सकाळचे सहा वाजले असावेत, पण वेळेकडे कोण लक्ष देतो. आज खरेतर संजय देशमुखच्या संत्र्याच्या बागेतील संत्री खाण्याचा बेत तसा ठरला नव्हता. सुटीच्या दिवशी तसा काही प्लॅन नसायचा. समोर जसा दिवस येईल तसा साजरा करायचा. पण संत्री खाणे हे निव्वळ निमित्त मात्र होते. आधी नदीवर जाऊन आंघोळ करण्याचा बेत होता आणि नंतर गावभर फिरायचे, समविचारी मित्र गोळा करायचे आणि दुपारच्या जेवणाला घरी यायचे असे एकंदर माझे ठरले होते. समविचारी मित्र तसे कमी होते, त्यातही ते नेहमी बदलत असत. काल समविचारी असणारा मित्र आज विरोधक झालेला असायचा, काही कारण नसताना. एखादयाने कान भरले कि झाले. त्यामुळे माझे नेमके किती मित्र होते हेही कळत नसे. काही मित्रांना त्यांच्या आईवडिलांनी माझ्यासोबत मैत्री करण्याची तंबी दिली होती. शाळेत मी तसा हुशार विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होतो आणि गाव छोटे असल्यामुळे माझ्याबद्दल मोठ्या माणसांचे मतही तसेच होते. त्यामुळे माझ्या वयाची मुले मात्र माझ्या नेहमी विरोधात असत. डायरेक्ट विरोध ते करत नसत पण आपापले गट बनवून मला एकटे पडण्याचा प्रयत्न करत असत, हेही काही कारण नसताना.
हे सर्व असूनही माझे काही मित्र शेवटपर्यंत माझी साथ देत असत. त्यापैकी एक विजय देशमुख हा माझा मित्र होता. दोन वर्ग मागे होता माझ्या. विजय संजयचा लहान भाऊ होता. संजय माझा काही वर्ष वर्गमित्र होता, पण नंतर तो मागे पडला. पक्का मस्तीखोर आणि वेळोवेळी गट बदलणारा. कधी तो माझा पक्का मित्र असायचा तर कधी जानी दुष्मन. गणेश बदरके नावाचा माझा दुसरा मित्र. हा पण संजयसारखा कधी मित्र तर कधी दुश्मन. विजय मात्र स्वभावाने खूप छान होता. भाऊ विरोधात असला तरी नेहमी मला पाठिंबा देत असे.
त्यादिवशी संजय, विजय आणि गणेश आम्ही सकाळीच नदीवर गेलो. मला नदीवर आंघोळीला जाण्याची परवानगी नव्हती. विचारली असती तर कधीच मिळाली नसती. त्यामुळे मी बाहेर मित्रांसोबत बाहेर खेळायला चाललो, इतकेच घरी सांगितले. मला पोहता येत नसे, पण पाण्यात डुंबायला आवडत असे. अर्थात केस ओले होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागे. कारण केस ओले झाले तर घरी मी नदीत आंघोळ केली हे कळत असे. कमरेचा करडोळा हि दुसरी वस्तू जी कोरडी ठेवावी लागे. कपडे काढताना करडोळा पण काढून ठेवत असे.
आम्ही नदीत मनसोक्त डुंबलो. एकदोन तास कसे गेले कळले नाही, पण ह्या गडबडीत करडोळा काढायचा मी विसरलो आणि केसही पूर्ण ओले झाले. आता घरी जाण्यात अर्थ नव्हता. संजय आणि विजयच्या बागेत जावे ह्यावर आमचे एकमत झाले. बाग खूप मोठी होती. संत्र्यांच्या सोबतीला पेरू आणि बोरांची झाडेही होती. तसेच शेतात त्यांचा रखवालदार आपल्या कुटुंबासोबत राहत असे. नदीपासून ५-६ किलोमोटर अंतरावर असणाऱ्या बागेत आम्ही रमतगमत पोहोचलो. संजयने मस्त संत्री तोडून आणली. आम्ही संत्र्यावर ताव मारला. गप्पा, खेळ, मस्ती ह्यात परत दोन तीन तास कसे गेले तेही कळले नाही.
"पोरांनो काही खाऊन घ्या" म्हणत रखवालदाराच्या बायकोने गरमगरम भाकरी, ठेचा आणि तुरीची उसळ (घुगऱ्या म्हणतात विदर्भात ह्या भाजीला) आणून ठेवली. आम्ही हात धुतले आणि जेवणावर तुटून पडलो. मग मस्त संत्र्याच्या झाडाखाली बसून गप्पा सुरु झाल्या, एकमेकांची टिंगल टवाळी ह्यात किती वेळ गेला हे कळलेच नाही. नंतर संजय उठला आणि विहिरींची पाण्याचा पंप सुरु केला. वेगात हौदात पाणी येऊ लागले, आम्ही सर्व हौदात उद्या मारल्या आणि मनसोक्त आंघोळ करू लागलो. आता केस थोडेच कोरडे राहणार?
मी रखवालदाराला वेळ विचारली आणि उडालोच. दुपारचे ४ वाजत आले होते. मी तसा वेळोवेळी घरी जात असे. मी कोठे गेलो हे घरी नेहमी सांगत असे. पण आज गडबडीत मी घरी गेलोच नाही. एव्हाना आई बाबा आणि ताई आता काळजीत पडले असतील हे लक्षात आले. मी हौदातून तसाच बाहेर आलो, कपडे घातले आणि घरी जाण्यासाठी धूम ठोकली.
अर्धा रस्ता कापला असेल, बाबा दिसले. ते रागात असावेत कारण काहीतरी बडबडत होते. हातात एक झुडुपाची तोडलेला फोक होता. आता काही खरे नाही हे मला समजून चुकले. मी गुपचूप त्यांच्यासमोर उभा राहिलो. ते अतिशय संतापले होते. फोकाचा एक फटका माझ्या पायावर मारला. "कोठे गायब झाला होता" ते ओरडले.
त्यांनी माझा हात पकडला. मी निमूटपणे चालू लागलो. नंतर ते नरमले. "घरी सांगून जायचे ना बाबू, आम्ही कीती काळजीत होतो तुला काय माहित?" ते पुटपुटले. नंतर त्यांनी मला समजावून सांगितले. घरी सांगून कोठे चाललो हे सांगणे कीती महत्वाचे आहे आणि घरातील लोकांच्या जीवाला घोर कसा लागून राहतो वगैरे वगैरे.
घरी पोहोचलो तेव्हा, ताई आणि आई ची बोलणी खावी लागणार याची मी तयारी केली होती. त्याआधीच बाबा बोलले, "मी त्याला खूप झोडपले. आता नाही करणार तो हि चूक."
बाबांनी मारलेले एक फटका हा कदाचित शेवटचा होता. त्यानंतर त्यांनी कधीच माझ्यावर हात उगारला नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा