मेडिकल, इंजिनीअर बनता न आल्यामुळे डोक्यावर एक ओझे घेऊन जगणारे अनेक तरुणही आहेत. ग्रॅज्युएशननंतर असणारे खूप कोर्सेस आहेत. व्यवस्थापनाच्या डिग्रीला अॅडमिशन घेण्यासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर चालतो. अशा वेळेस या विद्यार्थ्यांचे गैरसमजही खूप असतात. शिक्षण घेतानाचा दृष्टिकोन जेव्हा व्यावहारिक जगात कुचकामी ठरतो, तेव्हा परत दुसरा कोर्स करून नोकरी मिळवणारेही आहेत.

याच गोंधळातून तो ‘क्वालिफिकेशन सिण्ड्रोम’चा बळी ठरतो. ढोबळमानाने ‘क्वालिफिकेशन सिण्ड्रोम’चा अर्थ मराठीत शिक्षणाचा आजार असा धरला तरी त्याचा अर्थ खूप खोल आहे.
दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांच्या आयुष्याची दिशा ठरत असते. अशा वेळेस योग्य मार्गदर्शन मिळाले नाही, तर विद्यार्थी करिअरच्या बाबतीत आयुष्यभर चाचपडतच राहतात. निव्वळ डिग्री घ्यायची म्हणून ते शिक्षण घेतात. मग नोकरी मिळत नाही म्हणून पदव्युत्तर डिग्री घेतात. त्यानंतर एखादा डिप्लोमा करतात आणि नोकरी मात्र वेगळ्याच क्षेत्रात करतात. अर्थात हा त्यांचा नाईलाज असतो. हाच तो ‘क्वालिफिकेशन सिण्ड्रोम.’ मग त्यातूनच निराशा आणि आयुष्याबद्दलची बेफिकिरी जन्माला येते.
स्वतःची कुवत आणि आवड नंतर खूप उशिरा कळते. आई-वडिलांनी आणि पालकांनी ‘तुला डॉक्टरच व्हायचं आहे, इंजिनियरच व्हायचंय’ वगैरेसारखा तगादा लावल्यानंतर मुलेही आपले करिअर तेच आहे असे समजतात. त्यानंतर अशा कोर्सेसना अॅडमिशन मिळू शकली नाही की मग घोटाळा होतो.
बारावीनंतर बीएस्सी..... त्यानंतर एमएसस्सी आणि नोकरी एका वृत्तपत्र कचेरीत वितरण अधिकारी म्हणून! एमएसस्सी फिजिक्सचा विद्यार्थी कंडक्टर म्हणून कामाला लागतो. तेव्हा शिक्षणपद्धतीला दोष द्यावा की पालकांच्या अपेक्षांना दोष द्यावा हाही प्रश्न पडतो.
अनेकांना स्वतःच्या पसंतीची नोकरी आयुष्यात मिळतच नाही. बीएसस्सी मायक्रोबॉयोलॉजी, त्यानंतर व्यवस्थापनातील मास्टर्स पदवी आणि मग स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी व्यवस्थापनातील स्पेशलायझेशनला आधार देण्यासाठी कायदा, वगैरे क्षेत्रातील पदविका आणि पदवी करणारे तरुण या कॉलिफिकेशन सिण्ड्रोमचे बळी आहेत.
हा काही मानसिक, शारीरिक आजार नाही. तो स्वतःच्या गरजा नीट ओळखता न आल्याने आणि निराशेतून येतो. त्यासाठी आपली शिक्षणपद्धती जेवढी कारणीभूत आहे; तेवढीच मार्गदर्शनाची अनुपलब्धताही कारणीभूत आहे. या संदर्भात आणखी एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. तो म्हणजे, येथे या तरुणांना बेकारीचा प्रश्न फारसा भेडसावत नाही. फक्त त्यांना त्यांच्या क्षेत्रातील नोकरी मिळत नाही. त्यामुळे हे तरुण एका नोकरीत टिकतही नाहीत. यांच्या बायोडेटावर अनुभव या सदरात खुपशा आस्थापनाचा ‘अनुभव’ असतो. पुढे केव्हातरी त्यांना कळते की आपण ‘अमुक’ या क्षेत्रात करियर करायला हवे होते. आपली आवड आपण आधीच लक्षात घेतली असती तर आपण इतरांपेक्षा खूप पुढे गेलो असतो. मग घाण्याच्या बैलासारखे आयुष्य वाट्याला आले नसते.
या पश्चातापातून स्वतःला वाचवायचे असेल तर एकच करा विचार, नीट आणि नियोजनबद्ध आखणी! करिअरची आणि जीवनाचीही!
विनोद बिडवाईक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा