शनिवार, ३ नोव्हेंबर, २०१८

नसलेल्या मंगळसूत्रानं घात केला

Related image

तशी ही घटना काही वर्षांपूर्वीची. असंच जून महिन्यात आमच्या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संघटनेची घटक असलेल्या संघटनेचे विभाग पातळीवरचं अधिवेशन होतं. या अधिवेशनात मुंबई, पुणे, नाशिक, नगर वगैरे भागांतून दीडशेच्या आसपास सभासद होते. वातावरण अर्थातच उच्चभ्रू मंडळींना शोभेल असं.

पहिल्या दिवशी डिनरच्या वेळी एका सुंदर तरुणीने माझं लक्ष वेधून घेतलं. मी मित्रांसोबत गप्पा मारत असताना ती एकटक माझ्याकडे बघत होती. मी चपापलो. पण तिच्या डोळ्यांनी माझा पिच्छा सोडला नाही. माझ्या नकळत मी तिला एक छान स्मित दिलं आणि तिथेच फसलो. तिनंही खूप दिवसांची ओळख असल्यासारखं गोड हसू फेकलं आणि मी गारदच झालो.

मित्रांची नजर चुकवून मी तिच्याकडे गेलो. या बुफे डिनरच विचित्र असतं. ते ताट सांभाळत उभ्यानं जेवण करणं मला कधीही जमलं नाही. एवढ्या गर्दीत ते ताट सांभाळीत मी तिच्याकडे सरकलो. माझ्या ताटातला गुलाबजामून तिने पटकन उचलून स्वतःच्या तोंडात टाकला. 

‘डिनरच्या वेळेसच खूप ओळखी होतात, असं माझं वैयक्तिक मत आहे.’  तिनं शुद्ध इंग्रजीत संभाषण सुरू केलं. एकदा संभाषणाला सुरुवात झाल्यावर मीही लाजणं सोडून दिलं. 
‘आय अ‍ॅग्री.’ मी तिला अनुमोदन दिलं. ‘पण एक प्रॉब्लेम नेहमीच येतो. कसं बोलावं?’ तिचा प्रश्‍न.
‘कधी कधी मी प्रथम खावं की बोलावं, या विचारात असतो. दोन्ही काम मला एकदाच करता येत नाहीत,’ मी.
 ‘का?’
‘अहो, जेवण ठीक आहे; पण जेवताना बोलणं. तेही कसरत करत म्हणजे महादिव्यचं. पण तरीही कधीकधी मी जेवावं की निव्वळ बोलावं हे सोबत कोणाची कंपनी आहे, यावर ठरवतो.’
‘कसं काय?’
‘इफ द पार्टनर इज लाईक यू, देन आय विल डेफिनेटली इट फर्स्ट.’
‘ओ. नो.’
‘बिकॉज, व्हेन पार्टनर इज लेडी, आय रेअरली गेट अ चान्स टू स्पिक.’
‘ओ गॉड, तुम्ही तसं समजता?’ म्हणजे मी तुम्हाला बोअर करीन अशी तुम्हाला भीती वाटते?’ ती हसत-हसत म्हणाली.

भोजनाचा आस्वात घेत घेत मस्तपैकी हसत खेळत आमचा संवाद सुरू होता. मित्रांचे चेहरे अशा वेळेस जसे होतात तसेच झाले होते. रात्रीचा कार्यक्रम कोणता तिनेच विचारलं.
‘सेशन है कौनसा?’ 
‘सेशनकी नहीं मै आपकी बात कर रही हूँ?’ सेशन अटेंड करेंगे आप?’ 
विचित्र चेहरा करीत ती उत्तरली.

तिचं ते नदीच्या वाहत्या पाण्यासारखं हसू... माझ्या शाब्दिक कोटीवर ओठ दुमडून हसत छानसा दिलेला प्रतिसाद. तिचाही हजरजबाबीपणा, विनोदबुद्धी आणि बोलण्याची विशिष्ट पद्धत. आम्ही डायनिंग हॉलमधून खाली जायला निघालो. तेवढ्यात तिला कोणीतरी विचारलं. ‘हॅव यू टेकन युअर डिनर हनी?’ ‘हनी?’ चक्क माझ्यासमोर हनी? मी चडफडलो.

‘येस डार्लिंग.’ म्हणत तिने माझ्या खांद्यावर थपथपत विचारलं. ‘इन्हे पहचानतो हो?’ मी होकारार्थी मान हलवली.

‘मिलो, यह है मेरे हजबंड मिस्टर.... अँड डार्लिंग हि इज माय न्यू फ्रेंड. व्हेरी इंटरेस्टिंग पर्सनालिटी, समीर पोतदार.’ तिच्या नवर्‍याने हसत त्याचा राकट हात पुढे केला. टच्च भरलेला फुगा टाचणीने फुटावा तसं माझं झालं. आमच्या संघटनेच्या चेअरमन सोबतच मी भेटत होतो!

मंगळसूत्र हे भारतीय विवाहित स्त्रीच्या वैवाहिक जीवनात शाश्‍वत प्रतीक समजले जाते. पण आता मंगळसूत्र गळ्यात घालणे म्हणजे मागासलेपणाचं लक्षण समजलं जातं. किंवा नवर्‍याच्या बंधनाचे प्रतीक मानलं जातं. माझा 
नेमका इथेच घोटाळा झाला. कारण तिच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं आणि त्यानंच माझा घात केला होता.

मी तिच्याकडे बघितलं, ती हसत होती, पहिल्यासारखीच. पण मला मात्र त्या हास्यात मिश्किलतेची झाक दिसली.

(काल्पनिक) 

विनोद बिडवाईक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा