत असे. काय मस्त बोलायची ती मुले. वादविवाद स्पर्धा, कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा ह्या केवळ आम्ही ऐकून असायचो. शाळेत ह्या गोष्टी आयोजित करणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे असा आमच्या शिक्षकांचा समज होता.

आमची शाळा ज्या संस्थेची होती त्या संस्थेच्या मुख्य कार्यालय आणि मोठी शाळा ज्या ठिकाणी होती त्या करजगाव गावी एक विज्ञानप्रदर्शन आयोजित केले गेले होते. रसायनशास्त्रIच्या काकड सरांनी ठरवले की मी ह्या प्रदर्शनात भाग घ्यावा. सोबत वरच्या वर्गातील दोन विद्यार्थ्याना पण त्यांनी तसे सांगितले. आम्ही खूप चर्चा केली, परंतु काय करावे हे कळत नव्हते, शिवाय प्रयोगासाठी सामुग्री जमा करणे हे मोठे काम होते. 

त्यावेळेस देश्याच्या पंतप्रधान इंदिरा गांधींचा नुकताच खून झाला होता. बेयंत सिंग ह्या मारेकऱ्याला अटक करण्यात आली होती. ह्या बेयंत सिंग बद्दल आमच्या मनात कमालीची चीड होती. विषय ताजा होता. 

चर्चेच्या दरम्यान मी म्हणालो. "आपण बेयंत सिंग ला शिक्षा देण्याचा प्रयोग करू या."

"चल काहीतरीच, हा काय प्रयोग आहे? तू काय फाशीचा प्रयोग दाखवणार आहेस?" एकाने विचारले.

"नाही, आपण फाशी नाही द्यायची."

"मग?"

काकड सरांनी नुकतेच वेगवेगळे वायुरूप पदार्थ जसे, ऑक्सिजन, कार्बनडायऑक्साईड, हायड्रोजन क्लोराईड तयार करण्याचे प्रयोग करून दाखवले होते. 

"आपण त्याला, कार्बनडायऑक्साईडने मारायचे."

"कसे?"

"आपण कार्बनडायऑक्साईड आणि इतर वायू बनवायचे. कार्बनडायऑक्साईड नळीने एक जार मध्ये सोडायचा, आणि त्या जार मध्ये बेयंत सिंग ला बुडवून ठेवायचे. सोबत आपण वेगवेगळे वायू बनवायचे, त्याचे प्रयोग दाखवायचे आणि शेवटचा प्रयोग हा दाखवायचा. हे वायूद्रव बनायची पद्धत आणि त्याचा उपयोग सांगायचा आणि मग कार्बनडायऑक्साईड ने बेयंत सिंग ला मारायचे." मी माझा प्लॅन सांगितला.

"आणि बेयंत सिंग ला कोठून आणणार?" राजेश ने प्रश्न विचारला 

"सरदारजीची बाहुली आहे माझ्या बहिणीची." विजय उत्तरला. 

खरंतर आमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या साधनात हाच प्रयोग शक्य होता. वायू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आम्ही शाळेतून घेणार होतो. सरांना हि कल्पना सांगितली.  त्यांना ती फारसी आवडली नसावी पण आम्ही हे सर्व प्रयोग एवढ्या उत्कटतेने सांगितले की त्यांनी आमच्या ह्या प्रयोगाला सहमती दिली. 

आम्ही तयारी सुरु केली. वायू तयार करण्याचे साहित्य, प्रक्रिया ह्यांचे हस्तलिखित पोस्टर्स बनवले. त्याचबरोबर, "बेयंत सिंगला शिक्षा. बघण्यासाठी भेट द्या स्टॉल न. १२, आयोजक म्हणून आम्ही आमचे आणि शाळेचे नाव टाकले. आमची तयारी पूर्ण झाली. आम्ही प्रदर्शनाच्या गावी गेलो. आदल्या रात्री आम्ही आमच्या मुख्याध्यापकांच्या घरी मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी प्रदर्शनस्थळी जाऊन प्रयोगाची मांडणी केली, पोस्टर्स लावले. प्रवेशद्वाराजवळ बेयंत सिंग च्या शिक्षेचे पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. 

थोड्या वेळाने प्रदर्शनाचे उदघाटन झाले. प्रमुख पाहुणे आले, त्यांनी जुजबी माहिती करून घेतली. हळूहळू इतर विध्यार्थी, पालक, नागरिक येऊ लागले. मोठ्या नाटकीपणे दर अर्ध्यातासांनी आम्ही वायू कसे बनतात त्याचे प्रात्यक्षिक देऊ लागलो. प्रयोग झाल्यावर मग विजय मोठया आवाजात नाटकी आवाजात जाहीर करे, "आता बेयंत सिंग ला आपण कार्बनडायॉक्साईड देऊन शिक्षा देऊ या." असे म्हणत तो सरदारजीच्याची बाहुली पाण्याचा जार मध्ये वरून खाली ढकलत असे, त्याच्या नाकातून बुडबुडे येत. मग आम्ही त्या जारमध्ये कार्बनडायॉक्साईड सोडत असे, हवेच्या दबावामुळे बेयंत सिंग गटांगळ्या खात असे. आणि थोड्या वेळाने, बुडबुडे संपून तो तळाला लागत असे.

आमचा हा प्रयोग तुफान प्रसिद्ध झाला. प्रदर्शनातील इतर प्रयोग खूप चांगले होते. काही शाळांनी आणि विद्यार्थ्यांनी पैसे खर्च करून छान मॉडेल्स बनवले होते, त्यांचे प्रयोगही उत्कृष्ट होते. परंतु आमचा प्रयोग लोकप्रिय ह्या प्रकारात मोडणारा होता. सगळीकडे बेयंत सिंगची शिक्षा हा चर्चेचा विषय झाला होता. गावातील मोठी माणसे, बायबापूडे, हा प्रयोग बघायला मोठी गर्दी करू लागली. दोन दिवसांनी प्रदर्शनाचा निरोप होता आणि उत्कृष्ट प्रयोग, मॉडेल ला पारितोषिक जाहीर होणार होते. 

"बेयंत सिंगला शिक्षा" ह्या प्रयोगाचा उल्लेख प्रत्येक भाषणात होता. परंतु जेव्हा पारितोषिक जाहीर व्हायला लागले, तेव्हा मात्र आमचे नाव येत नव्हते. पहिले, दुसरे, तिसरे, उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर होत होते. आमचे नाव कोठेच नव्हते. आम्ही तिघेजण निराश होऊन, चेहरे पडून बसलो होतो. आपला प्रयोग एवढा प्रसिद्ध होऊन सुद्धा आपल्याला काहीच कसे नाही? ह्याचा विचार करून आम्ही नाराज झालो. 

शेवटी उद्घोषकाने आमचे आणि आमच्या शाळेचे नाव जाहीर केले. आम्हाला विशेष पारितोषिक जाहीर झाले होते. तुफान टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाजात मोठ्या अभिमानाने आम्ही पारितोषिक घ्यायला व्यासपीठावर गेलो.   

(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत.  इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन वर उपलब्ध आहेत.)