"पृथ्वीवरच्या अस्वलासारखे दिसणारे हे प्राणी एका शिस्तबद्ध कवायती सैन्याप्रमाणे उभे होते. त्यातला एक माझ्या दिशेने सरकला आणि एक डिकॉस्टीच्या दिशेने. तेवढ्यात कुठून तरी नौकेसारखे दिसणारे काहीतरी विद्युतगतीने पुढे आले. त्या दोघांनीही आम्हाला त्यात बसण्याची खूण केली. आम्ही बसताक्षणीच ती नौका आकाशात झेपावली. "
पृथ्वीवरून संदेश येणे बंद होऊन सहा तास उलटले होते. 33 दिवस पुरेल एवढं इंधन यानात होतं आणि पृथ्वीवर जायचे म्हटले तर आम्हाला अडीच महिने लागणार होते. आम्ही अवकाशात वाट चुकलो असेच म्हणावे लागत होते. ज्या ग्रहाच्या कक्षेत आम्ही येऊन पोहोचलो होतो, तो पृथ्वीवर कुणालाही माहीत नव्हता, आम्हालाही माहीत नव्हता. पण अवकाशातच आश्चर्यकारकरित्या आमच्या यानाने मार्ग बदलला आणि त्या ग्रहाच्या कक्षेत आम्ही प्रवेश केला. आम्ही हतबुद्ध होऊन नुसतेच पाहत होतो. इलाज नव्हता. यान आमच्या नियंत्रणाबाहेर गेले होते.
शेवटी मी त्या ग्रहावर उतरण्याचा निर्णय घेतला. डिकॉस्टी (माझा सहकारी) त्यासाठी तयार नव्हता. अशा भलत्याच ग्रहावर उतरण्यापेक्षा मरण बरे, असा त्याच्या बोलण्याचा सूर; पण असे फुकट मरण्याची माझी तयारी नव्हती.
यानातून तरी ग्रह पृथ्वीसारखाच दिसत होता. हिरवे पट्टे, नद्या, सागर दिसत होता. याचा अर्थ त्या ग्रहावर वातावरण होते.
माझा अंदाज खरा ठरला. एका विस्तीर्ण मैदानावर आम्ही आमचे यान उतरविले. तांबडी माती होती. ग्रहावर खूप धूळ होती. येथे वादळाचा त्रास नेहमी होत असावा. डिकॉस्टी आणि मी बाहेर आलो. वार्याचा वेग प्रचंड होता. शिवाय गुरुत्वाकर्षण पृथ्वीपेक्षा कमीच होते. चालताना त्रास होत होता. बाहेर आल्यावर मी चहूकडे नजर फिरवली. दृष्टी जाईल तिथवर काहीच दिसत नव्हते. सगळीकडे तांबड्या मातीचे मैदान आणि मातकट हिरव्या रंगाची झाडे. काय करावे मला कळेना. आमच्या चेहर्यावर मास्क होते म्हणून, नाहीतर एकमेकांच्या डोळ्यातली दहशत वाचूनच आम्ही गतप्राण झालो असतो. पृथ्वीवरचा संपर्क तुटला होता आणि अशा ग्रहावर येऊन पोहोचलो होतो की, पृथ्वीवर जायचे दोरच तुटले होते.
अचानक माझ्यासमोर अगदी पुढ्यात, आपल्या पृथ्वीवर जागच्या जागी चक्रीवादळ होते तसा प्रकार दिसू लागला. तांबड्या मातीचे लोटच्या लोट उठू लागले. वार्याचा वेग प्रचंड होता. तोल सांभाळणे कठीण होते. डिकॉस्टीने सरळ बसूनच घेतले. अर्धा-एक तास या वादळात गेला असावा. हळुहळु हा जीवघेणा प्रकार शांत झाला आणि मी डिकॉस्टीकडे डोळे फाडफाडून बघायला लागलो.
आमच्या समोर शंभर एक विचित्र प्राणी होते. पृथ्वीवरच्या अस्वलासारखे दिसणारे हे प्राणी एका शिस्तबद्ध कवायतीला थांबलेल्या सैन्याप्रमाणे उभे होते. त्यातला एक माझ्या दिशेने सरकला आणि एक डिकॉस्टीच्या दिशेने. तेवढ्यात कुठून तरी नौकेसारखे दिसणारे काहीतरी विद्युतगतीने पुढे आले. त्या दोघांनीही आम्हाला त्यात बसण्याची खूण केली. आम्ही बसताक्षणीच ती नौका आकाशात झेपावली. आमच्यासोबत ते प्राणी होतेच. डिकॉस्टीने पहिल्यांदाच तोंड उघडले, ‘तुम्ही कोण आहात? तुम्हाला काय पाहिजे? हा ग्रह कोणता? आमचा प्रश्न त्यांना कळला होता की नाही कोणास ठाऊक; पण ते बोलले नाहीत. अत्यंत तीव्र गतीने ते नौकेसारखे विमान एका विवरात घुसले आणि तळावर उतरले. डोळे फाडून आम्ही पाहतच राहिलो. पृथ्वीवरील नासाची प्रयोगशाळासुद्धा इतकी सुसज्ज नसेन!
‘वेलकम टू डिबारा!’ कुठूनतरी शब्द कानावर आदळले. आम्हाला पुढे चलण्याची खूण करण्यात आली. डिकॉस्टीने चलण्यास नकार दिला. तत्काळ एका प्राण्याने आपले नख खाली केले. लेझरबीनचा एक मोठा किरण जमिनीत घुसला आणि जमिनीला छिद्र पडले. नंतर तेच नख डिकॉस्टीकडे दाखवून पुन्हा पुढे चलण्याची खूण करण्यात आली. आता नकाराचा प्रश्नच नव्हता.
‘पृथ्वीवरच्या रहिवाशांचे आम्ही स्वागत करतो.’ आमच्यासमोरील टीव्ही स्क्रीनवर ही अक्षरे उमटली. काही वेळाने अस्वलासारख्या दिसणार्या अतिप्रचंड माणसाने तो पडदा व्यापला.
‘विश्वाचे राजे होण्याची आमची क्षमता आहे. पृथ्वीशी आमचे वैर करोडो वर्षांपासून आहे. प्रत्येक क्षेत्रात आम्ही तुमच्यापेक्षा सरस आहोत आणि तुम्ही पृथ्वीवरील माणसांचा आमच्यापुढे टिकाव लागणे अशक्य. पण तुम्हाला दुसर्याच्या कामात लुडबुड करण्याची सवय झाली आहे. आम्हाला ही लुडबूड नकोय म्हणून आम्ही तुमच्या देखत पृथ्वी संपुष्टात आणू इच्छितो. तुम्ही दोघे पृथ्वीवरील शेवटचे मानव ठरणार आहात. या ग्रहावर तुमचे स्वागत आहे. तुम्हाला पृथ्वीवर जाता येणार नाही. आम्ही तुमची सर्व साधने केव्हाच उद्ध्वस्त केलीत. तुम्ही आमचे गुलाम आहात. आमच्या ग्रहावरील जंगलात राहा.’ मी आणि डिकॉस्टी भयाने कापू लागलो.
‘तुमचा ग्रह आम्ही नष्ट करणार आहोत.’
टीव्ही स्क्रीनवर पृथ्वी दिसू लागली. एक बाजूने काउंटडाउन सुरू झाले.
9...8...7...6...5...4...3...2. ..1...0 आणि
आणि टीव्ही स्क्रीनवर पृथ्वीच्या ठिकर्या ठिकर्या उडताना दिसल्या. विश्वमालेतून पृथ्वी हा ग्रहच नष्ट करण्यात आला होता. तोही आमच्या देखत.
‘हे आमच्या कोट्यवधी वर्षांच्या संशोधनाचे फळ आहे. आम्ही तुमच्या ग्रहाच्या अंतर्गत तापमानात वाढ केली. इतकी की त्या तापमानापुढे तुमचा टिकाव धरू शकला नाही.’ टीव्ही स्क्रीनचा पडदा कोरा झाला.
मला आणि डिकॉस्टीला पुन्हा त्या नौकेत बसवून विवरातून बाहेर आणण्यात आले.
तिथून जात असताना हजारो प्राणी आम्हाला पाहण्यासाठी जमले होते.
विनोद बिडवाईक
वा विनोद
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिलस