प्रत्येक कथा, गोष्टी, किस्से, वाचले तर असे लक्षात येते की, आपल्याला गरिबीचे ग्लोरिफिकेशन करायला खूप आवडते, असे करत असताना प्रत्येकाचे पैसे कमवायचे आणि श्रीमंत होण्याचे स्वप्न मात्र निश्चितच असते. लाखो करोडो कमावणारे सतत दुःखात असतात, त्यांना भयानक तणाव असतात, त्यांचे मित्र कमी असतात, त्यांना कोणी विचारात नाही, ते एकाकी असतात, ते भ्रष्ट असतात, त्यांचे नातेवाईक त्यांच्या जवळ नसतात वगैरे वगैरे सारखे गैरसमज पसरवत असतो. गरिबीत लोक सुखात असतात, त्याचे तणाव कमी असतात, त्यांना भरपूर मित्र असतात. नातेवाईकांसोबत त्यांचे चांगले संबंध असतात असाही आपला गैरसमज असतो.
हे सर्व करत असताना आपण विसरतो की लोकांनी गरिबीत राहावे हेच सांगत असतो, प्रत्यक्षात गरिबी कोणालाच नको असते. आपण श्रीमंत लोक श्रीमंत का व कसे झालेत हे सांगत नाहीत.
समाधान, आनंद, हे व्यक्तिसापेक्ष असते. त्यात गरिबी आणि श्रीमंतीचा काहीही संबंध नसतो.
गरिबी मुळीच वाईट नाही, माणूस समाधानी असेल तर गरीब स्वतःचे आयुष्य गरिबीत काढू शकतो, आणि श्रीमंतीही वाईट नाही, पण श्रीमंत समाधानी नसेल तर पैसे असूनही तो दुःखी असू शकतो.
मुळात कित्येक श्रीमंत आणि उच्चमध्यमवर्गीय लोक अगदी सुखात आणि आनंदात आहेत आणि कित्येक गरीब लोक आणि मध्यमवर्गीय लोक दुःखात आहेत. तसेच कित्येक गरीब लोक अगदी आनंदात आहेत आणि श्रीमंत लोक दुःखात आहेत.
मुळात आपण ह्या ग्लोरिफिकेशन च्या नावाखाली स्वतःचे अपयश, लपवत असतो, किंवा आपला एखाद्या अनुभवावर आपण आपले विशिष्ट वर्गीय बद्दल समज बनवत असतो. आपल्यात असेही समज आहेत की शहरात राहणारे, चांगल्या कंपनीत काम करणारे दररोज पिझ्झा खातात, पार्ट्या करतात आणि भाजीवाल्याशी भाजी घेताना कटकट करतात. हे सांगत असताना आपण ह्याच लोकांमुळे, त्यांची स्पेंडिंग पॉवर असल्यामुळे आपली दुकाने चालतात, आणि हेच लोक गरज असतात मदत करतात, तसेच ह्या लोकांनी भरलेल्या टॅक्स मुळे आपल्याला सरकारचे बेनिफिट्स मिळतात हे सोईस्कर पणे विसरतो.
श्रीमंत होणे वाईट आहे हेच आपण ऐकत आलो आहोत. लोंकाना गरिबीत ठेवणे हे राजकीय लोकांचे एक साधन आहे. पण हे करत असताना दुसरी बाजू नेहमी कमी लेखावी लागते. त्यासाठी एक विशिष्ट वर्गाला लज्जास्पद (shaming ) करावे लागते. त्या वर्गाकडून सर्व काही घ्यायचे आणि बोलताना दुसरी बाजू घ्यायची हा दुट्टपीपणा काही लोकांच्या रक्तात भिनला आहे.
गरिबी आणि श्रीमंती ही मानसिक स्थिती आहे. सर्वजण श्रीमंत होऊ शकत नाहीत, पण आपली स्वतःची प्रगती करण्याची प्रत्येकाकडे क्षमता असते. प्रश्न आहे ती क्षमता वापरण्याची. ग्लोरिफाय करायचेच असेल तर, गरीब व्यक्ती मधील श्रीमंतीला आणि शेमिंग करायचंच असेल तर श्रीमंत व्यक्तीतील दारिद्र्याला करायला हवे.
विनोद बिडवाईक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा