रविवार, १४ ऑक्टोबर, २०१८

मर्यादा सोडतानाच्या मर्यादा...

2019ला लोकसभेच्या निवडणुका येतील. सध्या भारतात नरेंद्र मोदींचे म्हणजे ’एनडीए’चे सरकार आहे. स्पष्ट बहुमत मिळालेले सरकार आहे. म्हणजेच ते स्थिर असे सरकार आहे. मात्र 90च्या दशकातील आपल्या देशाची राजकीय स्थिती पाहिली, तर त्यावेळी राजकीय अस्थिरता दिसून येते. या काळात कुण्या एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने त्यावेळी अनेक पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास पुढे आले. त्यामुळे त्यावेळी पंतप्रधानपदासाठी बर्‍याच नेत्यांनी आपापली घोडी दामटवली. प्रत्येक नेत्यांना त्यांच्या मर्यादा काय आहेत, हे माहीत असूनही त्यांनी सत्तेसाठी नशिब आजमावयाला सुरुवात केली. काहींनी त्यात बाजी मारली, तर काही दुर्दैवी ठरले. काही नेते तर अनपेक्षितपणे पंतप्रधानपदी विराजमान झाले, तर काही नेत्यांकडे पंतप्रधान होण्याचे सर्व गुण असूनही त्यांना पंतप्रधानपदाने हुलकावणी दिली. काही नेत्यांची उदाहरणं आपण पाहू.

एच. डी. देवेगौडांनी आपली मर्यादा ओळखली नाही आणि सीताराम केसरी यांनीही आपली मर्यादा ओळखली नाही. परिणाम आपणा सर्वांसमोर आहे. गुजराल यांनी या गोष्टींचा धडा घेऊन आपल्या मर्यादेतच कार्य करण्याची कसरत सुरू केली. मुळातच एखाद्या गोष्टीची मर्यादा काय आहे, किती आहे आणि त्याचबरोबर आपली मर्यादा काय आहे हे सरावाने, अनुभवाने समजता यायला हवं. स्वतःची मर्यादा समजण्यासाठी तशी अनुभवाची गरज नाही. ‘आपण किती पाण्यात आहोत,’ हे समजायला तशी त्याची गरजही नाही. पण या मर्यादेचे भान खूप कमी जणांना असते. येथे मर्यादा आणि स्वतः भोवती विणलेला कोष अर्थात स्वतःचं संकुचित जग या गोष्टींची गल्लत होऊ नये. कारण ‘माझ्या काही मर्यादा आहेत म्हणजे माझं जग तेवढंच आहे’ असा त्याचा अर्थ होत नाही. उलट, स्वतःच्या मर्यादा ओळखून स्वतःचा विकास साधण्याचं कार्य अतिशय कठीण असतं आणि ते करणं खूप कमी जणांना जमतं.

आपल्या मर्यादा न ओळखता आयुष्य जगणार्‍यांची संख्याच येथे जास्त आहे आणि तरीही त्यांचं जग संकुचित आहे. डबक्यातलं आयुष्य जगताना त्यातून बाहेर पडायची इच्छाच होत नाही; मात्र स्वतःच्या ‘विचारांची कुवत’ न समजता दुसर्‍यांना स्वतःच्या जगात खेचण्याची धडपडच खूप जाणवते. आपण ज्या पद्धतीने विचार करतो. त्याच पद्धतीने दुसर्‍यांनी विचार करावा. शक्यतो त्या डबक्यात स्वतःला सोबत करण्यासाठी आमंत्रित करणं हा एक उद्योग समाजात चाललेला आढळतो. पण तरीही आपण काहीतरी असं दाखवण्याचा यांचा अट्टाहास असतो.

एखादा तरुण अथवा तरुणी कॉलेजमध्ये जाते. अभ्यास करते. मजा-मस्ती करते. अपरिहार्य समजून प्रेमही करते. पण सर्वच सारखे नसतात. काही तरुण आपल्या मर्यादेचा विचार करतात आणि आपण काहीतरी वेगळं करून दाखवू शकतो, याची जाणीव त्यांना होते. त्यांच्या हातून उत्कृष्ट कार्यही घडतं. ते स्वतःची अशी एक प्रतिमा बनवण्यात यशस्वी होतात. पण स्वतःच्या मर्यादेची जाणीव नसणारे महाभाग या मर्यादशील तरुणांवर टीका करण्यातच धन्यता मानतात. अर्थात दोष त्यांचा नसतोच. त्यांची विचार करण्याची कुवत तेवढीच असते.

मित्र-मैत्रिणी, कॉलेज, एखादी डिग्री, नंतर एखादी बर्‍यापैकी नोकरी आणि संसार हा जो आयुष्याचा प्रवास सर्वांचा मर्यादेतच चालतो. म्हणजे जेथे मर्यादा ताणायला हव्यात तेथे त्या दाखविल्या जात नाहीत.

पुण्याच्या एका कॉलेजमध्ये घडलेला किस्सा आहे. मारुतीमध्ये बसलेल्या काही तरुणांना प्राचार्यांनी हटकल्यावर, त्यांची गाडी अडविल्यानंतर बेमुर्तखोरपणे प्राचार्यांच्या अंगावर गाडी घालून या तरुणांनी त्यांना जखमी केलं. येथे या तरुणांनी स्वतःची मर्यादा का दाखवू नये, प्राचार्यांचं म्हणणे का मानू नये? प्रातिनिधिक स्वरूपात अशा प्रकारच्या कित्येक घटना घडतांना आढळतात.

एखादी मुलगी स्वतःच्या मर्यादा विसरते, तेव्हा तिला मन:स्ताप होऊ शकतो, याचा अनुभव समाजात वावरताना नेहमीच येतो. भले त्या तरुणीचा उद्देश चांगला असो. स्वतःला बोल्ड म्हणून घेताना ‘नारीमुक्ती’चा कांगावा करताना या मर्यादा सोडायलाच हव्यात का? मर्यादित राहून स्वतःचं उत्थान करणं काही कठीण नाही. सावित्रीबाई फुले यांनी स्वतःच्या मर्यादेत राहून जे कार्य केलं ते आताच्या तथाकथित ‘बोल्ड’ तरुणीने करून दाखवावं. म्हणजे मर्यादा कुठे दाखवाव्यात आणि त्या कोठपर्यंत टाळायच्या यालाही काही मर्यादा आहेतच की?

समाजात वावरताना या मर्यादा एखादी तरुणी जेव्हा ओळखत नाही तेव्हा त्या समाजात रामापेक्षा रावणच जास्त आहेत, हेही सोयीस्कररित्या विसरते. अर्थात यात तिचा दोष नसतो. दोष असतो तिच्यावर होणार्‍या संस्काराचा. मित्र-मैत्रिणी आणि मौज-मस्ती या पलिकडेही एक जग आहे. हे जग अतिशय सुंदर आहे; पण त्याच्याकडे जाण्याचा रस्ता स्वतः शोधावा लागतो आणि त्यासाठी सर्वप्रथम स्वतःतील ‘स्व’ला शोधावं लागतं. जी स्वत:तील ‘स्व’ला शोधण्याची प्रक्रिया आहे, ती कठीण असली तरी अशक्य नाही. आपण कोणत्या समाजात (येथे धर्म-जात असा अर्थ नाही) जन्माला आलो, याचा अर्थच राहत नाही.

स्वतःच्या मर्यादा शोधण्यासाठी या ‘स्व’चा शोध घेणे आवश्यक ठरते. त्यासाठी स्वतःभोवती विणलेला संकुचिततेचा कोष तोडायला हवा. ‘तुझं जग एवढंच आहे’ असं दुसर्‍यांना सांगताना काहीजण स्वतःचं जग विसरून जातात. त्यांची ‘जग एवढंच’ म्हणजे स्वतःच्या जगाबद्दल अवास्तव कल्पना असतात. पण तेवढी विचार करण्याची कुवत असत नाही. कोष तोडल्यानंतर जे सुंदर जग असते त्या जगाची त्यांना कल्पनाच नसते.

स्वतःसाठी सारेच जगतात, पण स्वत:साठी जगताना दुसर्‍यांसाठी जगणंही शिकायला हवं. पण इथे मी असं करतो, असं सांगायची गरज नाही. त्यासाठी स्वतःच्या मर्यादेचा शोध घ्यायला हवा, असे तरुण-तरुणी आहेत.

दुसर्‍यांसाठी जगायचं म्हणजे स्वतःचं आयुष्य सोडून समाजसेवाच करावी लागते, असं नव्हे. स्वतःचं आयुष्य जगताना दुसर्‍यांसाठी खूप काही करता येते. आपण, आपल्या मर्यादा ओळखताना त्या वाढवायलाही शिकायला हवं.


विनोद बिडवाईक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा