डॉ नामदेव बदरके आमच्या गावातील सर्वांचे डॉक्टर होते. माझे इतर मित्र त्यांना काका म्हणून बोलावयाचे. ते आमचे शेजारी होते. माझ्या आई बाबांना ते काका काकी म्हणत, म्हणून मी त्यांना भाऊ म्हणत असे. नदीपलीकडे त्यांचा दवाखाना होता पण त्यांचा दवाखाना हा फक्त नावालाच होता, कारण दवाखान्यात ते खूप कमी असत. असत तेव्हा सोबत पाच सहा लोकांचा राबता असे. अर्थात हे लोक रुग्ण म्हणून येत नसत तर नामदेव भाऊ सोबत गप्पा मारायला येत असत. नामदेव भाऊ गावाचे सरपंच पण होते, त्यामुळे तेथे भारतातील राजकारणाबद्दल चर्चा रंगलेली असायची. तसेच गावातील प्रश्न त्याचा दवाखान्यात चर्चेला येत असत. चर्चेला काळवेळ ह्याचे काहीही बंधन नसायचे. गावातील आबालथोर, श्रीमंत गरीब, लहान मोठे ह्या सर्वांचा राबता त्या दवाखान्यात असे. ह्या गडबडीत काही रुग्ण पण येत असत. गप्पा मारत मग डॉक्टर रुग्णांची तपासणी करत असत.
"बोला काय झाले काका?" डॉक्टर विचारत,
"कालपासून पोटात कसंतरीच होते." रुग्ण
"अरे रामराव, त्या बाईचं आता खरं नाही? " डॉक्टर रामराव किंवा तत्सम व्यक्तीकडे बघत इंदिरा गांधींबद्दल आपले मत मांडायचे. रुग्ण बिचारा थोडा वेळ गोंधळात पडायचा.
"काय खाल्ले काल?" डॉक्टर (हे रुग्णाला)
"काल जरा उशिरा जेवलो, पण नेहमीचेच." रुग्ण,
"पण तिच्या लोकांची खाण्याची सवय अशी जाणार नाही, आता धडा शिकवावाच लागेल." अर्थात हे रामराव कडे बघून.
रुग्ण एकदम दचकून डॉक्टर कडे बघत असे. डॉक्टर अशीच जुजबी माहिती विचारायचे. नंतर हळूहळू रामराव आणि रुग्ण डॉक्टरच्या बोलण्यावरून कोणासाठी काय आहे हे समजून घ्यायचे. मधेच कोणीतरी मुलगा त्यांना घरी बोलवायला यायचा. त्याच्या घरी कोणीतरी म्हातारे माणूस गंभीर आजारी असे. मग दवाखान्यातील रुग्णाला दोनतीन गोळ्या देऊन पिटाळून लावायचे. तू हो पुढे, असे त्या मुलाला म्हणत, डॉक्टर बॅग हातात घ्यायचे, रामराव मग कोणतातरी प्रश्न विचारायचा. डॉक्टरांना परत चेव यायचा, गप्पाच्या ओघात आपल्याला कोठे जायचे हे पूर्ण विसरून गेलेले असायचे. एक तास झाले की परत तो मुलगा येत असे आणि मग डॉक्टरांचा नाईलाज व्हायचा. एक मात्र निश्चित त्यांच्या हाताला गुण होता. रुग्ण हमखास बरा होत असे. नामदेवभाऊ ह्यांच्याकडे मेडिकल ची औपचारिक पदवी नव्हती. त्यांचे वडील गावातील नावाजलेले आणि प्रभावी वैद्य होते. त्यांचा वारसा नामदेव भाऊ ह्यांनी घेतला होता. आयुर्वेदातील औषधें ते देत असत. RMP ची पदवी ते नावामागे लावत असत. गावातील साधे, छोटे मोठे उपचार तेच करत असत.
जेव्हा ते घरी अथवा दवाखान्यात नसत, तेव्हा ते राजकारणी लोकांसोबत असत. डॉक्टरभाऊ ची विचारसरणी डावी होती. भाई सुदाम देशमुख ह्यांचे हे खंदे समर्थक होते. गावातील श्रीमंत आणि विशिष्ट समाज वगळता सर्वांचा त्यांना पाठिंबा असे आणि ग्रामपंचायतच्या निवडणुकीत ते हमखास निवडून येत आणि तेच गावाचे सरपंच होत असत. त्याचा राजकीय प्रभाव संपूर्ण तालुक्यात होता. गावातील राजकारण करत असताना डॉक्टर म्हणून लोकांची सेवा ते मनोभावे करत असत. आतासारखा डॅम्बीसपणा लोकांत नव्हता. सरकारकडून पैसा फारसा येत नसे. विकासकामांच्या नावाखाली आतासारखा भ्रष्टाचार माजला नव्हता. डावी विचारसरणी असल्यामुळे तळागाळातील माणसे नेहमी त्याच्याकडे येत असत आणि त्याचे ते प्रश्न मार्गी लावत असत.
एकदा ते घरातून बाहेर पडले, आई ओट्यावर काहीतरी करत बसली होती. "काय काकी, बरे आहे ना?" असे त्यांनी विचारले. आईला बरे नसले की ते औषधें देत असत. "अरे ये नामदेव" मग काय, डॉक्टर आले, बसले, गप्पा सुरु झाल्या. आईला पण गप्पा मारायला खूप आवडत असे. आईने चंची उघडली. सुपारी कातरत पान वगैरे खाऊन झाले. गप्पाच्या ओघात चहा पण झाला. आणि अचानक त्यांना आठवले. गावातील कोणातरी कडे गंभीर आजारी रुग्ण आहे आणि त्यांना बघायला बोलावले आहे. ते उठले आणि वेगाने चालायला लागले.
"वाचला असेल तर चांगली औषध दे रे बाबा त्याला." आई मिश्कीलपणे हसत ओरडली.
"हो हो, वाचला असेल तर." डॉक्टर बोलले.
नंतर कधीतरी, डॉक्टर पंचायत समितीचे उपसभापती झाले. जेव्हा ते उपसभापती झाले तेव्हा गावात दिवाळी साजरी झाली. पण दोन वर्षात त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यात आला आणि त्यांना ते पद सोडावे लागले.
त्यांनी आपली शेती आणि दवाखान्यावर लक्ष केंद्रित केले. गावातील राजकारण नंतर संपूर्ण बदलून गेले.
आपल्या लेखणीत एक आगळी वेगळी जादू आहे. अप्रतिम वर्णन, आणखी एक उत्कृष्ट लेख.
उत्तर द्याहटवा