शनिवार, १० ऑक्टोबर, २०२०

पेन

रात्रीचे आठ वाजले असावेत. वातावरणात एक भयाण शांतता होती. रातकीड्यांचा आवाज तेवढा ऐकू येतो होता. मध्येच एखादी बैलगाडी जात होती. दूरच्या रस्त्यावरून बैलाच्या गळ्यात असणार्‍या घंटीचा आवाज मधेमधे कानाला जाणवत होता. आकाशातील अर्धचंद्राचे प्रतिबिंब तेवढे नदीच्या पात्रात दिसते होते. पाण्यातील मासे जसे हालचाल करीत तसा थोडाफार तरंग तयार होता होता. दूरवर कौलारू घरांमधून चुलीतून येणारे धूर आता दिसू लागला होता. काही दिवे मिणमिणताना दिसत होते.

जवळपास एक तासापासून गावाच्या बाहेर नदीच्या काठावर मी एकटाच बसलो होतो. वेळही जात नव्हता आणि माझ्या मनात विचारांचे काहूर माजले होते. माझ्यावर घरातील कोणीच प्रेम करीत नाही, याची मला आता खात्री पटली होती. एकंदर थोडाफार जरी घरी जायला उशीर झाला, तर काळजीत पडणारे माझे आई-वडील आज मला शोधायला आले नव्हते.

आता हळूहळू माझ्या पोटात भूक चाळवू लागली होती. मला माझ्या मोठ्या ताईची खूप आठवण येऊ लागली. सहा महिन्यांपूर्वीच तिचे लग्न होऊन ती सासरी गेली होती. ती आज जर घरी असती, तर नक्कीच ती मला शोधायला आली असती. तिचे होतेच माझ्यावर खूप प्रेम.

काय करावे ते सूचत नव्हते. आता कोणाचीही वाट न बघता आपण घरी जावे का, हा विचार मी करू लागलो. पण मोठ्या धैर्याने आईवर रागावून मी घर सोडून निघालो होतो. तसाच परत घरी गेलो असतो, तर माझा ‘इगो’ भयानक हर्ट झाला असता. जसा जसा वेळ जात होता, तसा तसा माझा संयम सुटत जात होता. त्यात भुकेने कासावीस व्हायला लागले होते. आता काय करावे, या विचाराने मला रडायला येऊ लागले. मनात विचार आला, चला घरी जाऊ. आईने जेवण बनवले असेल तर खाऊ आणि परत बाहेर पडू.

आता भुकेसोबत भीतीपण वाटायला लागली होती. आपण घराबाहेर पडून चूक केली, या निष्कर्षाप्रत मी आलो. 


त्याचे झाले असे, की शाळेतून घरी आल्यानंतर मी आईला पेन घेण्यासाठी तगादा लावला होता. माझ्याकडे एक शाईचा पेन होता. आणि त्या पेनाची निब आता झिजायला आली होती. तशी त्यातून शाईसुद्धा बाहेर यायला लागली होती. माझ्या काही मित्रांकडे छानसे पेन होते. ते पाहून आपल्याकडे पण आता नवीन पेन असायलाच हवा, असे वाटू लागले होते. आईचे म्हणणे होते, की निब बदलून या पेनवर अजून काही दिवस चालव. आपण पुढच्या महिन्यात घेऊ नवीन पेन. पण मला लगेचच पेन हवा होता. अर्थात, त्या पेनावर काही दिवस ढकलता आले असते. पण मी हट्टावर अडून राहिलो. शब्दाला शब्द वाढत गेला. मला भयंकर राग आला आणि मी बोलून गेलो, ‘तू मला पेन दिला नाही, तर मी घर सोडून निघून जाईन.’ रागाच्या भरात आईपण बोलली, ‘जा, कुठे जायचेय तिकडे जा. ह्या वयात तुझे हे असले थेर मी सहन करणार नाही.’ आणि मी थेट घराच्या बाहेर पडलो.

थोड्या वेळाने विनू, विनू म्हणून वडिलांच्या हाका ऐकू येऊ लागल्या. मी जास्त आढेवेढे न घेता वडिलांकडे धाव घेतली. वडिलांनी पहिल्यांदा माझ्याकडे रागाने बघितले. पण नंतर माझा चेहरा बघून त्यांचा राग मावळला.

‘चल, पेन घेऊन देतो.’ म्हणून नदीच्या पलीकडे असलेल्या बाजारपेठेत ते घेऊन गेले.

घरी आल्या आल्या मी आईच्या कुशीत शिरलो. ती रागावली होती. मला समजवण्याच्या सुरात ती म्हणाली, ‘काही गोष्टी एवढ्या ताणायच्या नसतात. मी पेन देणार होतेच ना? नाही दिला म्हणून थेट घर सोडून जाणे म्हणजे खूप झाले. मला खूप वाईट वाटले.’

‘माफ कर आई,’ म्हणून मी डोळे पुसले आणि अभ्यासाला बसलो.

आज माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारची अनेक पेन्स आहेत. गरज असो वा नसो, दुकानात गेलो, कधी छानसा पेन दिसला की तो घ्यायच्या मोह आवरत नाही. नवीन पेन घेतांना, लहानपणीची ती आठवण, ते घराबाहेर पडणे आणि वडिलांचे ते पेन घेऊन देणे मला अजूनही आठवते. घरातून बाहेर पडून मिळवलेल्या त्या पेनची सर आता मात्र  कोणत्याही पेनला नाही. 

- विनोद बिडवाईक

२ टिप्पण्या: