रविवार, २३ मे, २०२१

मी विठ्ठलाला जाणतो

"तुम्ही गाणे आणि अभंग जाणता. मी विठ्ठलाला जाणतो."

रवर्षी भागवत सप्ताहात, आमच्या गावी एक कीर्तनकार येत असे. आईचे ते गुरु होते. ते अतिशय सुंदर पद्धतीने कीर्तन करत असत. काही दिवस आधी, त्यांचे नित्यनेमाने प्रवचनही होत असे. छोट्या-छोट्या पुराणातील गोष्टी, रामायण-महाभारतातील दाखले, विनोदी किस्से सांगून ते लोकांचे प्रबोधन करत असत. माझ्या प्रायमरी शाळेच्या पटांगणावर हा भक्तीमय कार्यक्रम होत असे. शाळेच्या व्हरांड्यावर त्यांचे व्यासपीठ असे.

रात्री ८ नंतर जेवण आठवून गावातील सर्व आबालवृद्ध मंडळी ह्या कार्यक्रमाला हजेरी लावत असत. बुवांना साथ देण्यासाठी गावातील भजनी मंडळ सोबत असे.  उत्साही आणि होतकरू मंडळीनी हे भजनी मंडळ स्थापन केले होते. अर्थात त्यात स्वतःला उत्कृष्ट गायक आणि वादक समजणारेच जास्त असत. गावातील जगप्रसिद्ध डॉक्टर बदरके हे कधी कधी भजन म्हणायला येत असत.  महादेव भोई हा पितळेच्या हंड्यावर पितळेचीच परात ठेवून हातातील स्टीलच्या कड्याने लयबद्ध आवाज काढत असे.  त्याचीही साथ महत्वाची असे. चिपळ्या, मृदंग, टाळ, हार्मोनियम पेटी वाजवणारे सर्वजण होतकरू होते. कधीतरी कोणाचा सूर बिघडत असे, पण इतरजण सांभाळून घेत असत. लोकही अश्या गोष्टी सांभाळून घेत असत. Perfection ची कोणालाही अपेक्षा नसे. लोक मोठ्या तन्मयतेने हे कीर्तन, प्रवचन आणि मध्ये मध्ये भजन ऐकत असत. ह्या कालावधीत गावातील वातावरण भक्तीमय होऊन जात असे. भांडणे कमी झालेले असत, कधीही एकमेकांना सरळ नावाने हाक  मारणारे एकमेकांची विचारपूस करत असत.

बुवा मात्र निश्चितच उत्कृष्ट गायक होते. अतिशय आर्जवतेने ते विठ्ठलाचे भजन गात असत. पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेले "माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी, बाप आणि आई, माझी विठठल रखुमाई, माझे माहेर पंढरी भिवरेच्या तीरी"  हा अभंग त्यांच्या अतिशय आवडीचे असे. अतिशय मन लावून ते हा अभंग गात असत. दरवर्षी लोक त्यांच्या या भजनाला टाळ्या वाजवून दाद देत असत. हा अभंग कार्यक्रमाचा क्लायमॅक्स असे. 

एके दिवशी कीर्तन चालू असताना, बुवांनी हार्मोनियम वाजवणाऱ्या रघुनाथला  नेहमीची परिचित अशी खूण केली. पेटी वाजवणाऱ्या रघुनाथला बुवांना आता कोणता अभंग म्हणायचं आहे हे कळले आणि त्याने पेटीला सुर लावला. 

तोच खाली बसलेल्या गर्दीतील एक जण उभा राहिला, त्याने हात वर केला. तो दुसरा तिसरं कोणी नसून, नदीपल्याड असणाऱ्या गावातील, बाजीराव आखरे होता. बाजीराव हा विठ्ठलाचा भक्त होता. दरवर्षी नेमाने वारी करणारा होता. त्याचा स्वभाव अतिशय सोज्वळ होता. कोणाच्या मध्ये कधीही नाक न खुपसणाऱ्या बाजीरावाला बघून सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला. 

सगळीकडे अचानक शांतता झाली. आता बाजीराव ला नेमके काय करायचे आहे, हे कोणाला कळेना. तोच भगवानराव तनपुरे यांनी त्याला दरडावून विचारले, "अरे काय करायचे आहे तुला बाजीराव?"

"मी तिथे येऊ का?" बाजीरावने विचारले 

बुवांनी अतिशय प्रेमाने त्याला व्हरांड्यावर बोलावले. 

"हा बोल, काही प्रश्न आहे का? त्यांनी विचारले.  

"नाही प्रश्न तर नाही, पण तुम्ही हा जो अभंग म्हणता, तो अभंग आज मी गायला तर चालेल का?" 

"तुला येतो का?" बुवांनी विचारले. 

"हो." 

"मग काही हरकत नाही." असे म्हणत  बुवांनी आपल्या गळ्यात असलेले टाळ त्याच्या गळ्यात टाकले. आणि त्याला माईक समोर उभे केले.  

रघुनाथने पेटीला सूर लावला. बाजीराव ने डोळे मिटले आणि अतिशय मधुर आवाजात अभंग गायला सुरुवात केली. अभंग गात असताना तो जणू विठ्ठलाशी एकरूप झाला होता. त्याच्या चेहऱ्यावरचे  निरागस भाव आणि अभंगातून तो करत असलेले आर्जव  बघून बुवा आणि व्हरांड्यावरील व्यासपीठावर बसलेल्या सर्वांना अतिशय अप्रूप वाटले. बाजीराव तरुण होता पण भक्तिरसाने न्हाऊन गेला होता. अभंग तन्मयतेने तल्लीन होऊन गात असताना त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.  

खाली बसलेले आबालवृद्ध कानात प्राण आणून, त्याचा तो अभंग ऐकत होते. अभंग संपला आणि संपूर्ण मैदानावर टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा कडकडाट झाला. बुवा हा अभंग दरवर्षी गात असत, पण बाजीरावने गायलेल्या अभंगाला  जो प्रतिसाद मिळाला तो त्यांना कधीच मिळाला नव्हता. प्रेक्षक त्या तरुण व्यक्तीच्या उत्कट अभंगाने इतके प्रभावित झाले होते की कित्येकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. 

बुवांनी अगदी मनापासून त्याचे कौतुक केले आणि विचारले, "मी कित्येक वर्षांपासून हा अभंग गात आहे. शास्त्रीय संगीताची मला समज आहे. पण मला भक्तांचा एवढा प्रतिसाद कधीच मिळाला नाही. पण तुला गाण्याचे काहीही अंग नसताना, भाषेचे ज्ञान नसताना ह्या लोकांना कसे काय खिळवून ठेवले. तू हा अभंग गायला कसा शिकला?”  

बाजीराव ने डोळे मिटले, हात जोडले आणि तो शांतपणे उत्तरला, "बुवा, तुम्ही तर महान आहेत. तुमचा अनुभव, तुमचे ज्ञान खूप मोठे आहे. तुमच्यासमोर मी काहीही नाही. पण बुवा, तुम्हाला हा अभंग माहित आहे. पण मला..."  

"...." बुवाने प्रश्नार्थक चेहरा केला. 

"मला तर माझा संपूर्ण विठ्ठल माहित आहे. तुम्ही गाणे आणि अभंग जाणता. मी विठ्ठलाला जाणतो. विठ्ठल माझ्या हृदयात आहे, अणुरेणूत आहे." बाजीरावाने बोलणे संपवले तसे बुवांनी बाजीरावचे पाय पकडले. 

आणि खाली पटांगणात "जय हरी विठ्ठल" चा जयघोष झाला.    

विनोद बिडवाईक  

(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत.  इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन वर उपलब्ध आहेत.)


२ टिप्पण्या: