रविवार, २५ ऑक्टोबर, २०२०

समाजाचे तथाकथित समरस फॅब्रिक

समाजात वेगवेगळे प्रवाह वाहत असतात. हे प्रवाह समाजघटकांच्या वागणुकीवर आपला प्रभाव टाकत असतात. बदलत्या काळाप्रमाणे समाजातील जगण्याचे मापदंड ही बदलतात आणि ते बदलते हवेतही. परंतु सामाजिक अभिसरण होत असताना काही गोष्टी भावनिक होऊन जातात. प्रगतिशील समाजाची रचना बदलत्या मापदंडाच्या प्रभावी स्वीकृतीने होत असते. तसेच समाजात असणाऱ्या आदर्श व्यक्तींच्या वागण्यातून हि स्विकृती तळागाळात जाते. भूतकाळातील रूढी, काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात. पण ते सहजपणे स्वीकारणे कठीण असते. अर्थात सर्वच गोष्टी सोडून द्यायच्या नसतात. सामाजिक व्यवस्था जेव्हा खूप कठोर होते, तेव्हा संघर्ष अटळ असतो.

आपले वर्तन कसे असावे, समाजात वावरताना काय करावे आणि करू नये ह्याचे काही नियम असतात आणि सरकारने ठरवलेले कायदे बंधनकारक असतात. आदर, सहयोग आणि सह-अनुभूती ह्या तीन पैलू मुळे प्रगती होत असते. समाजातील काही विशिष्ट घटक प्रगतिशील आहेत ह्याचे हेच कारण आहे.

पण जेव्हा काही विशिष्ट घटक समाजातील प्रत्येक गोष्टीवर आक्षेप घेतात, विशिष्ट घटकाला लज्जास्पद ठरवले जातेतेव्हा समाजातील रचना तुटायला सुरुवात होते. एखाद्या विशिष्ट घटकाने १०० वर्षांपूर्वी केलेल्या अन्यायामुळे  त्या समाजाला आजही जबाबदार ठरवावे हे मात्र चुकीचे आहे.

दुर्दैवाने भारतातील हे सामाजिक समरस फॅब्रिक आता हळूहळू उकलू लागले आहे. समाजातील काही ठेकेदारांनी आणि विशिष्ट विचारसरणीच्या समाजघटकांनी आतापर्यंत ह्या सामाजिक समरसतेला पद्धतशीरपणे सुरुंग लावण्याचे प्रयत्न केले आहेत आणि अजूनही ते करत आहेत. एक विशीष्ट यंत्रणा ह्यामागे पडद्याआड काम करते आहे. धर्म ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे पण सामाजिक एकतेचा संदेश फक्त बहुसंख्य असणाऱ्या घटकांना लागू केल्या जातो. ह्या वर्गाला shaming करण्याचे प्रयत्न स्वातंत्र्यापासून सुरु आहेत. धर्म हा जगण्याचा मार्ग दाखवतो. धर्मातील आणि समाजातील काही विधी (rituals) हे सांकेतिक पण आधार देणारे असतातत्याचा आदर करायला हवा. दुर्दैवाने शिक्षण संस्था, कार्यकारी संस्था, विद्यापीठे, सगळेकडे तथाकथित धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली बुद्धिभेद चालवलेला आहे. लोकांच्या भावना भडकावून आपली पोळी भाजून घेण्यासाठी मग काहीतरी टूम काढायचे उदयोग सध्या सुरु आहेत.

भारताचा साक्षरतेचे प्रमाण ७७% असूनही , लोक अश्या प्रकारांना बळी पडतात हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे. कदाचित लोक साक्षर झालेत पण नागरिक शिक्षण फक्त २० मार्कांचे असल्यामुळे, लोक सुसंकृत व्हायचे विसरले

खरे तर आता वेळ आली आहे तो प्रत्येकाने वैयक्तिक जबाबदारी घेण्याची. राजकीय आणि तथाकथित विचारवंतांच्या नादी लागता, तार्किकदृष्ट्या विचार करण्याची. समाजातील प्रत्येक घटकांबद्दल आदराची भावना ठेवून, आदर, सहयोग आणि सह-अनुभूती (empathy) हे तीन स्तंभ मानून योग्य तो निर्णय घेण्याची. ह्या प्रक्रियेत काही घटकांना काहीतरी त्याग करावा लागेल, आपल्या स्वार्थी कोषातून बाहेर पडावे लागेल.

येणाऱ्या नवीन पिढीच्या हातात, एकसंध समाज देण्याचे मोठे आवाहन आपल्यापुढे आहे. ते आवाहन आपण कसे पार पाडतो हे येणारा  काळच ठरवेल.

विनोद बिडवाईक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा