मला नेहमीच एका गोष्टीचं कुतुहल वाटत आलं आहे, ते कुतूहल म्हणजे दोन राष्ट्रांमधील प्रतिनिधी, राजदूत मंत्री-जंत्री वगैरे जेव्हा भेटतात, तेव्हा हातात हात घेतल्यावर नेमके कोणते संभाषण करतात? आपण टीव्हीवर नेहमीच बघतो, हसत आणि जोरजोरात हात (अर्थात एकमेकांचे) हलवताना ते काय बोलतात? माझे हे कुतूहल शमेल तेव्हा शमेल, ती संधी येण्यासाठी मला वरीलपैकी कोणीतरी व्हावं लागेल. पण जेव्हा ती औपचारिक हस्तांदोलनानंतरची भेट पार पडते त्यानंतर एका भल्या मोठ्या पॉश ड्रॉइंगरूममध्ये गुबगुबीत सोफ्यावर बसून काय चर्चा करत असतील, त्यामध्ये भाषेचा प्रश्न आलाच तर दुभाषे मदतीला येतातच, मग दुभाषांकरवी केलेली चर्चा किती परिणामकारक होत असेल?
दुभाषकाची भूमिका तशी महत्त्वाचीच; पण म्हणून प्रत्येक वेळी दुभाषकावर अवलंबून राहिल्यावर काय गमती घडत असतील, हाही कुतूहलाचा विषय आहे. विमानातून व्हीआयपी खाली उतरतात. स्वागतासाठी इतर प्रतिनिधी, मंत्री असतातच. कमांडोज आणि इतर स्वागतोत्सुक लगेच पळत येतात आणि त्या प्रतिनिधी किंवा नेत्याचा हात हातात घेतात. या वेळी दोघेही हसून एकमेकांना अभिवादन करतात, पण नंतरचं काय? म्हणजे परत दुभाषक आलाच. या दुभाषकाला स्वतः या गोष्टीचं हसू येत नसेल का?
‘सर, इंडियन मिनिस्टर मिस्टर अमुक-तमुक आपले स्वागत करत आहेत.’ पाहुण्यांच्या भाषेत दुभाषक इंडियन मिनिस्टरांचे शब्द सांगतात. या वाक्यावर मग पाहुणे प्रतिक्रिया देतात आणि मग त्यांचं भाषांतर देशी भाषण.
माझं हे कुतूहल टीव्हीवरील कार्यक्रम बघून अधिकच चाळवलं जातं. माझी एक इच्छा आहे, ती पूर्ण होईल तेव्हा होवो. पण दुभाषक होऊन एखाद्याची संपूर्ण फजिती करायचे आहे. या फजितीवरून आठवलं समजा एकमेकांच्या भाषा न समजणार्या दोन व्यक्ती चर्चेच्या वेळेस काही कारणाने अचानक एकमेकांवर रागवल्या, तर तेव्हा दुभाषक काय करेल?
‘यू इडियट’
‘सर, मिस्टर अमुक-तमुक आपल्याला मुर्ख म्हणताहेत,’ दुभाषकाचं भाषांतर.
‘सांग त्याला तूच नालायक आहेस.’
‘सर, मि. अमुक-तमुक आपल्याला म्हणताहेत की तुम्हीच नालायक आहात,’ दुभाषकाचं भाषांतर.
अशा वेळेस दुभाषकाला आपलं कौशल्य पणाला लावून परिस्थिती हाताळावी लागत असेल. भारत आणि पाकिस्तान या परंपरागत शत्रू राष्ट्रात प्रतिनिधींशी चर्चा किती स्फोटक (?) होत असली, तरी सामान्य माणसांप्रमाणे मलाही त्यात दोन प्रतिनिधींच्या चर्चेबद्दल कुतूहल आहे.
सौंदर्य स्पर्धा (किंवा अंगप्रदर्शन स्पर्धा) किंवा अतिशय महत्त्वाच्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये किंवा अशा स्पर्धेमध्ये दुभाषकाची भूमिका महत्त्व घेऊन जाते. एखाद्या सौंदर्यसम्राज्ञीने एखाद्या प्रश्नाचं फालतू उत्तर दुभाषक आपल्या कौशल्याने बदलून परीक्षकांचं मन बदलू शकत असतील. (अर्थात ही एक शक्यताही असू शकेल.)
पंतप्रधानांच्या हिंदी भाषणाचं भाषांतर (आपल्या बहुतांश पंतप्रधानांनी आणि राष्ट्रपतींनी हिंदीवर तसा अन्यायच केला. दिवंगत पंतप्रधान भारतरत्न श्री. अटलबिहारी वाजपेयी आणि विद्यमान पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचा अपवाद वगळता.) इंग्रजीमध्ये किंवा इंग्रजी भाषणाचं भाषांतर हिंदीमध्ये करताना दुभाषकाची भूमिकाही तशी महत्त्वाची. एखाद्या अवघड शब्दाला नेमका प्रतिशब्द आठवत नसेल तर?
दोन देशांच्या व्हीआयपींची भाषणे उडत असेल?
आपल्या अनेक पंतप्रधानांना हिंदी भाषा येत नाही (येत असली तरी ते हिंदीत बोलत नाहीत) मुलायमसिंग आणि रामविलास पासवान यांच्या सारख्या काही नेत्यांना इंग्रजी भाषेचे वावडे. मंत्रिमंडळाच्या मिटिंगमध्ये मग दुभाषकाचा रोलही आलाच. अशा वेळेस या यूपी-बिहारीबाबूंच्या शिवराळ हिंदीचं इंग्रजी भाषांतर कसं करणार?
मला वाटतं सर्वात कठीण भाषांतर असेल ते मराठीचं इंग्रजीमध्ये! अशा भाषांतराचं मलाही कुतूहल आहे. आपल्या शासकीय ( हो सरकारी) भाषांतराचं जाऊ द्या; पण, ‘आज दोडक्याचे गरमागरम फदफदे खाऊन आलो,’ या वाक्याचं काय भाषांतर करणार? पु. ल. देशपांडे यांना पडलेला प्रश्न मलाही खूपदा पडतो.
दोन परराष्ट्रीय व्यक्तींमधील प्रेम कसं फुलत असेल? कल्पना करा, मराठी तरुण एखाद्या जपानी तरुणीच्या प्रेमात पडला आणि दोघांनाही एकमेकांच्या भाषेचा गंध नाही. तेव्हा त्यांचं प्रेम कसं फुलत असेल? स्पर्श, नेत्रातून तर संदेश परावर्तित होत असतीलंच; पण जर इथे दुभाषकाची मदत घेतली तर...? दुभाषकच प्रेमात पडायचा किंवा पडायची? दुभाषकाकरवी प्रेम करणं किती मजेदार (?) (त्या दूभाषकाला) असावं.
एका मल्याळम म्हणजेच केरळी तरुणीची एका मराठी तरुणाशी पत्रमैत्री झाली. खरा घोटाळा नंतरच. दोघांनाही एकमेकांच्या भाषेचा गंध नाही. पहिले काही दिवस इंग्रजीमधून संवाद झाला; पण नंतर दोघेही आपापल्या मित्राकडून पत्र लिहून घेऊ लागले. केरळी मैत्रिणीकडून मराठीत आणि मराठी तरुण त्याच्या मित्राकडून मल्याळीत. यात दोघांच्या भावना बाजूलाच राहिल्या आणि दोन दुभाषकांच प्रेम जमलं.
आज इंग्रजी भाषा जागतिक भाषा झाली आहे. प्रत्येकाला इंग्रजी शिकण्याची गरजही वाटू लागली आहे; पण त्याचबरोबर मातृभाषेचा हट्टही वाढू लागला आहे. जगाच्या पाठीवरील कित्येक देश मातृभाषेतूनच व्यवहार करत आहेत. अशा वेळेस दुभाषकाची भूमिका भाव खाऊन जाते.
.... पण काहीही असो, काहीही होवो, मला आयुष्यात एकदा तरी दुभाषक व्हायचं आहे.
विनोद बिडवाईक
Nice one vinod
उत्तर द्याहटवा