रात्रीचे आठ वाजले होते. रस्त्यावरील खांबावर विजेचा फिलॅमेंटचा दिवा मिणमिणत होता. त्या अंधुक प्रकाशात ते पाच जण एका जुनाट घराच्या पायरीवर बसून गप्पा मारत होते. घराच्या बाहेर एक जुनी मोठी विहीर होती. शेजारी पिंपळाचे झाड कित्येक शकापासून भारदस्तपणे उभे होते. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना सावलीसाठी त्याच झाडाचा आधार होता. सध्या हे घर रिकामेच होते. गावात कोणी नवीन शिक्षक बदली होऊन आले कि काही दिवस ह्या घरात राहत असत भाड्याने. पण नंतर ते दुसरेकडे राहायला जात असत किंवा स्वतःच्या गावातून जाणे येणे करणे पसंत करत असत.
घराची पायरी मोठी होती त्यामुळे बसण्यासाठी आणि शिळोप्याच्या गप्पा मारण्यासाठी ती जागा चपलख होती. त्यामुळे खूपदा लोक तेथे बसून गप्पा मारत असत. ते पाच जणही असेच बसले होते. गप्पांच्या ओघात भुताखेतांच्या विषय निघाला. शिवारात भूत कोठे आहेत, ते कोणी बघितले, भुतांचे प्रकार किती असतात वगैरे विषयावर गप्पा जोमात आल्या होत्या. त्यातील एकाने स्वतः भूत बघितले असे सांगितले. एकाने तर गावातील खडूस म्हातारा लहान तनपुरे भूत आहे हे शपथेवर सांगितले. तो म्हणे दिवसा माणूस म्हणून वावरतो आणि रात्री भूत असतो. म्हणून तो घरी झोपत नाही. तो नेहमी त्याच्या शेतातील घरातच झोपायला जातो. एकदा काही कामानिमित्त तो भल्या पहाटे त्याच्या शेतात गेला होता म्हणे. त्यादिवशी कदाचित भूतापासून माणूस व्हायला तो विसरला होता म्हणे, म्हणून त्याने म्हाताऱ्याला भुताच्या अवतारात बघितले. भूतापासून माणूस कसा झाला ह्याचे वर्णन त्याने केले.
एकाने सांगितले कि भुतांमध्ये सुद्धा जातीपाती असतात म्हणे. त्यांची लग्नेही होतात. भुतांचे बरेच प्रकार असतात वगैरे वगैरे. अश्या गप्पा रंगात आल्या असताना, विहिरीत काहीतरी पडण्याचा जोरात धपकन असा आवाज आला. तो आवाज संपूर्ण आसमंतात निनादला. अचानक आलेल्या त्या आवाजाने सर्वजण घाबरले आणि घाबरून विहिरीकडे बघायला लागले.
"ह्या पिंपळाच्या झाडावर भूत नसेल ना?" एकाने शंका काढली.
"येथे कसे भूत येईन?" दुसरा
"तो म्हातारा तनपुरे आला असेल तर? शेतात झोपायला जाताना आला असेल इकडे, बसला असेल पिंपळावर. आणि टाकली असेल उडी पाण्यात." तिसरा घाबरून बोलला.
"भुतांना विहिरीत पोहायला खूप आवडते म्हणे." चौथा बोलला.
"पण हा म्हातारा लहान तनपुरे आहे हे कशावरून?" एकाने शंका काढली. "ह्या घरात पण भुते असू शकतील? येथे एका महिन्याच्या वर कोणी राहिलेले तू बघितले का?
खूप चर्चेनंतर आणि वादविवादानंतर ह्या घरातच भूत असण्याची शंका आहे, म्हातारा लहान तनपुरे भूत जरी असला तरी त्याला दम्याचा त्रास आहे आणि तो काही एवढ्या थंडीत विहिरीत पोहायचे धाडस करणार नाही, ह्या नित्कर्षाप्रत सर्वजण आले आणि घाबरून सर्वजण तेथून सटकले.
ह्या पाच जणांच्या गप्पा जोरजोरात चालू असतानां, शेजारच्या घरातील साहेबरावची झोपमोड व्हायला लागली. अर्थात हे पाचजण दररोज त्या पायरीवर येत आणि गप्पा मारत, वादविवाद करत. परंतु त्यांचा गप्पांचा त्रास इतरांना होतो कि नाही ह्याचा मागमूसही त्यांना नसे.
इकडे साहेबराव बाहेर आला, अंगणात असलेला मोठा दगड उचलला आणि जोरात विहिरीत फेकला. दगड पाण्यात पडला आणि जोराचा धपकन असा आवाज आला. रात्रीच्या निरव शांततेत तो आवाज जरा जास्तच भयाण आणि गूढ वाटला.
काही दिवसानंतर अचानक दोन अफवा वनव्यासारख्या पसरल्या. एक लहान तनपुरेच्या अंगात रात्री भूत येते दुसरी त्या जुनाट घराच्या बाहेर असणाऱ्या पिंपळावर भुते आहेत आणि रात्री ते मनसोक्त विहिरीत आंघोळ करतात.
(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत. इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन आणि पोथी.कॉम वर प्रिंटेड कॉपीज उपलब्ध आहेत.)