१९८० चा काळ तसा प्रगत नव्हता. विदर्भातील माझ्या लहान गावाला तर मुळीच प्रगत नव्हता. घोडगाव आणि कविठा हि दोन गावे नदीच्या दोन बाजूला होती. दोन्ही गावात बारा बलुतेदार आणि वेगवेगळ्या जातीची मंडळी होती. गावाची रचना ही जाती वर आधारित असावी. आम्ही लहान मुले एकमेकांसोबत जातीचा विचार न करता खेळत असू. परंतु कधीतरी ह्या जातीचे प्रतिबिंब वागणुकीत पडत असे. आणि ह्या जातीचा उल्लेख कोणत्याही निवडणुकीच्या वेळेस हमखास होत असे.
८०च्या दशकात भाई सुदाम देशमुख हे विधानसभेच्या निवडणुकीसाठी उभे होते. भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे ते उमेदवार होते. अमरावती जिल्ह्यातील आदिवासी भागात त्यांनी भरपूर काम केले होते. तळागाळात ते अतिशय प्रसिद्ध होते. मला डावी विचारसरणी मुळीच आवडत नाही. डावी विचारसरणी ही देशासाठी घातक आहे असे माझे मत आहे. डाव्या विचारसरणीच्या लोकांनी हे वेळोवेळी सिद्ध केले आहे. परंतु भाई सुदाम देशमुख हे थोडे वेगळे होते. त्यांची विचारसरणी डावी असली तरी ते इतर लाल भाई सारखे आक्रस्थाळे नव्हते. त्यांचा विरोध हा नेहमी तार्किक आधारावर असे. त्यांचे भाषण हे मेजवानीसारखे असायचे. त्यांची सभा असेल तेव्हा बाबा मला त्यांच्या भाषणाला घेऊन जात. बरे निव्वळ निवडणुकीच्या वेळेसच ते भाषण सभा घेत असे नाही, ते नेहमी लोकांशी जोडलेले असायचे. अतिशय बोचऱ्या शब्दात, विनोदी उदाहरणे, दाखले देऊन ते लोकांना खिळवून ठेवत. त्याची भाषा ओघवती तर होतीच. भाषेतला संयम त्यांनी कधी सोडला नाही.
अतिशय साधे कपडे आणि जमिनीवर पाय. राज्य महामंडळाच्या बसने ते प्रवास करत असत. गाडी कधीतरीच वापरत. ते अविवाहित होते आणि त्यांनी आपले आयुष्य तळागाळातील लोकांसाठी वाहून घेतले होते.
१९८० ते १९८९ पर्यंत ते विधानसभेचे सभासद होते आणि त्यानंतर ते १९८९ तो १९९१ पर्यंत लोकसभेचे सभासद होते. कुणबी मराठा आणि माळी समाजाचे प्राबल्य असणाऱ्या मतदारसंघात ते नेहमी निवडून येत. हे सांगायचे कारण असे की ते ब्राम्हण होते असे एक निवडणूक प्रचाराच्या वेळेस लोकांना सांगितल्या गेले.
त्याचे असे झाले की अश्याच एकदा निवडणूका लागल्या. त्यावेळीस काँग्रेस ची परिस्थिती खूप चांगली होती. कोणीतरी दुसरे देशमुख आडनावाचे काँग्रेस चे उमेदवार भाईंच्या विरोधात होते. भाईचा प्रचार हा त्यांचे कार्यकतें, लहान मुलेच जास्त करत असत.
गावातील काही सधन मंडळी, काँग्रेस चे परंपरागत तर मतदार होतेच पण गावातील काँग्रेस प्रतिनिधी असत. प्रचार शिगेला पोहोचला होता. एके दिवशी गावात भलामोठा गाड्यांचा ताफा आला. गावातील प्रत्येक घरात जाऊन उमेदवार प्रचार करू लागला. कार्यकर्त्याचा गर्दी तर होतीच.
उमेदवार पुढील घरात गेले की काही कार्यकर्ते मागे राहत आणि लोकांना सांगत की विरोधी उमदेवार अमुक अमुक जातीचे आहेत आणि हे आपले उमेदवार आहेत. राजकारणात जातीपातीला इतके महत्व का आहे हे मला नंतर कळले. अर्थात त्यांची जात आम्हाला ऐकीव माहितीवर कळली. जातीचा आधार घेऊन प्रचार काही पुढे कामात आला नाही आणि भाई सुदाम देशमुख प्रचंड मताने विजयी झाले.
आजही आपण २१व्या शतकात असूनही जातपात सोडायला तयार नाही ही दुर्दैवाची बाब आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा