शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०२०

गोवर्धन

तो माझा कोणीही लागत नव्हता. माझा नातेवाईक नाही, माझ्या जवळच्या मित्राचा नातलग नाही, की त्याची दखल घ्यावी असा कोणीही व्यक्ती नाही. तो एक यत्किंचित असा गरीब व्यक्ती होता. पण तो माझ्या मनातून अजूनही गेलेला नाही. त्याचा प्रभाव माझ्या आयुष्यावर पडण्याचा प्रश्‍नच नाही. इतकेच काय पण त्याला लक्षात ठेवण्याजोगे त्याचे फारसे कर्तृत्वही नाही. पण जेव्हा कधी मला माझे गाव व माझे बालपण आठवते तेव्हा तो मला हमखास आठवतो. आता कदाचित तो नसेनही. त्याच्या जाण्याने तसा कोणाला फरकही पडणार नाही म्हणा. पण माझ्या बालपणी तो प्रत्येक घराचा एक अविभाज्य घटक होता. कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रत्येक घराचा संबंध त्याच्यासोबत येत असे.

त्याचे नाव होते गोवर्धन. त्याच्या आई-वडिलांनी त्याचे नाव एवढे भरभक्कम का ठेवले असावे, देव जाणे. गोवर्धन पर्वत श्रीकृष्णाने आपल्या करंगळीच्या साह्याने उचलून गोकुळवासीयांना तुफान पावसापासून आणि इंद्राच्या क्रोधापासून वाचवले होते; ही कथा आपण लहापणापासून ऐकलेली आहेच. तर अशा भक्कम पर्वताचे नाव धारण करणारी ही व्यक्ती अगदी यथातथाच होती.

गोवर्धन स्वभावाने अगदी गरीब होता. मागून कोणीही यावे आणि टपल्या मारून जावे, असा त्याचा स्वभाव होता. अठराविश्‍वे दारिद्य्र आणि दारिद्य्रामुळे झालेला स्वभाव. मला त्याच्याकडे बघूनच त्याची दया यायची. गोवर्धनचे लग्न तर झाले होतेच; पण त्याला दोन मुलेही होती. त्याची ती लहान लहान मुले, त्याची बायको आणि गोवर्धन कोणाच्या खिजगणतीत असण्याचा प्रश्‍नच नव्हता. काही दिवसांनंतर गोवर्धनची बायको त्याला सोडून माहेरी निघून गेली दोन चिल्ली-पिल्ली गोवर्धनकडे सोडून.

परिस्थिती खूपच बिकट होती. दररोज मजुरी करायची आणि संध्याकाळी ज्वारी वगैरे आणून संसार चालवायचा, असा जीवनाचा प्रवास सुरू होता. एकच जमेची बाजू म्हणजे त्याला कशाचेही, अगदी तंबाखूचेही व्यसन नव्हते. गावातील लोकांसोबत त्याचा वागण्याचा स्वभाव अदबशीर होता. कोणाला काही बोलायचे नाही, कोणाच्या अध्यात ना मध्यात. ह्या माणसाकडे बघून निर्विकार आणि स्थितप्रज्ञ या दोन शब्दांचा अर्थ कोणालाही कळेल. चेहर्‍यावर ना कुठले दु:ख, ना आनंद. असा हा गोवर्धन.

कामाच्या बाबतीत मात्र हा गडी तुफान होता. गावातील प्रत्येक घरात कोणताही कार्यक्रम असला, की विहिरीतून पाणी काढून सर्व ड्रम्स भरून ठेवणे आणि पाण्याचा अभाव जाणवू न देणे हा त्याचा हातखंडा होता. आणि केवळ याच कारणामुळे गावातील प्रत्येक घरासोबत त्याचा संबंध होता. उन्हाळ्यातील लग्नांमध्ये गोवर्धन असायलाच हवा. बरं तो त्या पु. ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील नारायणसारखा मधे मधे करणारा वल्ली मात्र नव्हता. आमच्या गावातील सधन मंडळी काहीतरी निमित्ताने धार्मिक कार्यक्रम वगैरे ठेवून जेवण्याच्या पंगती देत असत. अशा वेळेसही गोवर्धन कामाचा असायचा. विहिरीला पाणी नसेल, तर नदीवरून पाणी आणायचे. मी गोवर्धनला पाणी भरण्याव्यतिरिक्त वेगळे कोणते काम अशा उत्सवात/लग्नात अथवा कार्यक्रमात केलेले कधीही बघितले नाही.

मी शाळेत जाताना त्याच्या झोपडीवजा घरासमोरून रोज जायचो. छप्पर तुटलेले, मातीच्या भिंती तुटायच्या मार्गावर, घरात फक्त पाच-सहा अ‍ॅल्युमिनियमची भांडी, बाजूला काही गोधड्या. रोज सकाळी गोवर्धन आणि त्याची तीन-चार वर्षाची मुले चुलीजवळ बसून काहीतरी बनवत असायची. मोठ्या आशाळभूत नजरेने ती दोन मुले काहीतरी खायला मिळेल याची वाट बघत असायचे. हे दृश्य बघून मला खूपदा दुपारचे जेवण घ्यायची इच्छा होत नसे. ते सर्व दृश्य मला गलबलून टाकत असे. आईला सांगून घरातील भाकरी-भाजी घेऊन मी बर्‍याचदा गोवर्धनच्या मुलांना द्यायचो.

दहावीनंतर मी गाव सोडले. पुढे गावी जाणेही दुर्मीळ झाले. गोवर्धनचे पुढे काय झाले ते माहीत नाही. त्याची मुले मोठी झाली असतील आणि ते पण आता कदाचित छोटी-मोठी कामे करत असतील.

गोवर्धन आता नसेलही, पण मला रोज असे गोवर्धन दिसतात. कधी बांधकामाच्या साईटवर, तर कधी रस्त्यावर असेच फिरत, निर्विकार चेहरा ठेवून वावरणारे...

विनोद बिडवाईक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा