मंगळवार, ११ डिसेंबर, २०१८

एका साप्ताहिकाचा मृत्यू

मी, माझे तीन मित्र, माझा मोठा भाऊ आणि त्याच्या वयाचा त्याचा एक मित्र. त्यात माझे दोन मित्र एका गावातल्या एका वृत्तपत्रात नोकरी करतात. त्यांचा संपादक किती "डॅम्बीसआहे आणि मालक कसा  "चोर आहे याबाबत त्यांचं एकमत आहे. तिथली वृत्तपत्र ‘XXX प्लस’ या गटात मोडतात. याबाबत त्यांना आणि माझ्या भावाच्या मित्रालाही शंका नाही. मी मात्र वृत्तपत्र राष्ट्रीय स्तरावरच्या मासिकातून मजकूर कॉपी करून लिहितात म्हणून नाराज आहे. भावाचा मित्र अधूनमधून ‘पत्रकारही अतिशय नतद्रष्ट आणि आतल्या गाठीची जमात असते,’ हे त्याच्या एका दूरवरच्या काकांचं वाक्य वारंवार ऐकवतो.

‘राजकारणी नसते, तर पत्रकार उपाशी मेले असते,’ असं एकजण वारंवार सांगतो; पण तो रसायनशास्त्राचा पदवीधर आहे. तसाच तो एका वृत्तपत्रात वितरण विभागात सहव्यवस्थापकही आहे. सकाळी साडेचार वाजता उठून बाहेरगावी जाणारे पेपरचे गठ्ठे मोजावे लागतात म्हणून अख्खे जग त्याच्या वाईटावर टपलं आहे, असं त्याला वाटतं. भावाचा मित्र कॉमर्सचा पोस्ट ग्रॅज्युएट आहे. ‘तसल्या’ एका छायाचित्र मासिकाच्या विभागातील प्रमुखाच्या तृतीय सहाय्यकाची नोकरी त्याला चालून आली होती. पण बापानं आपल्या पोरगा कुठल्या मासिकात, काय करणार आहे म्हणून ‘ते’ मासिक चार ठिकाणी चौकशी करून आणलं, चाळलं आणि त्या मासिकाच्या कार्यालयाच्या आसपासही फिरकायचं नाही, असा दम देऊन टाकला. ‘प्रगतीचे खरे शत्रू आपले पालकच असतात,’ असं सुभाषित माझा मित्र प्रत्येक चर्चेत तेव्हापासून ऐकवतो. माझ्या मित्रांपैकी एक बारावी पास आहे. घरी 14 म्हशी आहेत. त्यांच्याकडे लक्ष देणारं कोणीच नव्हतं म्हणून शिक्षण सोडलं, असं त्याचं म्हणणं आहे. पण आपल्यात खूप संपादकीय क्षमता आहे, असं त्याला वाटतं.

ही सर्व मंडळी नेहमीच्या हॉटेलमधल्या कोपर्‍यात टेबल अडवून माझ्यासोबत चर्चा करत होती.
विषय होता एक नवीन साप्ताहिक काढायचा. ‘साप्ताहिकाला नाव काय द्यायचं?’ आम्ही साप्ताहिक काढणार, असं निश्‍चित समजून माझ्या मित्राने सरळ मुद्द्याला हात घातला.
"पुणे पोस्ट’
"पुणे हेराल्ड’
"पुणे एक्स्प्रेस’
‘द  पुणे  गार्डियन’
‘वगैरे वगैरे...’

बिळातून उंदीर बाहेर पडावे अशी एकेकाच्या तोंडून प्रस्तावित नावे बाहेर पडू लागली. ‘नावाचं नंतर ठरवू. आपण प्रथम साप्ताहिकाच्या अर्थव्यवस्थेवर चर्चा करू. मी सोडून तुम्हाला सगळ्यांना वृत्तपत्रात काम करण्याचा अनुभव आहे. वितरण, जाहिरात, छपाई यातील अर्थविषयक समीकरणे तुम्हाला माहिती असतील.’ माझा भाऊ हुशार. त्याने तात्काळ सर्वांना प्रशस्तीपत्रक देऊन टाकलं होतं.

‘सर्वप्रथम आपल्याला दर आठवड्याला प्रारंभिक अवस्थेत किती प्रती काढायच्या हे ठरवलं पाहिजे.’ मी 
‘मीन्स प्रायमरी सर्क्युलेशन टार्गेट.’ एकजण. मराठीत सांगितलेलं कोणाला काहीही कळत नाही, असा त्याचा समज आहे.

‘एक लाख प्रती’ भावाचा मित्र. मी कोसळता कोसळता वाचलो. मी त्याच्याकडे बावचळून पाहिलं.
‘ हैदोस  मधील  चित्रं विसर... येथे मराठी साप्ताहिकाची चर्चा चालू आहे.’ भावाने त्याला जमिनीवर आणलं.
‘दोन हजार’ एक जण.
‘किती पानांचं?’
‘सोळा पानाचं टॅब्युलाईट साईज.’
‘मोठं होतं...’
‘लहान वाटतं. उलट तीस पानं पाहिजेत.’
‘तीस?’
‘मग हैदोसची , चाळीस असतात.’
‘छापायला खर्च किती येईल?’
‘दोन हजार प्रती गृहीत धरल्यावर प्रत्येक पंधरा पानाचं साप्ताहिक छापायला कागदासह दहा रुपये खर्च येईल.’
‘दहा  रुपये म्हणजे मग हे साप्ताहिक विकायचं केवढ्याला?’ माझ्या घशाला ताबडतोब कोरड पडली.
‘दहा  रुपये? अरे मग आपण ते विकायचे केवढ्याला. स्टाफचा पगार. संपादकाचा पगार वगैरे?’
‘मग तर साप्ताहिकाची किंमत तीस रुपयांवर जाईल. मग दोन हजारांतून चार प्रतीसुद्धा विकल्या जाणार नाहीत.’
‘खरं तर तीस  रुपयांचं काय, दोन रुपयाचं साप्ताहिकही विकणं कठीणच आहे पुण्यामध्ये. लोक साप्ताहिक वगैरे घेतच नाहीत,’ भावाचा मित्र. 
‘लोक किराणा सोडून स्वतःहून काहीच घेत नसतात. त्यांना विकत घ्यायला भाग पाडावं लागतं.’ इति म्हशीवाला मित्र.
‘आपल्याला सुरक्षित पद्धतीने नियतकालिक काढायचे असेल, तर आपल्याला दोन हजार वार्षिक सदस्य मिळवले पाहिजेत.’ मी.
‘ते कसे मिळवणार?’
‘प्रत्येकाने आपाल्याला अशा संबंधितांची यादी करायची. जे भाव न खाता वार्षिक वर्गणी देतील.’
‘पण तीस रुपयांचं साप्ताहिक घेणार कोण? त्यापेक्षा ते दहा रुपयांचं  हैदोस नाही का घेणार?’
‘हे साप्ताहिक जास्तीत जास्त सात रुपयांचं ठेवायचं.’
‘तोट्यात विकायचं?
‘नाही. छपाई व स्टाफचा पगार हा जाहिरातींतून वसूल करायचा. उरलेला निव्वळ नफा म्हणजे दर आठवड्याला दहा  हजार रुपये नफा.’ माझे डोळे लुकलुकले. मग त्या प्रीत्यर्थ तिसरा चहा आला.
‘आता छपाई व स्टाफ पेमेंट.’
‘दोन हजार रुपये प्रतींचे दहा रुपये प्रतींप्रमाणे 20 हजार रुपये.’
‘संपादकाचा पगार 10000 रुपये.’
‘काय? संपादकाला एवढाच पगार? माझा मित्र एवढ्या मोठ्यानं ओरडला की हॉटेलमधल्या बर्‍याच जणांनी एकाच वेळी वळून पाहिलं. 
‘मग?’
‘अरे, त्याला कमीत कमी पन्नास  हजार पगार नको का?’ मी.
‘किती? ’
‘पन्नास हजार.’
दोन मित्रांना भोवळ आली. मी त्यांना पाणी दिले. आणखी चहा मागवला. भावालाही श्‍वास लागला होता.
धक्का ओसरल्यावर काही वेळाच्या चर्चेने संपादकाचा पगार दहा हजार रुपयांपेक्षा जास्त नसेल हे ठरले. संपादकापेक्षा जाहिरात व्यवस्थापक महत्त्वाचा आहे, हे मला नव्याने कळले होते.
‘त्याला किती पगार?’
‘वीस  हजार.’
‘रिसेप्शनिस्ट.’ भावाचा मित्र.
‘ती कशाला?’
‘ती लागते ना!’
‘अरे, पण ती कशाला लागते?’
‘ती दुसरेही काम करेल की!’
‘ठीक आहे; पण ती पहिले कोणते काम करेल?’
‘इतर स्टाफचा खर्च दहा हजार रुपये धरू,’ माझ्या भावाने चर्चेवर पडदा पाडला.
‘म्हणजे 20000 + 10000+ 20000 = 30000.’
‘अधिक 3000.’ म्हशीवाला.
‘हे अधिक तीन हजार रुपये कसले?’
‘आकस्मिक खर्च.’
‘ठीक आहे. आकस्मिक तर आकस्मिक.’
‘म्हणजे दर आठवड्याला तीस हजार रुपयांच्या जाहिराती मिळवाव्या लागतील.’
बाप रे! मला पुन्हा भोवळ आली. विशेषांकाच्या जाहिराती गोळा करण्याचा अनुभव माझ्या गाठीशी होता आणि लोक सरळ बोलत नाहीत, हे मला माहिती होतं.
‘आता...’
‘आता काय?’ मी दुःखी अंतकरणाने म्हणालो. आमच्या साप्ताहिकाचे काय होणार हे मला कळले होतेच.
‘आता एका मासिकात एकूण जास्तीत जास्त 16 पाने धरली, तर एक तृतीयांश म्हणजे पाच पाने जाहिरातीची मिळतील. प्रत्येक पानाच्या जाहिरातीची किंमत 2000 रुपये धरली, तरी कितीही उठाठेव केली तरी जाहिरातींमधून दहा हजार रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळत नाही. म्हणजेच वीस हजार रुपयांची तूट.’ माझ्या भावाच्या विवेचनाने माझी पूर्ण हवा निघून गेली.
‘प्रशासकीय खर्चात...’ भावाचा मित्र.
‘कुठल्या खर्चात?’ मी. 
‘प्रशासकीय खर्चात दहा हजार रुपयांची कपात केली तरी दहा हजार रुपये प्रत्येक आठवड्यात तूट शिल्लक राहते. म्हणजे महिन्याला चाळीस हजार रुपये.’
‘असू द्या, असू द्या.’ साप्ताहिक काढायचे नाही, असे मी मनोमन ठरवून टाकले होते.
‘दर आठवड्याला दहा हजार रुपयांच्या जाहिराती मिळेलच असं नाही.’
पुढे मी ऐकलेच नाही. पुणे शहराची साहित्य व वृत्तसेवा करण्याचे व एका साप्ताहिकाचा मालक बनण्याचे मनसुबे त्या चहाच्या टेबलावर कोसळून पडले...

पंधरा कप चहाचे पैसे देऊन मी बाहेर पडलो. भावी साप्ताहिक  पुणे  गार्डियनचा जन्मापूर्वीच मृत्यू झाला होता.
‘आपण मधली पाने ‘हैदोस’ मासिकासारखी ठेवली, तर तुझा खप खूप वाढू शकतो.’ भावाचा मित्र पुटपुटला. आम्ही संतापाने त्याच्याकडे बघितलं.
तो हळूच सटकला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा