शनिवार, ३ नोव्हेंबर, २०१८

चला पेट्रोल वाचवू या

पेट्रोलचे भाव दररोज वाढत असल्यामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. आखाती देशातील परिस्थिती मुळे भारतासारख्या राष्ट्रांना तेल, पेट्रोल-डिझेल मिळणं कठीण झाले. प्रसार माध्यमांना नवीन विषय मिळाला. ‘पेट्रोल वाचवा, ऊर्जा वाचवा,’ ‘हे करा, ते करा,’ ‘असं करा, तसं करा,’ यासारख्या जाहिरातींनी हैदोस घातला. सरकारने आखाती अधिभार लावला. (आता तो अधिभार पुढे कमी होणार की नाही हा प्रश्‍न अलाहिदा) मंत्री जनतेला उपदेश करू लागले. (लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण)

थोडक्यात सांगायचं झाल्यास, पेट्रोलटंचाई  निर्माण झाली. पेट्रोलपंपावर मोठ्या रांगा लागल्या. पेट्रोल मिळणं कठीण झालं.

Related imageतर रोज-रोज ऐकून, वाचून मीसुद्धा पेट्रोल वाचवायचं ठरवलं. मी रोज स्कूटरने ऑफिसला जातो, त्याऐवजी बसने जायचं ठरवलं. शेवटी पेट्रोल महत्त्वाचं होतं. तर मी पेट्रोल वाचविण्याचा निर्णय घेतला. सकाळी ऑफिसला जाण्यासाठी तयार झालो. मी ऑफिसला बसने जाणार हे ऐकून माझी धर्मपत्नी तर हसायलाच लागली.

‘काय म्हणता! बसनं जाणार आणि तुम्ही? ’
‘त्यात काय झालं? मी काय बसने जाऊ शकत नाही?’
‘जा बसने जा, आणि सांभाळून जा. घ्या हाही एक अनुभव.’ माझ्या कोणत्याच कल्पनेला ती पाठिंबा देत नाही, तिची ती वाईट खोड.
‘अगं, पेट्रोल वाचवायला हवं आता. पेट्रोलचा साठा संपत आलाय. देश वाचवायला हवा,’  देशप्रेमी मी म्हणालो.
‘देशाची काळजी तुम्ही कशाला करता? ते स्थिर सरकार समर्थ आहे काळजी करायला. निघा लवकर, नाहीतर बस मिळणार नाही.’

बसस्टॉपवर जात असताना लिमये भेटले. हा लिमये अपशकून करायला एका पायावर तयार.
‘काय साहेब आज पायीच? स्कूटर विकली काय?’ तोंडभर हसत लिमयानं विचारलं.
‘नाही हो, थोडं पेट्रोल वाचवून देशाला मदत करावी म्हणून आज बसनं जायचं ठरवलं.’  मी माझी अभिनव कल्पना सांगितली.
‘वा ! देशाला मदत करणार! करा,’ असं म्हणतं, हसतं लिमये निघून गेला.

या लोकांना काही समजतच नाही. दुसर्‍याच्या चांगल्या कामाचं कोणी कौतुक करत नाही. उठसूठ कर टीका, हेच काय ते त्यांचे काम. बस्स!

धापा टाकीत बसस्टॉपवर पोहोचलो. तर भलीमोठी रांग होती. त्यात शाळेला जाणारी मुलं होती. कॉलेजला जाणारे युवक-युवती होत्या. वृद्ध होते. त्याचप्रमाणे भाजीपाल्याच्या टोपल्या घेऊन जाणारे महाभागही होते. मधेच रांगेतील जागेबद्दल कुरबुरी चालू झाल्या, मी रांगेत उभा राहिलो. रोज बसनी येणार्‍यांबद्दल मनात आदर उत्पन्न झाला. दोन तास ताटकळत उभं राहिल्यावर बस आली. जेमतेम दोन माणसं आत गेल्यावर कंडक्टरनं डबल बेल दिली.


बापरे! म्हणजे अशी दोन-दोन माणसं बसमध्ये गेल्यावर मला आज ऑफिसला पोहोचताच आले नसते. ऑफिस सुटल्यावर मी ऑफिसला गेलो असतो. पण नाही, काही का असेना पेट्रोल वाचविणे महत्त्वाचे होते. सर्व लोक इंच-इंच भूमी लढवीत पुढे सरकत होते. एकदाचा कसाबसा बसमध्ये कोंबला गेलो.

माझी लॅपटॉप बॅग  सांभाळीत एका पायावर नव्हे बोटावर (पायाच्या) मी उभा होतो. अशा प्रकारे ऑफिसला जाण्याचा हा पहिलाच प्रसंग. एका पायावर उभं राहून माझ्या पायाला कळ लागली (असं म्हणतात की जुन्या काळी ऋषीमुनी एका पायावर वर्षानुवर्षे तपश्‍चर्या करायचे. मला तर त्या चक्क थापा वाटतात. किंवा त्यावेळी दिवसाला वर्ष तरी म्हणत असावेत.) पायाला कळ लागली म्हणून थोडं व्यवस्थित (?) उभं राहावं म्हणून मी स्वतःला सावरणार तोच माझ्या हातातली लॅपटॉप बॅग पुढं सीटवर बसलेल्या एका माणसाच्या डोक्यावर आदळली. मागचा-पुढचा विचार न करता त्यानं ती जोरात पुढं मारून फेकली. ती एका सुंदर यौवनेच्या तोंडावर बसली.

‘नीच, हलकटा, मेल्या’ सुंदर चेहर्‍यातून शिव्या बाहेर येऊ लागल्या. ती एवढी संतापली होती, की मला वाटले ती आता केस विस्कटून, जीभ बाहेर काढून त्या माणसाला मारायला येते की काय? येथे मात्र सर्व पुरुषांनी सुंदर स्त्रीदाक्षिण्य दाखविले. आणि त्या माणसावर यथेच्छ वाक्तताडन केले. प्रत्येकाने त्याला बोलून घेतलं.

इकडे माझी बॅग तुडवली जात होती. पूर्ण बसभर फिरल्यानंतर ती बस कंडक्टरजवळ येऊन पडली (आपटली). लॅपटॉप बॅगची अवस्था पाहून मला गहिवरून आले. 

‘कोणाची बॅग आहे ही? पुढं या. अजून बॅगा सांभाळता येत नाही,’ कंडक्टर कडाडला.
‘इकडे द्या,  म.. माझी आहे ती,’ मी म्हणालो.
‘व्वा राव..., या बॅगनं एवढा धुमाकूळ घातला आणि तुमचं लक्षच नाही.’ कोणीतरी ओरडलं. इथे मात्र सर्व पुरुष आता कंडक्टरच्या मदतीला आले. मघाचा तो माणूससुद्धा.
‘स्वतःची बॅग सांभाळता येत नाही तर आणतात कशाला?’  ‘केवढं टेंगुळ आलं,’ मघाची ती सुंदर तरुणी म्हणाली.

Related image

मी मात्र बावळटासारखा उभा होतो. एका पायाच्या बोटावर. शत्रुपक्ष चारी बाजूने कोंडी करून उभा होता. चक्रव्यूहात सापडलेल्या ‘अभिमन्यू’सारखी माझी स्थिती झाली होती. सर्वजण मनसोक्त बोलत होते. शेवटी दोन स्टेशनं अगोदरच मी उतरलो. तेथून पायी ऑफिसला जायला निघालो. एवढ्यात ‘काय साहेब? बसने आला वाटतं?’ राम शिपायानं तोंडभरून स्वागत केलं. 
‘हो, पण तू कसं ओळखलस?’ मी विचारलं.
‘सोप्प आहे साहेब, एक म्हणजे तुम्ही ऑफिसला उशिरा आलात. नंबर दोन तुमचे कपडे व्यवस्थित नाहीत आणि तुमचा चेहरा पार कोमेजून गेला आहे. खूप कटकट असते या बसची. मला विचारा ना. खूप अनुभव घेतला आहे मी या बसचा. पण तुम्ही बसने का आलात?’ 

‘देशापुढे पेट्रोलची मोठी समस्या आहे. थोडं पेट्रोल वाचवावं म्हटलं. म्हणून मग बसनं आलो,’ मी म्हटले. ‘मग किती वाचलं पेट्रोल? पेट्रोल वाचवा हे फक्त म्हणायचं असतं. वाचवायचं नसतं. बघा बरं आपलं साहेब आज पुण्याला गेले खासगी कामासाठी,’ रामूनं माझ्या अज्ञानाची कीव करत सांगितलं. 

‘साहेब यापुढे बसने येऊ नका. तब्येत बिघडेल. मी तरी बसच्या प्रवासाला कंटाळून शेवटी जुनी लुना घेतली.’ 
‘लुना? अरे पण पेट्रोल?’
‘पेट्रोलची गोष्ट सोडा, आपण मागेल तेवढे पैसे देतो ना पेट्रोलचे? बस मग!’ ‘पण तेवढे कष्ट तर वाचतात ना?’ रामूने माझं वाक्य मध्येच तोडले. ऑफिस सुटल्यावर परत बसस्टॉपवर गेलो. बस काही येईना. शेवटी टॅक्सीनं घरी पोहोचलो. माझ्याकडे आणि माझ्या लॅपटॉप बॅग बघून धर्मपत्नी  फिदीफिदी हसायला लागली. ‘बरं झालं, तुम्ही स्कूटर नाही नेली ते,’ धर्मपत्नी म्हणाली.
‘माझे हाल बघून आनंद वाटला?’ मी म्हणालो.
‘नाही हो. आपल्या अथर्वने नेलीये पिकनिकला. त्याच्या मित्रांसोबत म्हणे थ्रिल म्हणून जातोय स्कूटर घेऊन.’
‘अगं, पण तू त्याला नेऊ का दिली?’ मी.
‘अहो, कधी नेतो का तो? आज घरी होती म्हणून नेली. त्यात काय विशेष?’ 
‘अगं पण पेट्रोल...’
‘दिले मी त्याला पैसे, काल तुम्ही दिलेल्यातून.’
‘म्हणजे सकाळी मी जे बोललो, ते वायाचं गेलं,’ मी ओरडलो.
‘आणि हो, उद्या शनिवार ना, हाफ डे, आपल्याला मावशीकडे जायचंय. जेवायला बोलावलंय त्यांनी. स्कूटरने जाऊ.’  चहा देत ती म्हणाली.

पेट्रोल वाचविणं या जन्मी तरी शक्य नाही, असा विचार करून मी भारतमातेची आणि या स्थिर सरकारची माफी मागितली.

विनोद बिडवाईक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा