‘तुम्ही नाटक का लिहित नाहीत?’
‘तुम्ही दीर्घकथा का लिहित नाहीत?’
‘तुम्ही कादंबरी का लिहित नाहीत?’
‘तुम्ही काहीच का लिहित नाहीत?’

खूप वर्षांपासून लिहिण्याच्या सवयीमुळे मी सर्व क्षेत्रात लेखन करू लागलो. इतर साहित्यिकांसारखं माझंही एखादं पुस्तक प्रकाशित व्हावं, अशी इच्छा तीव्र होऊ लागली. त्याशिवाय आपणावर लेखकाचा शिक्का बसणार नाही, या धारणेनं माझ्या डोक्यात घर केलं आणि तिथेच मी फसलो. पुस्तक प्रकाशित करण्याची दुर्बुद्धी मला सुचली नसती, तर कदाचित मराठी आणि हिंदी साहित्यात कमालीची क्रांती घडली असती. कदाचित कित्येक तरुण लिहायला प्रवृत्त झाले असते. मी पुस्तक प्रकाशित केलं. प्रकाशक सापडेना. त्यामुळे स्वतःच्या पदरचे (सॉरी खिशातले) पैसे घालून मोठ्या हौसेने पुस्तक प्रकाशित केले.
पुस्तक तर प्रकाशित झालं; पण त्यानंतर काही दिवसांतच महाराष्ट्रातील सर्व समीक्षक माझ्यावर तुटून पडले. यात गल्लीबोळातील प्रकाशित होणार्या सायंदैनिकाचे लोकही होते. माझ्या पुस्तकावर खूप जणांनी अनुकूल समीक्षा लिहिली. हे सर्व माझ्या ओळखीचे होते म्हणून समीक्षा लिहिल्यावर पार्टी दिल्यावर ते खुश झाले. काही जणांनी माझी पार्टी झोडली. आणि दुसर्या दिवशी अतिशय वाईट शब्दात माझी कानउघडणी केली.
एक समीक्षक लिहितो, ‘हे पुस्तक झोपेवर प्रभावी औषध म्हणून वापरता येईल. हाच या पुस्तकाचा उपयोग. बाकी हे पुस्तक फुटपाथवरही विकण्याच्या लायकीचे नाही.’
दुसरा म्हणतो, ‘हे पुस्तक... काही न बोललेलेच बरे. या पुस्तकातील एका वाक्याचा दुसर्या वाक्याशी काडीचाही संबंध नाही. प्रस्तुत लेखकाने लेखन थांबवणेच उत्तम. परंतु ही त्यांची पहिली चूक आहे, म्हणून आम्ही माफ करतो. पुस्तकाचा टाईप, पेपर अतिशय वाईट. लेखकाने स्वतःचा फोटो का टाकला नाही?’
बहुतांशी समीक्षकांचा अभिप्राय याच पद्धतीचा होता. फक्त दोन-तीन स्थानिक वृत्तपत्रपत्रील उपसंपादकांनी चांगला अभिप्राय दिला होता. पण शेवटी त्यांनी एक वाक्य टाकायला नको होतं. ते वाक्य होतं, ‘प्रस्तुत लेखक सढळ हाताचा आहे. लोकांना पार्ट्या देऊन आपलंसं करण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे.’ खूप जणांनी माझ्या पुस्तकाऐवजी माझ्यावरच टिपण्णी केली होती.
सर्व समीक्षा वाचून मी अतिशय निराश झालो. वृत्तपत्रातच लेखन करणं बरं होतं, याची जाणीव झाली. मला आश्चर्य वाटत होतं ते म्हणजे रोज पुस्तकाचं प्रोडक्शन पाडणार्या लेखकांच्या समीक्षा उत्कृष्ट कशा छापून येतात?
अर्थात दहापैकी एकच समीक्षा अनुकूल असते हेही मला जाणवलं. मी हताश होऊन असाच बसलो असताना, एक मित्र घरी आला. त्याच्यासोबत एक टक्कल पडलेली, जाड भिंगाचा चष्मा घातलेली लहानमूर्ती होती. मित्राने त्यांची ओळख करून दिली. हे गृहस्थ पेशाने पत्रकार होते आणि त्यातही ते समीक्षक होते. त्यांनीही माझ्या पुस्तकांवर फारशी चांगली प्रतिक्रिया लिहिली नव्हती. परंतु या गृहस्थाच्या तेही लक्षात नव्हतं. मी त्यांना तसं विचारल्यावर त्यांनी पुस्तक न वाचल्याची कबुली दिली. मला आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी आपली दिलगिरी व्यक्त केली आणि पुढच्या पुस्तकावर अनुकूल समीक्षा देण्याची ग्वाहीही दिली.
पुस्तक न वाचताच समीक्षा कशी लिहिता? हा प्रश्न विचारल्यावर ते गूढपणे हसले. म्हणाले, ‘सर्व समीक्षक अशीच समीक्षा लिहितात.’ मित्राने त्यांच्याबद्दल अधिक माहिती सांगितली. या गृहस्थांनी असे कित्येक नवोदित लेखक अकालीवयात आणि प्रीमॅच्युअर स्थितीतच मारून टाकले जातात.
एका लेखकाच्या कादंबरीवर यांनी समीक्षा लिहिल्यावर तो लेखक पोलिस इन्स्पेक्टर झाला. दुसर्या लेखकाने वडापावचा स्टॉल उघडला. एकाने रिक्षा चालवायला सुरुवात केली. आता मलाही साहित्यक्षेत्र सोडून द्यावे असे तीव्रतेने वाटू लागले. छंद म्हणूनही लिहायचे नाही, या निष्कर्षाप्रत मी येऊन ठेपलो. चणे, शेंगदाणे विकण्याचा धंदा करावा असं तीव्रतेनं वाटू लागलं. माझी ही इच्छा हताशपणे मी मित्राला ऐकवली. मित्र हसत उत्तरला, ‘अरे वेड्या एवढं निराश कशाला होतोस. तू तुझी व्यंगात्मक लिहिण्याची हौस समीक्षक होऊन पूर्ण करू शकतोस. त्यापेक्षा समीक्षा का लिहीत नाही.’ मित्राच्या या सल्ल्याला वरील समीक्षकांनी दुजोरा दिला आणि समीक्षा कशा लिहायच्या याचं मार्गदर्शन करण्याची तयारी दर्शविली.
समीक्षा कशी करावी? याचे बाळकडू मला मिळाल्यापासून या समीक्षेवर समीक्षा लिहू लागलो. पुस्तके बघून, त्याचे कव्हर बघून आणि लेखकाचे नाव बघून समीक्षा लिहायची असते, हे मी सरावाने शिकलो. काही दिवसांतच मी समीक्षा लिहिण्यात तरबेज झालो.
पहिली समीक्षा मी एका काव्यसंग्रहाची केली. ही समीक्षा एवढी लोकप्रिय झाली की समीक्षेसाठी माझ्याकडे धडाधड पुस्तके येऊ लागली. ती समीक्षा थोडीफार खालीलप्रमाणे होती.
"जुन्या पुराण्या कवीकडे आणि त्यांच्या कवितांकडे बघितल्यावर तोचतोचपणा जाणवतो आणि निसर्ग, प्रेम, प्रेमभंग, चंद्र, मृत्यू यात सापडलेल्या कवींची कीव करावीशी वाटते. आयुष्याचा व्यासंगी दृष्टीने विचार करताना जीवनाची जी खोली असते ती कोणत्याच पद्धतीने या कवितेत प्रतिबिंबित होत नाही. परंतु आता रसिकांसाठी आणि काव्यप्रेमींसाठी आयुष्याचं व्यावहारिक सार सांगणारे कवी या भूतलावर आहेत. यांना नवकवी म्हणून कितीही हिणवलं तरी आयुष्याची तीव्रता, निरीक्षणशक्ती आम्ही जोरावर मिळवलेली अप्रतिम प्रतिभा याचा विचार केल्यास नवोदित कवींचं कौतुकच वाटतं. आता हीच कविता बघा.
रात्रीच्या भेसूर क्षणीकुत्रा भुंकतोओऽऽ त्याला दुसरा साद देतावेळ अशीचसाद देणारीएका कुत्र्यासारखीअंगावर येणारी
व्वा. या कवितेत संपूर्ण आयुष्याचा अर्थ सामावलेला आहे. संगता-विसंगतीचा सुरेख मेळ या कवितेत साधला आहे. व्यावहारिक कसोटीवरच कुत्र्याचे ओरडणे आणि वेळेला अंगावर येणार्या कुत्र्याची उपमा देणे हे कवीच्या प्रतिभेचा अविष्कार घडवतात."
या काव्यसंग्रहावर मी जवळपास ऐंशी पानाची समीक्षा लिहिली. काव्यसंग्रहाची पृष्ठसंख्या होती चाळीस. ही समीक्षा एवढी गाजली की बस्स. या समीक्षेला आधुनिक समीक्षा क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ समीक्षा मानण्यात येतं.
यानंतर मी समीक्षालेखन सुरू केलं. एका एका दिवसात आठ-दहा पुस्तकांवर समीक्षा लिहायला सुरुवात केली. दोन-तीन पानं वाचली की लेख तयार. पुस्तकाचा वास घेतला की समीक्षा तयार! आता-आता तर मी पुस्तकं न बघताच लिहायला लागलोय.
पुस्तक प्रकाशित व्हायच्या आधीच एका पुस्तकावरची समीक्षाही मी तयार करून ठेवली आहे.
विनोद बिडवाईक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा