मोठ्या माणसांच्या नावावर काही गोष्टी हमखास खपवल्या जातात. त्यांनी केलेल्या शाब्दिक कोट्या, विनोद आणि त्यांचे अनेक असे किस्से लोक आनंदाने वाचतात. मीही अश्या शाब्दिक कोट्या भरपूर करत असे. प्रासंगिक विनोद तयार करत असे. माझे वाचन तसे चांगले असे. माझी एक छोटी लायब्ररी होती. त्यात पाचसहा पुस्तके,काही मासिके आणि एकदोन कादंबऱ्या होत्या. कॅप्टन प्रताप नावाचे एक पुस्तक मला अतिशय आवडत होते. श्यामची आई हे दुसरे पुस्तक. शाळेत पण काही पुस्तके मिळत असत. अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचन तसे भरपूर असे. वृत्तपत्रे गावात येत नसत, त्यामुळे त्यांचे वाचन फारसे होत नसे, रेडिओ वर बालचित्रवाणी, कामगार विश्व आणि असे बरेच कार्यक्रम आम्ही ऐकत असू. माझी समज तशी चांगली होती. त्यात आईला वाचण्याची भयानक आवड होती. ह्या सर्व प्रकारामुळे माझे भावविश्व समृद्ध होत गेले. माझे वडील बंधू मिलिटरी मध्ये होते, त्यानंतरचे दोन बंधू नाशिकला होते, एक भाऊ शहरात पब्लिक स्कूल मध्ये होता. हे सर्व जेव्हा सुटीत गावी येत असत तेव्हा काहीतरी वाचायला सोबत आणत असत. त्यांनी आणलेली पुस्तके, मासिके मग माझ्या वैयक्तिक वाचनालयात जमा होत असत.
त्यामुळेच माझी शब्दसंपदा वाढत गेली, मित्रांना मी काही वाचलेले किस्से सांगत असे, माझ्या भावांनी सांगितलेल्या गोष्टी, काही विनोद सांगत असे. कधी कधी मी स्वतः विनोद आणि किस्से तयार करून त्यांना सांगत असे. परंतु माझ्या नावावर मी न सांगितलेला किस्सा कोणीतरी खपवेल हे मात्र मला अपेक्षित नव्हते. सर्व कसे ओरिजिनल हवे ना?
माझे वडील बंधू मिलिटरी मध्ये होते. दरवर्षी ते सुट्टीमध्ये गावी येत असत. गावातील ते एकटेच सैन्यात होते. त्यामुळे गावात ते बऱ्यापैकी माहित होते. त्यांची पोस्टिंग भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशात असे. परंतु ते कधीच आपला युनिफॉर्म घालून येत नसत. आमच्या गावातील काही जण पोलीस मध्ये होते आणि ते जेव्हा गावी येत तेव्हा युनिफॉर्म घालून येत असत. मी भाऊंना विचारात असे कि तुम्ही का युनिफॉर्म घालून येत नाही? त्यावर ते म्हणायचे, कि युनिफॉर्म फक्त ड्युटीवर असतानाच घालायचा असतो.
खरे तर त्यांनी युनिफॉर्म घालून गावात यावे, सर्वानी तो बघावा असे मला नेहमी वाटत असे. तेवढाच अभिमान. ते मग गावी आले कि मग काही किस्से सांगायचे. त्यांच्या कंमान्डींग ऑफिसर बद्दल सांगायचे. त्यांनी सांगितलेले किस्से मी मग मित्रांना सांगत असे. अर्थात त्यात बराच मसाला भरलेला असायचा. त्यांनी सांगितलेले छोटा किस्सा मी मोठा करून सांगत असे. बॉर्डरवरील चकमकी, शत्रूला नामोहरण कसे केले वगैरे वगैरे. युद्धकथा सर्वांनाच आवडतात. माझे बंधू हे रेडिओ आणि सिग्नल सांभाळत असत, त्यामुळे तसा त्यांचा लढण्याचा प्रत्यक्ष संबंध येत नसे. पण मित्रांना मिलिटरीमधील सर्व सारखेच! मित्रही मोठया उत्सुकतेने ते ऐकत असत.
माझ्या गोष्टी ऐकून माझ्या एका वर्गमित्राला चेव येत असे. त्याचा भाऊ मुंबई ला होता. मग तो असे काही किस्से सांगत असे कि कितीही म्हटले तरी विश्वास बसत नसे. त्याचा भाऊ मुंबईतील एका बिल्डिंगमधल्या २०व्या मजल्यावरून उडी मारत असे, येणाऱ्या ट्रेन ला हाताने थांबवत असे किस्से ऐकून कोणाचा विश्वास बसेन? आम्ही लहान होतो, मूर्ख नाही.
परंतु असा एक किस्सा माझ्या नावावर कोणीतरी असाच खपवला आणि संपूर्ण गावात त्या किस्स्याची चर्चा होत गेली. किस्स्यात कन्टेन्ट होते हे मान्य करावे लागेल. मनोजकुमारच्या एखाद्या युद्धावर आधारित सिनेमा मध्ये असा सिन खपून गेला असता.
माझ्या नावावर खपवलेला किस्सा असा, “अचानक सैन्याला सीमेवर जाण्याचे आदेश देण्यात आले. सीमेवर जाणाऱ्या तुकडीत माझे वडील बंधू पण होते. सीमेवर जाण्यासाठी लढाऊ विमानाची सोय करण्यात आली होती. एका विमानात माझे बंधू होते. आता पुढे काय होईल हे माहित नव्हते. बरे आपण सीमेवर चाललो, हे पत्राने कळविणे शक्य नव्हते. त्यामुळे बंधूने विमानातचा पत्र लिहिले. विमानात असणाऱ्या पाकिटात ते टाकले. ते विमान आमच्या गावावरून घ्यायला सांगितले. इकडे गावात मी घराच्या बाहेर ओट्यावर बसलो होतो. गावावरून जात असताना, त्यांनी मला बघितले, आवाज दिला आणि लिहिलेली चिठ्ठी खाली टाकली. त्यावेळी नेमका वारा वाहत नव्हता, त्यामुळे ते पाकीट माझ्या आता पडले. मी त्यांना बघून सॅल्यूट केला, विमानाने वेग घेतला आणि बंधू निघून गेले. मी घरात गेलो आणि ते पत्र बाबाकडे सुपूर्द केले."
हा किस्सा ऐकून आई -बाबा, बहीण आणि इतर मोठी माणसे हसत असत. पुढील एक वर्ष हा किस्सा संपूर्ण गावात चर्चेचा विषय होता. अर्थात हा किस्सा मी मुळीच बनवलेला नव्हता. माझ्या नावावर तो कोणी खपवला मला शेवटपर्यंत कळले नाही. माझ्या मित्रांनी मात्र ह्यावर विश्वास ठेवला. "त्यात काय एवढे, विमानातून असे पत्र खाली टाकणे शक्य आहे, त्यांनी टाकले असेल?" माझा खास मित्र विजय शिंदे लोकांना सांगत असे.
नंतर एक दिवस मला असे कळले कि हा किस्सा माझ्या गणेश नावाच्या एका मित्राने बनवला होता. आणि त्यानेच तो सर्वाना सांगितलं होता. गाव लहान असल्यामुळे वनव्यासारखा तो पसरला. मी जेव्हा त्याला हे विचारले, तेव्हा तो हसत म्हणाला. "मजा आली कि नाही? अशी घटना घडली अशी गोष्ट तू आम्हाला कधीतरी सांगणार आहेसच, त्यामुळे मीच ती आधी लोकांना सांगितली." मी त्याला कोपरापासून हात जोडले.
विनोद बिडवाईक
(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत. इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन वर उपलब्ध आहेत.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा