मंगळवार, ६ नोव्हेंबर, २०१८

लसीकरण

मी पहिलीत असतानाची गोष्ट असावी. आमच्या लहानपणी शाळेत वेगवेगळ्या लसी देण्याच्या कार्यक्रम असायचा. त्यावेळेस आपल्या मुलांना ह्या लसी देणे किती महत्वाचे आहे हे कदाचित पालकानाही माहित नसायचे. मग हि भूमिका सरकार पार पाडायचे. सरकारी डॉक्टर, नर्सेस आणि त्यांचे सहकारी सकाळी शाळेमध्ये ठाण मारून असायचे . शिक्षकांची आणि डॉक्टरांची लगबग असायची. स्टोव्ह पेटवला जायचा. अभ्यासाला सुट्टी म्हणून आम्ही खुश. पण आता हि माणसे आपल्याला काहीतरी टोचणार म्हणून दुसर्या बाजूने आम्ही चिंतेत. "एका डोळ्यात आनंदाश्रू आणि दुसऱ्या डोळ्यात दुखाश्रू " हि म्हण तेव्हापासूनच आम्हाला समजायला लागली. दोन्ही डोळे भरून यायचे. त्यात काही मुले ते वातावरण बघून आधीच भोकांड पसरायचे . काहीजण हे मी काय घाबरतोय ? म्हणून दंडाच्या बेडक्या पुढे काढून सज्ज असायचे. पण सर्व वातावरण एकंदरीत गंभीर असायचे . काचेच्या सिरींज आणि सुया पाण्यात उकडायला सुरुवात व्हायची. कासायासमोर ओढत नेण्याआधी बकऱ्यांची मनस्थिती आणि आम्हा मुलांची परिस्थिती यात काहीही  फरक असणार नाही याची मला खात्री आहे.

Related image
सहाय्यक कधी प्रेमाने तर कधी खेचत मुलांना सरळ रेषेत उभा करायचा. डॉक्टर हसत चेहऱ्याने , काहीजण गंभीर चेहऱ्याने दंडावर खसखस  स्पिरीट घासायचे. आणि टचकन सुई आत टोचायचे. पहिली, दुसरीतील ती मुलं वेदनेने किंचाळायची , काहीजण फक्त अश्रुच काढायची, तर काहीजण बलदंड मुलं शौर्याचा आव आणायची. त्यांच्या डोळ्यात मात्र टचकन पाणी यायचे. 

एकंदरीत वातावरण युद्धभूमीवरील वातावरांसारखे असायचे. पानिपतच्या युद्धातही अशी कत्तल मराठ्याची झाली नसेल. अश्याच एका लसीकरणाच्या कार्यक्रमा दरम्यान लसीकरण टीम शाळेत आलेली होती. ते बघून आणि पूर्वाश्रमीचा अनुभव लक्षात घेत, काही मुलांनी भोकांड पसरायला सुरुवात केली. मीही त्यातला एक. वय सुमारे चार अथवा पाच. गाव लहान. 

माझे वडील तेथून जात होते. रस्त्यावरून त्यांनी तो गोंधळ ऐकला. आत काय सुरु आहे म्हणून त्यांनी शाळेत डोकावून बघितले. बघतात काय तर माझ्या डोळ्यात अजून जास्त अश्रू. ते बघून ते सरळ आत आले, मला उचलून घेतले, माझे अश्रू पुसले. समजावून सांगितले. वडिलांच्या आश्वासक स्पर्शानी आणि साब्दानी माझी भीती पळून केली.

आपल्या मुलाचे अश्रू आपल्या आईवडिलांना नको असतात. अश्रू बघून त्यांच्या काळजात धासा होतं. मला आठवत , माझी पत्नी डॉक्टर असूनही, माझ्या मुलाच्या, तो एक वर्षाचा असताना, ब्लड टेस्ट करताना तचे डोळे डबडबले होते. 

आपल्या मुलांना जपणाऱ्या, त्यांच्या अश्रुने केविलवाणे होणाऱ्या आपल्या आईवडिलांचे महत्व कदाचित आपण जाणत नाही. जेव्हा ते जाणवते तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते.



विनोद बिडवाईक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा